चीन-बांगलादेश युती धोक्‍याची घंटा 

डॉ. शैलेंद्र देवळाणकर
बुधवार, 7 डिसेंबर 2016

हिंदी महासागरात भारताला चहूबाजूंनी घेराव घालण्याच्या हेतूने बांगलादेशाशी आर्थिक आणि सामरिक संबंध घनिष्ट करण्याची खेळी चीन खेळत आहे. बांगलादेशाला दोन पाणबुड्या देण्याचा चीनचा निर्णय हा त्याचेच निदर्शक आहे. 

हिंदी महासागरात भारताला चहूबाजूंनी घेराव घालण्याच्या हेतूने बांगलादेशाशी आर्थिक आणि सामरिक संबंध घनिष्ट करण्याची खेळी चीन खेळत आहे. बांगलादेशाला दोन पाणबुड्या देण्याचा चीनचा निर्णय हा त्याचेच निदर्शक आहे.

आशियात सत्तावर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चीनने बांगलादेशाला दोन पाणबुड्या देण्याचा निर्णय नुकताच घेतला. तसे पाहता, भारताला या पाणबुड्यांचा थेट धोका नाही; मात्र बांगलादेश आणि चीनचे संबंध घनिष्ट होत आहेत आणि हिंदी महासागरातील चीनचा प्रभाव वाढणार आहे, ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी चीनने पाकिस्तान, मालदीव, मॉरिशस व श्रीलंकेलाही पाणबुड्या दिल्या आहेत. हिंदी महासागरात ज्या देशांचे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे, त्यांना चीनने अशी मदत केलेली आहे. पाणबुड्यांच्या माध्यमातून या देशांशी संरक्षण संबंध वाढवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. आर्थिक व व्यापारी दृष्टिकोनातून चीनसाठी हिंदी महासागराचे महत्त्व मोठे आहे. हिंदी महासागरातील प्रवेशामुळे पश्‍चिम आशिया किंवा आफ्रिकी देशांशी व्यापार करणे चीनला शक्‍य होईल. चीनने त्यासाठी 'मॅरीटाइम सिल्क रूट', 'वन बेल्ट वन रूट' यांसारखे प्रकल्प हाती घेतले आहेत. 

गेल्या पाच वर्षांत बांगलादेशाला संरक्षणसामग्री पुरवणारा सर्वांत मोठा देश म्हणून चीनकडे पाहता येईल. खालिदा झिया पंतप्रधान असताना चीन व बांगलादेश यांच्यातील संबंध घनिष्ट होते. त्या वेळी दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाकांक्षी करार झाले. त्यानंतर 2010 मध्ये सर्वसमावेशक आर्थिक करार करण्यात आला. नुकत्याच गोव्यात झालेल्या 'ब्रिक्‍स' परिषदेनंतर चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग बांगला भेटीवर गेले. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान सामरिक भागीदारीचा करार झाला. याचाच अर्थ आर्थिक सहकार्याकडून संरक्षण सहकार्याकडे असा या देशांचा मैत्रीप्रवास सुरू आहे. 
काही दिवसांपूर्वी बांगलादेशाचे लष्करप्रमुख चीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी झालेल्या करारानुसार शिनशियांग, तिबेट, दक्षिण चीन समुद्र आणि तैवान या चीनचे 'कोअर इंटरेस्ट' असणाऱ्या मुद्द्यांना बांगलादेश पाठिंबा देणार आहे. दुसरीकडे बांगलादेशाचे सार्वभौमत्त्व, प्रादेशिक एकात्मतेला धोका पोचवणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी चीन सहकार्य करणार आहे. बांगलादेशाला अशा पद्धतीने प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्त्वाविषयी आश्‍वस्त करणे यामागे भारताला इशारा देण्याचा हेतू आहे, हे स्पष्ट आहे. 

भारताला शह देण्याच्या इराद्याने चीन बांगलादेशाला पाणबुड्या देणार असला, तरी त्याचा नेमका उपयोग काय, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. समुद्राखाली प्रतिरोधन तयार करणे हा पाणबुड्यांचा मुख्य उद्देश असतो. हे लक्षात घेता बांगलादेशाला सध्या तरी त्याची गरज नाही. मात्र असे असूनही बांगलादेश त्या घेत असेल, तर त्यामागे चीनचा दबाव किंवा आग्रह असू शकतो. पाणबुड्यांचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षणही चीन देणार आहे. त्यासाठी चीनचे लष्करी अधिकारी बंगालच्या उपसागरात येणार आहेत. ही भारतासाठी धोकादायक गोष्ट आहे. 

