राष्ट्रहिताच्या नजरेतून : पाहा जरा आफ्रिकेकडे...

बहुतांश आफ्रिकन देश हे अनेक आघाड्यांवर भारतापेक्षा सरस कामगिरी करत आहेत. त्याचवेळी आपला देश भ्रष्टाचार, आत्मप्रौढी, प्रतिमांचे राजकारण, आत्मप्रशंसा आणि बनावट विजयाच्या दाव्यांमध्ये रमला आहे.
Donation by Kenaya
Donation by KenayaSakal

बहुतांश आफ्रिकन देश हे अनेक आघाड्यांवर भारतापेक्षा सरस कामगिरी करत आहेत. त्याचवेळी आपला देश भ्रष्टाचार, आत्मप्रौढी, प्रतिमांचे राजकारण, आत्मप्रशंसा आणि बनावट विजयाच्या दाव्यांमध्ये रमला आहे. या कारणांमुळे आपली प्रतिमा वाईट होत चालली आहे.

नावात काय ठेवले आहे? कोविड-१९ ला दुसरे कुठलेही नाव ठेवले तरीही तो संसर्ग आपल्याला आजारी करून रुग्णालयात पाठवणार किंवा तो जीव घेऊ शकतो. जर बी- १.६१७ या कोविड संसर्गाला भारताचे नाव दिले तर आपला एवढा तळतळाट होण्याची गरज काय? यापूर्वी वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना संसर्गाला वुहान किंवा चीनचे नाव देण्यास चीनने प्रचंड विरोध केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने चीनची मागणी मान्य केली. आपल्या देशानेही चीनकडून राष्ट्रवादाची प्रेरणा घेत भारतीय नाव देण्याला विरोध केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या वादावर तोडगा काढत, या संसर्गाला नाव देण्यासाठी ग्रीक अक्षरांचा वापर करण्याचे ठरवले आहे. आता तरी भारतीयांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही, हे समजणे कठीण आहे.

येत्या काही काळात जागतिक आरोग्य संघटनेला भारत, चीन यांसारख्या राष्ट्रवादाच्या मुद्यावर छाती बडवणाऱ्या देशांना लॉलीपॉप देऊन शांत करण्यापेक्षा, कोरोना काळात कामगिरीबद्दल स्वत:ला गंभीर प्रश्न विचारावे लागणार आहेत. जर तुम्ही पातळ कातडीचे भारतीय राष्ट्रवादी नागरिक असाल तर आमच्यापुढे काही कठीण प्रश्न निर्माण झाले आहेत. मी आपल्यापुढे आरसा धरण्याचा प्रयत्न करणार आहे. हा वाहनामध्ये असणारा आरसा आहे आणि त्यामध्ये नेहमीचा इशारा लिहिलेला आहे. आरशात दिसणारी वस्तू दिसते त्यापेक्षाही जवळ असते.

दक्षिण आशियायी तज्ज्ञ मानले जाणारे स्टीफन कोहेन यांचा कायम जागतिक महासत्ता, तिसरे जग या शब्दांना आक्षेप आहे. त्यांच्या मते, हे अतिशयोक्ती आणि जरा जास्त रंगवलेले लेबल आहेत. ती आपल्या मेंदूला विश्लेषण, गुंतागुंत आणि सूक्ष्मतेला समजण्यापासून परावृत्त करतात. शेवटी सर्व जग एकसारखे नाही, ते कुणाचे शिष्य तर नाहीच. त्यामुळे गेल्या काही काळापासून अनेक देश तिसऱ्या जगापासून वेगळे होऊन, स्वत:ला महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा ठेवण्यात अभिमान बाळगायला लागलेत. आपणही अशा राष्ट्रांपैकी एक आहोत. गेल्या तीन दशकांत १९९०-२०२० पर्यंत आपण ३० कोटी लोकांना भीषण दारिद्र्यातून बाहेर काढले. आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान होती. आपण जगाचे बँक ऑफिस झालो होतो. मोठी परदेशी गंगाजळी उभी केली. १९९१ मध्ये उदारीकरणापूर्वी बॅलन्स ऑफ पेमेंटचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी आपल्यावर सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती. आज भारतीय वंशाचे लोक जागतिक कंपन्या चालवत आहेत.

