विज्ञान संशोधनाचा पुनर्जागर

प्रा. के. एन. गणेश (संचालक ‘आयसर’)
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

हे  विश्‍व समजावून घेण्यासाठी कुतूहल आणि त्यापोटी घेतलेला शोध हा विज्ञानाचा पाया. विश्‍वाची रहस्ये उलगडली ती या प्रयत्नांतूनच. या शोधातून सापडलेल्या तत्त्वांमधूनच आपले जीवन अधिक समृद्ध-संपन्न होत गेले. त्यामुळे विज्ञानसंशोधनाच्या पाठीशी सरकारने व खासगी उद्योगसंस्थांनीही ठामपणे उभे राहायला हवे. याचे कारण केवळ देशासाठीच नव्हे, तर मानवतेसाठी केलेली ही गुंतवणूक आहे. वैज्ञानिकांना संशोधनात अनेकदा अपयश येते, प्रयोग असफल ठरतात, चुका होतात. ही अनिश्‍चितता गृहीत धरून सरकारने सातत्यपूर्ण पाठिंबा द्यायला हवा. ऊर्जा, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रात मोठी आव्हाने नि प्रश्‍न समोर उभे राहात आहेत.

हे  विश्‍व समजावून घेण्यासाठी कुतूहल आणि त्यापोटी घेतलेला शोध हा विज्ञानाचा पाया. विश्‍वाची रहस्ये उलगडली ती या प्रयत्नांतूनच. या शोधातून सापडलेल्या तत्त्वांमधूनच आपले जीवन अधिक समृद्ध-संपन्न होत गेले. त्यामुळे विज्ञानसंशोधनाच्या पाठीशी सरकारने व खासगी उद्योगसंस्थांनीही ठामपणे उभे राहायला हवे. याचे कारण केवळ देशासाठीच नव्हे, तर मानवतेसाठी केलेली ही गुंतवणूक आहे. वैज्ञानिकांना संशोधनात अनेकदा अपयश येते, प्रयोग असफल ठरतात, चुका होतात. ही अनिश्‍चितता गृहीत धरून सरकारने सातत्यपूर्ण पाठिंबा द्यायला हवा. ऊर्जा, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रात मोठी आव्हाने नि प्रश्‍न समोर उभे राहात आहेत. त्याच्यावरचे उपायही मूलभूत विज्ञान संशोधनातून गवसतील.

दैनंदिन जीवनात वैज्ञानिक तत्त्वांचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढावी व विज्ञानप्रसार व्हावा, या हेतूने १९९९ पासून भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. चंद्रशेखर वेंकट रामन यांना या दिवशी त्यांच्या संशोधनाबद्दल ‘नोबेल’ जाहीर झाले, तो हा दिवस. प्रकाशकिरण एखाद्या रासायनिक पदार्थातून जात असताना त्याचे स्वरूप (तरंगलांबी) बदलते, त्यावरून त्या पदार्थाची संरचना कळते, हा महत्त्वाचा शोध लावल्याबद्दल हा सन्मान झाला. त्यानंतर एकाही भारतीयाला विज्ञानाचे नोबेल मिळालेले नाही. याची कारणे अनेक असली तरी, स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या वैज्ञानिकांनी जे मोलाचे काम केले, ते प्रेरणादायी आहे. ती तळमळ पुन्हा निर्माण व्हावी.

देश १८५० ते १९५० या शंभर वर्षांच्या कालखंडात स्वातंत्र्यलढ्यात व्यग्र होता. दोन महायुद्धेही याच काळातली. त्या काळात देशात मूलभूत विज्ञानात चांगले काम सुरू होते. जगदीशचंद्र बोस, आचार्य पी. सी. रे, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा, सी. व्ही. रामन, श्रीनिवास रामानुजन यांनी विज्ञानातील अनेक मूलभूत संकल्पना जगाला दिल्या. बिनतारी संदेशवहनाचे जगदीशचंद्र बोस यांनी दाखविलेले प्रात्यक्षिक, सत्येंद्रनाथ बोस यांनी पदार्थाच्या नवीन अवस्थेचे केलेले भाकीत, मेघनाद साहा यांनी ताऱ्यांमध्ये होत असलेल्या आण्विक बदलांसंबंधी मांडलेले सूत्र, गणितज्ज्ञ रामानुजन यांनी गणिती प्रक्रिया सोप्या करण्यासाठी लावलेल्या सूत्रांचा शोध, आदींचा उल्लेख करता येईल. जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनातून आजचे मोबाईल फोनचे तंत्रज्ञान विकसित झाले, हार्डी-रामानुजन या गुरू-शिष्यांच्या गणिती सूत्रांमुळे आजच्या सायबर सुरक्षेसाठी लागणारे कोडिंग आणि इनक्रिप्शन हे तंत्र विकसित होऊ शकले. रेणूंमध्ये होणारे बदल व त्यानुसार त्यांचा औषधांपासून स्फोटकांपर्यंत करण्यात आलेला उपयोग हे रामन इफेक्‍टच्या साहाय्याने आपल्याला करता आले. मूलभूत विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगाची ही केवळ काही उदाहरणे. १९ व २०व्या शतकातील दोन मूलभूत संशोधनांनी जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. आइनस्टाइन यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे सर्वव्यापी शोधांची मालिकाच सुरू झाली व ती आताच्या स्मार्ट फोनपर्यंत आली आहे. त्याचबरोबर वॅटसन आणि क्रिक यांनी संशोधिलेल्या डीएनएच्या रचनेमुळे जीवशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीच घडली. डेन क्‍लिपनर यांनी १९६० मध्ये लावलेल्या हायड्रोजन मासरच्या शोधातून आण्विक घड्याळाचा शोध लागला व तोच आता उपग्रहावर आधारित जीपीएस तंत्रज्ञानाचा आत्मा आहे. बॉब हॉरविट्‌झ यांनी पेशींचा मृत्यू ठरविणाऱ्या विशिष्ट जनुकांचा शोध लावला व त्यातूनच कर्करोगासारख्या आजारांवरील उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल झाला. ट्रान्झिस्टर आणि लेसरच्या शोधांमुळे इलेक्‍ट्रॉनिक्‍स युगाची सुरवात झाली, तर न्युक्‍लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सच्या संशोधनातून एमआरआय ही निदानपद्धती अस्तित्वात आली. नॅनो पदार्थांच्या गुणधर्मांचा उपयोग भौतिक जगाबरोबरच (इलेक्‍ट्रॉनिक, मॅग्नेटिक व ऑप्टिकल) वैद्यकीय क्षेत्रातही (निदानपद्धती, इमेजिंग आदी) होत आहे. विज्ञानाने समाजाला दिलेल्या योगदानाची ही यादी मोठी आहे. मूलभूत विज्ञान सर्व तंत्रज्ञानविषयक शोधांची जननी आहे.

विज्ञान दिनानिमित्त दरवर्षी एक खास विषय निवडला जातो. दृष्टी, हालचाली, श्रवण, वाणी यापैकी एक किंवा अधिक क्षमतांचा अभाव असलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठी विज्ञान-तंत्रज्ञान, असा या वेळचा विषय आहे. या दिव्यांग व्यक्तींची सुरक्षा आणि त्यांच्या संधींमध्ये वाढ कशा रीतीने करता येईल, याविषयीचे तंत्रज्ञान विकसित होणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या गरजा नेमक्‍या ओळखणे व त्यांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचे विकसन यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

Web Title: Science research