अचानकपणे चीन हा बांगलादेशाला का जवळ करत आहे, असाही प्रश्‍न या निमित्ताने पुढे येतो आहे. पाकिस्तान व बांगलादेश यांच्यात कटू संबंध आहेत; पण भारताशी बांगलादेशाचे संबंध चांगले आहेत. भारत-बांगलादेश संबंधांत कटुता यावी, यासाठी चीनचा वापर करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असू शकतो. 

हिंदी महासागरात पाय पसरण्यास सुरवात केल्यानंतर चीनने बांगलादेशाशी संबंध वाढविण्यास प्रारंभ केला. 1971 मध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली, तेव्हा चीनने त्याला मान्यता दिली नव्हती. पाकिस्तानने 1975 मध्ये बांगलादेशाला मान्यता दिल्यानंतर चीनने ती देऊ केली. त्यामुळे चीनला बांगलादेशाविषयी सुरवातीपासून प्रेम आहे, असे नाही. तथापि, हिंदी महासागरात भारताला चहूबाजूंनी घेराव घालण्याचा प्रयत्न करणे, या हेतूने चीन बांगलादेशाशी आर्थिक व सामरिक संबंध घनिष्ट करण्याची खेळी खेळत आहे. 

आता प्रश्‍न उरतो तो भारताने या संबंधीचे कोणते धोरण अवलंबिले पाहिजे हा. या संबंधात भारतापुढे चार पर्याय आहेत. मध्यंतरी, व्हिएतनामने भारताला दक्षिण चीन समुद्रात तेल उत्खननाचे अधिकार दिले. त्यानंतर भारतीय कंपन्यांनी तेथे तेल उत्खननाचा प्रयत्न केला. त्याला चीनने आक्षेप घेत दक्षिण चीन समुद्रात हस्तक्षेप न करण्याचा इशारा भारताला दिला. दक्षिण चीन समुद्रात चीनला, तर बंगालच्या उपसागरात भारताला रस आहे. ताज्या घडामोडीनंतर बंगालच्या उपसागरात लुडबूड न करण्याबाबत भारताने चीनला तंबी देण्याची गरज आहे. 

दुसरा पर्याय म्हणजे दक्षिण आशियातील शेजारी देश भारताचा प्रभाव रोखण्यासाठी 'चायना कार्ड' वापरतात. भविष्यात चीनबरोबरचे राजकीय प्रश्‍न सोडवून भारताने घनिष्ट संबंध प्रस्थापित केले, तर या देशांना विनाकारण 'चायना कार्ड' वापरता येणार नाही. तिसरा पर्याय म्हणजे भारतही बांगलादेशाला संरक्षणसामग्री देऊ शकतो. बांगलादेशातील शेख हसिना सरकार भारताला अनुकूल आहे. दोन्ही देशांमधील जनतेचा परस्परांशी संपर्क आहे. तसा प्रकार चीन व बांगलादेश यांच्यात नाही. त्यामुळे बांगलादेशातील माध्यमांना चीनचा नेमका हेतू काय आहे, याची कल्पना नाही. तिथल्या माध्यमांचे भारताशी चांगले संबंध आहेत. लोकसंपर्काच्या माध्यमातून भारताने बांगलादेशाचे मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. 

भविष्यात भारताला चीनबरोबरचे राजकीय, आर्थिक आणि सामरिक संबंध सुधारावे लागतील. सीमावाद, लष्करी घुसखोरी यामुळे दोन्ही देशांत विश्‍वासतूट आहे. ती दूर होईपर्यंत भारताचे शेजारी चीनची लष्करी मदत घेणार हे उघड आहे. त्यामुळे भारताने बहुअंगी धोरण स्वीकारायला हवे. तसेच 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून संरक्षण साधनसंपत्तीची निर्यात क्षमता वाढवणेही आवश्‍यक आहे. त्या माध्यमातून शेजारी देशांमध्ये केवळ विकासात्मकच नाही, तर संरक्षण भूमिकाही भारताला बजावावी लागेल. 

(लेखक परराष्ट्र धोरण विश्‍लेषक आहेत) 

Web Title: Shailesh Devlankar writes about possible union of China and Bangladesh