भारताची पत जागतिक पातळीवर उंचावली आहे, हे सत्य आहे. अगदी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय योगा दिन जाहीर केला. हे भारताच्या वाढत्या महत्त्वाचे निदर्शक आहे. ‘क्वाड’मध्ये भारताचा समावेश, जी-७ गटामध्ये भारताचा विशेष निमंत्रित देश म्हणून आपला सहभाग हे सर्व सांगतो. नरेंद्र मोदी हे सध्याचे लोकप्रिय आणि सन्मानित नेते आहेत. मात्र या टप्प्यावर मला इशारा देण्याची गरज वाटते, रायसीना हिलमध्ये गडबड आहे. जागतिक महासत्ता, तिसऱ्या जगाव्यतिरिक्त एक भौगोलिक क्षेत्र आहे, ज्याचे राजकीय, आर्थिक, सामाजिक महत्त्व आहे. त्याला आपण सब-सहारा हे एक नाव दिले आहे. वाईट परिणामासाठी जगभर स्वीकारलेली ही व्याख्या आहे. त्या देशाचे मानवी निर्देशांक सब सहारा आफ्रिकन देशापेक्षा वाईट आहे, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र भारताच्या सामाजिक निर्देशांकाकडे बोट दाखवले तेव्हा आपल्याकडे जागतिक कंपन्यांच्या यशोगाथा ऐकविल्या जातात. आपला देश हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन या जगातील महान धर्मांची जन्मभूमी आहे. आपल्याकडे शास्त्र, इतिहास आणि नैतिक अधिष्ठान आहे. याचा दाखला दिला जातो. भलेही काही सामाजिक निर्देशांकावर थोडेफार माघारलेले असू, पण तुम्ही ‘सब सहारा’ देशांसोबत आपली तुलना कशी करू शकता, असा आपला प्रश्न असतो. रेटिंग देणाऱ्या कंपन्यांचे मूळ आम्हाला माहीत असे आपण म्हणतो.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (सीआयए वा जागतिक बँकेची आकडेवारी घ्या) दाखवतात, की २० आफ्रिकन देश ज्यांची एकूण लोकसंख्या ६८ कोटी एवढी आहे. ते भारतापेक्षा श्रीमंत आहेत. अजून खोलवर शिरल्यास, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२१ या वर्षासाठी १९५ देशांसाठी केलेले दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) अंदाज केला होता. यात १९५ देशांमध्ये भारत १४४ क्रमांकावर आहे. घाना, आयवरी कोस्ट, मोरक्को, कॉगो हे देश आपल्या वर आहेत. बोस्टवाना ८४, तर गॅबो ८० क्रमांकावर येतो. दक्षिण आफ्रिका, नामीबिया, मॉरिशस, सेचेल्ससमवेत बोस्टवाना हे देशही आपल्या वर आहेत. बिहार जर एक देश असता तर १९५ राष्ट्रांच्या यादीत त्याचा १८४ चा क्रमांक असता. म्हणजे नायजर, इरिट्रिया, अफगाणिस्तान, सियरा लिऑन, सोमालिया आणि इतर देशांपेक्षा बिहार थोडा वरच्या क्रमांकावर असणार आहे. यातून दोन ठळक निष्कर्ष निघतात, एक तर ‘सब सहारा’पेक्षा वाईट, ही अत्यंत वर्णद्वेषी आणि अन्यायकारक व्याख्या आहे. दुसरे म्हणजे जग आज ज्या नजरेने भारताकडे बघत आहे, त्या रीतीने आपल्या देशातील काही भागाला अशाच रीतीने दोष देण्याचा धोका संभवतो. आपल्या महान नदीत तरंगणाऱ्या मृतदेह, किनाऱ्यावर दफन केलेल्या प्रेतांचे चित्र, ही ग्रेट इंडियन हार्टलँडची प्रतिमा कायमची डागाळणारी ठरू शकते.

केनियाच्या मदतीवरुन सोशल मीडियावर वादळ!

केनियाने कोविड काळात आपल्याला मदत म्हणून १२ टन चहा, कॉफी पाठवली, त्यावरून सोशल मीडियावर एक वादळ उठले होते. महासत्तेच्या वाटेवर असलेल्या देशाला एवढी छोटी मदत केल्यावरून काहीजण दुखावले आहे. दुसऱ्याने लिहिले, धन्यवाद मोदीजी, तुम्ही चहा, कॉफी आणि शेंगदाण्याची मदत स्वीकारण्यापर्यंत भारताला नेऊन ठेवल्याबद्दल! दोन्ही बाजूंच्या विधानाचा एक समान धागा होता. तो म्हणजे केनिया हा आफ्रिकन देश आहे. ‘सब सहारा’ देशामधील एक राष्ट्र. ते मदत कशी काय पाठवू शकते. शेवटी आफ्रिका हे कायम मदत स्वीकारणारे आहेत, मदत पाठविणारे नाहीत. आफ्रिकन खंडातील २० देश दरडोई उत्पन्न आणि दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवर भारतापेक्षा श्रीमंत आहेत. यात बहुतांश ‘सब सहारा’ देश आहेत. आता एवढ्या कमी लोकसंख्येच्या देशांची तुलना आमच्यासोबत करू नका, असा युक्तिवाद जराही चालणार नाही.

(अनुवाद : विनोद राऊत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com