बनावट शोधपत्रिकांचे अभद्र व्यवहार 

शहाजी मोरे
गुरुवार, 27 एप्रिल 2017

काही 'संशोधक' वाङ्‌मयचौर्य करून खोटे संशोधन खरे म्हणून दाखवून शोधनिबंध लिहितात आणि काही बनावट शोधनियतकालिके ते प्रसिद्धही करतात. हा प्रकार विज्ञान संशोधनाला मारक तर आहेच, शिवाय चिंताजनकही. 

काही 'संशोधक' वाङ्‌मयचौर्य करून खोटे संशोधन खरे म्हणून दाखवून शोधनिबंध लिहितात आणि काही बनावट शोधनियतकालिके ते प्रसिद्धही करतात. हा प्रकार विज्ञान संशोधनाला मारक तर आहेच, शिवाय चिंताजनकही. 

संशोधक संशोधन करून निरीक्षणे नोंदवितात व त्या आधारे निष्कर्ष काढतात. नंतर आपल्या संशोधनाची पद्धत, प्रक्रिया, निरीक्षणे, निष्कर्ष व उपयोगी पडलेली संदर्भ साधने आदींचा समावेश करून योग्य त्या स्वरूपात शोधनिबंध (रिसर्च पेपर) लिहितात. तो शोधनिबंध संबंधित संशोधने प्रकाशित करणाऱ्या शोधनियतकालिकांकडे (रिसर्च जर्नल्स) पाठवितात. शोधनियतकालिकांचे संपादक तो शोधनिबंध त्या विषयातील आघाडीच्या संशोधकांकडे अभिप्रायासाठी व सत्यतेसाठी पाठवितात. त्यांच्याकडून आवश्‍यक असतील, तर दुरुस्त्या सुचविल्या जातात किंवा 'योग्य/ अयोग्य' अशा अर्थाचा शेरा मारून संपादकांना कळवितात. या पद्धतीला 'पियर रिव्ह्यू' असे म्हणतात. यात कोठेही आर्थिक मामला नसतो. 

संशोधकांना आपले संशोधन दर्जेदार शोधनियतकालिकात प्रसिद्ध होणे अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण असते. पदोन्नती, नियुक्ती, वेतनवाढ, संशोधकांच्या वर्तुळात प्रतिष्ठा, अनुदान, सन्मान, पारितोषिके आदींसाठी प्रसिद्ध झालेले संशोधन महत्त्वपूर्ण असते. अनेक संशोधकांना अनुदान प्रदान करणाऱ्या संस्थांनी 'संशोधन प्रसिद्ध करा, अन्यथा चालते व्हा,' (पब्लिश ऑप पेरीश) असे फर्मान सोडलेले असते. कोणत्याही क्षेत्रात पैसा व मानसन्मान आले, की गैरप्रकार आलेच! काही 'संशोधक' वाङ्‌मयचौर्य करून, खोटे संशोधन खरे म्हणून दाखवून शोधनिबंध लिहितात. 'मागणी तसा पुरवठा' या न्यायाने अशी फालतू संशोधने प्रसिद्ध करणारी 'शोधनियतकालिके'ही अनेक आहेत. अशा शोधनियतकालिकांचे व अशा संशोधकांचे आर्थिक साटेलोटे काही नवीन नाही. जगभरात सर्वत्रच असे साटेलोटे चालू आहे. 

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलॅराडोमधील ग्रंथपाल जेफ्री बिल यांनी अशा शोधनियतकालिकांची यादीच प्रसिद्ध केली होती. परंतु, जानेवारी 2017 मध्ये त्यांनी ती अचानक काढून टाकली. ही शोधनियतकालिके संशोधकांकडून पैसे उकळून त्यांची संशोधने प्रसिद्ध करतात. त्यांच्याकडे 'पियर रिव्ह्यू' वगैरे काही प्रकार नसतो. अशा शोधनियतकालिकांना 'प्रिडेटरी जर्नल्स' (लुटारू शोधनियतकालिके) म्हणतात. 
जेफ्री बिल यांनी शोधनियतकालिकांचे तीन प्रकार केले आहेत. ज्या शोधनियतकालिकांना अधिकृत प्रभाव घटक (इम्पॅक्‍ट फॅक्‍टर) असतो, विनामूल्य उपलब्ध (इंटरनेटवर) शोधनियतकालिके (ओपन ऍक्‍सेस जर्नल्स) व लुटारू शोधनियतकालिके, हे तीन प्रकार!

पहिला प्रकार अर्थातच दर्जेदार नियतकालिकांचा आहे. ही शोधनियतकालिके महाग असतात. ती सर्वांनाच परवडतात असे नाही. त्यामुळे संशोधकांना संशोधनातील नव-नवीन प्रवाह कळून यावेत, त्यांचे संशोधनही प्रकाशित व्हावे यासाठी इंटरनेटवर अन्य काही शोधनियतकालिके प्रसिद्ध केली जातात. ती कोणालाही पाहता, वाचता येतात. चांगल्या हेतूने निघत असलेल्या या शोधनियतकालिकांबरोबरच काही दर्जाहीन शोधनियतकालिकेही निघत आहेत. हा झाला दुसरा प्रकार! तिसरा प्रकार आहे तो लुटारू शोधनियतकालिकांचा! 

