राष्ट्रहिताच्या नजरेतून - कोविडचे विश्लेषण कसे करता येईल?

कोरोनाचा राक्षसी विषाणू नेमका कोठून आला?, प्राण्यांमधून की प्रगोगशाळेतून? माणसांमध्ये तो नैसर्गिकरित्या पसरला की प्रयोगशाळेमध्ये तयार करून आपल्यापर्यंत कोणी पोहोचविला?
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

कोविडच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना दूरचित्रवाहिन्यांवरची एक जाहिरात आठवते. त्यात वादळ येऊन सर्व काही उडून जाते. अगदी त्या तरुणाच्या अंगावरील कपडेही. वादळ थांबते आणि दुसरी तरुणी तेथे येते. त्याकडे पाहत ती म्हणते.....सगळे उडून गेले, फक्त परफ्युमचा सुगंध तेवढा राहिला....असेच काहीसे कोविडचे झाले आहे. लाट ओसरू लागली, पण पाठीमागे राहिल्या दुःखद गोष्टी.

कोरोनाचा राक्षसी विषाणू नेमका कोठून आला?, प्राण्यांमधून की प्रगोगशाळेतून? माणसांमध्ये तो नैसर्गिकरित्या पसरला की प्रयोगशाळेमध्ये तयार करून आपल्यापर्यंत कोणी पोहोचविला? विषाणूची निर्मिती ही वैज्ञानिक संशोधनामधून झालेली चूक आहे की जैविक युद्धाचाच एक प्रकार असून त्यासाठी या विषाणूंची निर्मिती केली आहे? हा विषाणू तात्पुरता गेला आहे, परंतु संशयाचे धुके मात्र कायम आहे.

ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये जे शास्त्रज्ञ हा विषाणू कोठून आला किंवा त्याचा प्रसार कसा झाला....या विषयी बोलणे टाळत होते. तेच शास्त्रज्ञ आपले मत नोंदवू लागले. प्रश्न विचारू लागले. हा विषाणू जर एखाद्या प्राण्याकडून संक्रमित झालेला असेल तर विषाणूंचा प्रसार ज्यांच्यामार्फत झाला असा एकही प्राणी गेल्या १८ महिन्यांत कसा आढळून आला नाही?

चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने डिसेंबर २०१९ मध्ये त्यांच्याकडील सर्व माहिती कुलूपबंद का केली? चिनी शास्त्रज्ञांनी स्वतःच्या फायद्याचे संशोधन केले, याबाबत अमेरिकेच्या संशोधकांना किंबहुना जगभरातील संशोधकांना याची पुसटशी कल्पनाही कशी आली नाही? अमेरिकेकडून कशाप्रकारे वित्तपुरवठा केला गेला...त्या प्राणघातक विषाणूंमध्ये कशा प्रकारे बदल झाला. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या तथ्यशोध समितीवर अमेरिकेने सुचविलेली शास्त्रज्ञांची सर्व नावे चीनने नाकारली...परंतु न्यूयॉर्क स्थित इकोहेल्थ अलायन्सचे पीटर डॅसझॅक यांचे नाव मात्र मान्य केले. डॅसझॅक यांनीच वुहानच्या प्रयोगशाळेसाठी वित्तपुरवठा केला होता.

डब्ल्यूआयव्हीच्या प्रसिद्ध ‘बॅट लेडी’ शी झेंगली यांनी `निवडक` सत्य जगापुढे कसे मांडले, याची माहिती आता पुढे येत आहे. चिन्यांना नेमके काय लपवायचे होते? यानंतर एक गोष्ट मात्र झाली. सरकारे आणि वैज्ञानिक आस्थापने साध्या साध्या गोष्टींबाबत सावध बनली आणि अधिक चौकसपणे काम करू लागली. हा विषाणू नेमका आला कोठून त्याचा अगदी निगुतीने शोध घेतला आणि त्याचा प्रसार कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची सुरवात बँक ऑफ न्यूझीलंडमधील कॅट डेटा शास्त्रज्ञ गिलेस डेमान्यूफ यांनी केली आणि त्यांच्यासोबत साय-फाय लेखक आणि प्रख्यात अभ्यासक जेमी मेट्झल सामील झाले आणि मग जगभरातील जिज्ञासू पुरुष आणि महिला एकत्र येऊन त्यांचा एक संघच तयार झाला. या संघामध्ये काही भारतीयही सहभागी होते. त्यामध्ये अज्ञात विज्ञान शिक्षक, ज्यांनी @ TheSeerer२६८ यावर ट्विट केले होते तेही सहभागी होते, याशिवाय सहभागी असलेले भारतीय नाव हे पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील वैज्ञानिक मोनाली रहाळकर आणि राहुल बहुलीकर यांचे आहे. त्यांनी या विषाणूबाबत वस्तुस्थिती निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

