
राज्यरंग : उत्तर प्रदेश : ...आता चर्चा ‘ब्रँड योगी’ची
कर्नाटकात भाजपला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, त्याच दरम्यान उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज संस्थांमध्ये पक्षाची मोठी सरशी झाली. योगी आदित्यनाथ यांचे प्रतिमासंवर्धन आणि त्यांच्या प्रभावाची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे ‘ब्रँड योगी’ अशी चर्चा रंगू लागली आहे.
कर्नाटक सारख्या दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. कर्नाटकमध्ये ‘ब्रँड मोदी’ किंवा मोदी लाटेचा प्रभाव दिसत असतानाच, उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानिमित्ताने ‘ब्रँड योगी’ किंवा योगी लाट उदयास येत आहे, हे नाकारता येणार नाही. हा ‘ब्रँड योगी’ आगामी काही वर्षांत सर्व महत्त्वाच्या सत्ताकेंद्रांमध्ये विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
हा नवा ब्रँड उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःच निर्माण केला आणि वाढवला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांनाही या नव्या ब्रँडची भुरळ पडली आहे. यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व सरमा यांचा समावेश आहे. या मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ यांचे बुलडोझर धोरण तत्काळ आत्मसात केले. आपली प्रतिमा हिंदुत्ववादी बनविण्याचा प्रयत्न केला.
ज्याप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरचा वापर काही विशिष्ट, अर्थात मुस्लिम समुदायातील गुन्हेगारांविरुद्धच केला. विशेषतः हे धोरण राबविण्यासाठी अनेकदा कायद्याला बगल देखील देण्यात आली. असे असूनही योगी तत्काळ न्याय देत आहेत म्हणून त्यांच्या कृत्यांना लोकांचे समर्थन मिळत गेले. अशा पद्धतीने न्याय न केल्यास काहीशा सुस्तावलेल्या गतानुगतिक न्याय पद्धतीनुसार हे गुन्हेगार सुटले असते, अशी लोकांची धारणा आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शासन करण्याची ही नवी पद्धत काहीशी ग्राम्य वाटत असली तरी देखील सर्वसामान्य जनतेने मात्र योगींना सामर्थ्यशाली नेता म्हणून उचलून धरले आहे.
विकासाचे ‘यूपी मॉडेल’
गुजरातमधील २००२च्या दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांना मिळालेली हिंदुहृदय सम्राट ही पदवी आता योगींनाही बहाल केली जात आहे, यात आश्चर्य नाही. योगींची भगवी वस्त्रे आणि भारतात प्रसिद्ध असलेल्या नाथ संप्रदायातील एका प्रमुख मठाचे योगी आदित्यनाथ यांच्याकडे असलेले पद हे त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला विशेष पूरक ठरत आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर आले आहेत.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात क्वचितच एखाद्या मुख्यमंत्र्याला आपला कार्यकाल पूर्ण करून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ स्वतःची प्रतिमा आता विकासपुरुष म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूकदारांच्या परिषदा घेतल्या जात आहेत. ही कृती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवणे, असे मानले जाते. त्यांनी गुजरात मॉडेल विकसित करत देशात विकासपुरुष अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. आता योगी आदित्यनाथही त्याच पद्धतीने ‘यूपी मॉडेल’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ध्रुवीकरणाचे राजकारण यशस्वी
उत्तर प्रदेशच्या तुलनेत गुजरातमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बऱ्यापैकी नांदत असताना देखील मुस्लिमांबाबत आक्रमक धोरण स्वीकारत पंतप्रधान मोदींनी त्यांची प्रतिमा प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून निर्माण केली. या उलट उत्तर प्रदेशात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही वारंवार उपस्थित होतो. त्यामुळे गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी कठोर निर्णय घेणारा नेता अशी प्रतिमा निर्माण करणे योगी आदित्यनाथ यांना सहज शक्य झाले.
अशातच मुस्लिम समाजातील गुन्हेगारांना कठोर शासन करत ध्रुवीकरणाच्या माध्यमातून आपल्या लोकप्रियतेचे रूपांतर मतात करण्यात योगी आदित्यनाथ यांना यश आले. परंतु बहुसंख्याक समुदायातील गुन्हेगारांना कशी काय सूट मिळते, असे विचारण्याचे धाडस कोणीही दाखवत नाही. या साऱ्याचे फलित म्हणजे योगींचे ध्रुवीकरणाचे राजकारण यशस्वी होत आहे.
मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांना आणि त्यांच्या टोळ्यांना ज्या पद्धतीने वागविण्यात आले, त्यामुळे एका विशिष्ट समुदायाचे गुन्हेगारच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत आहेत, अशी परिस्थिती रंगविण्यात आली. अशा गुंडांच्या मुसक्या योगी आदित्यनाथांमुळेच आवळल्या गेल्या, अशी चर्चा केवळ राज्यातच नव्हे तर देशभर झाली. कुख्यात गुन्हेगारांचा पोलिसांकरवी एन्काऊंटर करण्याची त्यांची पद्धती देखील खूप लोकप्रिय झाली. या पार्श्वभूमीवर पोलिस संरक्षणामध्ये अतिक अहमद आणि त्याच्या भावाची करण्यात आलेली हत्या देखील काही जणांकडून योग्य ठरविण्यात आली.
सुनियोजीत प्रचार, प्रसिद्धी
सरकार पुरस्कृत मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही राज्य सरकारचा प्रत्येक शब्द उचलून धरला. याचे श्रेय आतापर्यंतच्या सर्वाधिक अशा दीड हजार कोटी रुपयांच्या प्रसार आणि प्रसिद्धीसाठी सरकारकडून करण्यात आलेल्या तरतुदीला द्यावे लागेल. अत्यंत सुनियोजित अशा प्रचार आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून योगी आदित्यनाथांना पंतप्रधान मोदींच्या खालोखाल नेऊन ठेवण्यात आले. देशभरात स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव झाले असतानाच अनेक भाजप समर्थक त्यांच्याकडे मोदींचा उत्तराधिकारी म्हणून पाहात आहेत. इतकेच नव्हे तर कित्येक राज्यांमध्ये योगी आदित्यनाथांकडे स्टार प्रचारकाबरोबरच विजयाचा शिल्पकार म्हणूनही पाहिले जात आहे.
राजस्थान, बिहार, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये आणि नुकत्याच निवडणूक झालेल्या कर्नाटकमध्ये आदित्यनाथ यांनी ध्रुवीकरण करणारा प्रचार केला. तरीही भाजपला हार पत्करावी लागल्यानंतरही याबद्दल त्यांना जाब विचारण्याचे धाडस पक्षात कोणाचेही होत नाही. कर्नाटकमध्ये ‘भाजपला हार पत्करावी लागली तरी ‘ब्रँड योगी’ जो ‘ब्रँड मोदी’चा उत्तराधिकारी होऊ पाहत आहे, त्याची चर्चा मात्र उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.