लुटारू शोधनियतकालिकांचा कारभार कसा चालतो हे पाहिल्यास या क्षेत्रातील संबंधितांच्या अधःपतनास सीमाच नाही हे लक्षात येते. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्‍समधील शास्त्रज्ञ कतार्झायना पिसान्स्की व त्यांच्या युनिव्हर्सिटी ऑफ ऱ्हॉक्‍लॉव्ह, (पोलंड) येथील सहकाऱ्यांनी एक आगळे-वेगळे 'स्टिंग ऑपरेशन' घडवून आणले व त्याचा तपशील 23 मार्च 2017 च्या 'नेचर'च्या अंकात एका लेखातून कथन केला आहे. 

कोणत्याही नियतकालिकाचा दर्जा त्या नियतकालिकाच्या संपादक व संपादक मंडळावरून सिद्ध होतो. शोधनियतकालिके त्याला अपवाद ठरत नाहीत. पिसान्स्की व त्यांच्या सहकाऱ्यांनी खोट्या नावाने 360 शोधनियतकालिकांकडे संपादकपदासाठी अर्ज केले. अर्जासोबत बायो-डाटाही खोटाच बनविला. त्यामध्ये काल्पनिक पुस्तकांची नावे उद्‌धृत करून, त्या पुस्तकात या अर्जदाराने काही प्रकरणे लिहिल्याचे नमूद केले व खोटीच शैक्षणिक अर्हता दाखवून अर्ज ई-मेलद्वारा पाठविला. या काल्पनिक अर्जदाराचे नाव 'ऍन्ना ओ. स्झ्यूस्ट' असे ठेवले. 'ओ. स्झ्यूस्ट' म्हणजे पोलिस भाषेत 'भामटा' किंवा 'फसविणारा!' 

या लुटारू शोधनियतकालिकांचे व्यवहार इतके किळसवाणे असतात, की काही तासांतच 'ओ. स्झ्यूस्ट' यांना होकारार्थी प्रतिसाद मिळाला. काही दिवसांतच अठ्ठेचाळीस शोधनियतकालिकांनी त्यांना संपादकपदी चक्क नेमूनच टाकले. त्यांनी 'ओ. स्झ्यूस्ट' यांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, संशोधन याविषयी कसलीही चौकशी केली नाही. 
काही शोधनियतकालिकांनी तर निर्लज्जपणाचा कळसच केला. 'ओ. स्झ्यूस्ट' यांनी त्यांची, त्यांच्या मित्रांची, नातेवाइकांची नावे, शोधनिबंध समाविष्ट करावेत; परंतु त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे या शोधनियतकालिकांनी कळविले.

काही शोधनियतकालिकांनी नवीन शोधनियतकालिक काढण्याचा प्रस्ताव ठेवला व नफ्यातील 60 टक्के हिस्सा प्रकाशकाचा व 40 टक्के संपादकाचा राहील, असे कळविले. काही शोधनियतकालिकांनी 'ओ. स्झ्यूस्ट' यांना एक परिषद भरविण्याविषयी सुचविले. परिषदेत जे संशोधक शोधनिबंध सादर करतील, त्यांच्याकडून फी घेऊन त्या शोधनिबंधांचा विशेषांक काढावा. एका शोधनियतकालिकाने तर अर्ज न करताच 'ओ. स्झ्यूस्ट' यांना संपादकपदी नेमले. काहींनी त्यांना अनेक महत्त्वाच्या पदावरील नामावलीत दाखविले आहे. अर्थातच दर्जेदार शोधनियतकालिकांनी 'ओ. स्झ्यूस्ट' यांना कसलाच प्रतिसाद दिला नाही. 

पिसान्स्की यांनी या लुटारू शोधनियतकालिकांची नावे दिली नाहीत. ही लुटारू शोधनियतकालिके दर्जेदार नियतकालिकांसारखीच नावे धारण करतात; त्यामुळे नावे जाहीर केल्यास संभ्रम निर्माण व्हायचा. तो टाळण्यासाठी नावे जाहीर केली नाहीत, असे पिसान्स्की आपल्या लेखात म्हणतात. 

या स्टिंग ऑपरेशनमुळे लुटारू शोधनियतकालिकांच्या अभद्र व्यवहाराबाबत जागृती निर्माण होईल, अशी आशा पिसान्स्की यांनी व्यक्त केली आहे. असा हा लुटारू प्रकाशकांचा बेशरमपणा जागतिक विज्ञान संशोधनास विषासारखा मारक तर आहेच, शिवाय भविष्यात काय स्वरूप घेतो याविषयी चिंता निर्माण करणारा आहे.

Web Title: Shahaji More writes about plagiarism