मात्र हे सगळे जसे दिसत आहे तसे मुळीच नाही. हे समजून घेण्यासाठी माझी सहकारी ज्योती मल्होत्राने घेतलेली मोनाली रहाळकर यांची मुलाखत नक्की पाहायला हवी. वेगवेगळ्या नावासह असलेले दोन विषाणू एकसारखेच आहेत हे त्यांनी आणि त्यांच्या पतीला कसे आढळले, त्याचा क्रम त्यांनी स्पष्ट केला आहे. याबाबत आणखी माहिती मिळविण्यासाठी न्यूयॉर्क टाइम्सचे दोन माजी विज्ञान संपादक, निकोलस वेड आणि डोनाल्ड मॅकनील ज्युनिअर आणि प्रसिद्ध लेखक कॅथरिन एबन यांनी याबाबत केलेले लिखाण वाचले पाहिजे. जर आपण वेड यांच्या लिखाणानंतर एबन आणि रहाळकरांचे काळजीपूर्वक ऐकल्यास आपल्याला अनेक बाबी स्पष्ट होतील. त्यांच्या मते त्या विषाणूमध्ये ‘फ्यूरिन क्लेवेज’ नावाचे जनुकीय वैशिष्ट्य आढळले. हे जनुकीय वैशिष्ट्य वटवाघुळांमध्ये आढळून येत नाही. हे सगळे प्रयोग सुरू असताना चिनी शास्त्रज्ञांनी कोविडशी साम्य असणाऱ्या विषाणूवरील प्रयोग सुरूच ठेवले होते. या प्रयोगांदरम्यान ते प्रयोगशाळेतून बाहेर गेले. नोबेल पुरस्कार विजेते डेव्हिड बाल्टीमोर आणि कॅलटेक यांनी हे सारे जगासमोर आणल्यामुळे खळबळ उडाली.

डब्ल्यू आयव्ही २०१२ पर्यंत मोजियांग खाणीतील विषाणूंवर कार्यरत राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्याबाबत अवाक्षरही काढले नाही. त्यांनी नवा विषाणू निर्माण केला, त्याच्या उंदरांवरही चाचण्या घेतल्या. उंदरांच्या शरीरातील एसीई२ या रिसेप्टरवर त्याचा काय परिणाम झाला हेही पाहण्यात आला. माणसाच्या शरीरातील एसीई२ रिसेप्टरवर कोविड १९ मुळे परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य होता. प्रयोगांसाठीचे उंदीर नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून आणले होते. या प्रयोगशाळेचे प्रमुख प्रा. राल्फ बॅरिक यांच्या मार्गदर्शनाखाली शी झेंगली यांनी संशोधन केले होते. हे सर्व विविध लेखांतून सामोरे आले आहे. यातील प्रमुख बाब म्हणजे, पीटर डॅसझॅकने लॅन्सेटला पत्र लिहून विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याची माहिती दिली, इतकेच नव्हे तर हा विषाणू प्रयोगशाळेबाहेर जाण्याच्या कटातही तो सहभागी होता. दुसरी बाब म्हणजे वुहानमध्ये पहिल्यांदाच घटना उघडकीस येताच चिनी पीएलएने त्याचे व्हायरॉलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट आणि बायो-डिफेन्स वैज्ञानिक मेजर जनरल चेन वेई यांना डब्ल्यूआयव्हीवर पदभार स्वीकारण्यास पाठविले. या लेखामधून तुम्हाला अनेक बाबीं माहिती होतील.

२०१२ मध्येच कोरोनाची लक्षणे?

शी झेंगली यांच्या प्रयोगशाळेत गोठविलेल्या विषाणूमध्ये आणि २०१२ मध्ये सापडलेल्या कोविड-१९ या विषाणूमध्ये ९६.२ टक्के साम्य होते. युन्नान प्रांतातील मोझियांग येथील तांब्याच्या खाणीमध्ये वटवाघुळांची विष्ठा साफ करण्यासाठी गेलेले सहा मजूर त्यावेळी आजारी पडले होते. त्यावेळी त्याचे नाव वेगळे ठेवले होते आणि त्याविषयी फारशी चर्चाही झाली नाही. खरेतर तेथेच कोरोना विषाणू माणसामध्ये थेट संक्रमित होताना दिसला होता. आजारी पडलेल्या तिघांना गंभीर न्यूमोनिया झाला आणि तिघांचा मृत्यू झाला....मात्र चिनी लोकांनी हे का लपवून ठेवले हे कळण्यास मार्ग नाही. मोझियांग खाणीत आजारी पडलेल्या मजुरांना ज्या विषाणूचा संसर्ग झाला होता, त्या विषाणूचे त्यांनी RaTG १३ हे नाव बदलून RaBtCoV/४९९१ का ठेवले.? पुढे काही संशोधकांनी या विषाणूवर संशोधन केले त्यातून हा विषाणू आणखीनच प्राणघातक बनला.

(अनुवाद - प्रसाद इनामदार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com