बदलती गावे - शेंद्रा : प्रथेकडून प्रगतिपथाकडे...

Shendra Industry
Shendra Industry

औरंगाबादपासून अवघ्या दहा किलोमीटरवर औरंगाबाद-जालना महामार्गालगत वसलेले छोटेसे खेडे, अशी पूर्वीची ओळख असलेले, श्री क्षेत्र मांगीरबाबा देवस्थानमुळे राज्यभर नाव पोचलेले शेंद्रा कमंगर आता पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलंय. याच मंदिरात भाविक मांगीरबाबा यांच्या यात्रेत नवस फेडण्यासाठी पाठीत गळ टोचून घ्यायचे. कालांतराने गावाच्या जमिनीवर २०००मध्ये शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत विकसित होण्यास सुरवात झाली अन्‌ गावाचे औद्योगिक शहर होऊ लागले. यानंतर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत येथील जमिनी अधिग्रहीत झाल्या. आता शेंद्रा-बिडकीन पट्ट्यात देशातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी ‘ऑरिक’ उभी राहत आहे. याच गावाच्या परिसरात आता टोलजंग इमारती, रो-हाऊसेस, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स उभे राहिले आहेत. झपाट्याने शहरीकरण होणारा शेंद्रा परिसर आता औरंगाबाद शहराचे उपनगर बनला आहे.

औरंगाबाद शहर-परिसर १९८०च्या दशकापासून औद्योगिक आणि विशेष करून ऑटोमोबाईल हब म्हणून नावारूपाला आला. १९९०च्या दशकात आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर अशी कीर्ती या शहराने मिळवली. या काळात रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, वाळूज, चितेगाव येथील औद्योगिक वसाहतींत मिळून जवळपास पाच हजारांवर उद्योग कार्यान्वित झाले. यानंतर २०००मध्ये शेंद्रा पंचतारांकित वसाहत विकसीत होण्यास सुरवात झाली. अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग समुहांनी आपले कारखाने सुरु केले. या ठिकाणचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेता केंद्र सरकारने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पात शेंद्रा-बिडकीनचा समावेश केला. त्यानुसार औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी अर्थातच ऑरिक (शेंद्रा- बिडकीन) हे शहर ८४००हेक्‍टर जागेमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने विकसित होत आहे. सात सप्टेंबर २०१९रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील शेंद्रा येथील वसाहत आणि प्रशासकीय इमारत असलेल्या ‘ऑरिक हॉल’चे लोकार्पण झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यानंतर गावालगतच्या जमिनीला सोन्याचा दर आला. आता टोलेजंग इमारती, रो-हाऊसेस, मोठ्या कंपन्यांमध्ये शेंद्रा गाव रुपांतरित झाले आहे. पूर्वी शेंद्राबन आणि शेंद्रा कमंगर अशी गट ग्रामपंचायत होती. लोकसंख्या फक्त दीड ते दोन हजारांच्या जवळपास होती. यानंतर १९८७मध्ये शेंद्रा कमंगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. २०११च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या दोन हजार ९८७ आहे. मात्र, औद्योगिक विकासामुळे येथील लोकसंख्या आता दहा हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जुन्या गावात पाचशेच्या आसपास घरे आहेत. गावाच्या मध्यभागी आहे मांगीरबाबांचे मंदीर. हे मंदीर राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पूर्वी मांगीरबाबा यात्रेत नवस फेडण्यासाठी अनेक जण पाठीत गळ टोचून घेत. मात्र येथे झालेला विकास, ग्रामस्थांचा पुढाकार, राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे गळ टोचण्याची प्रथा दोन वर्षापासून बंद झाली आहे.

४० टक्के जमिनींवर घरे
शेंद्रा कमंगर गावातील एकूण जमिनीच्या ३०टक्के जमिनी एमआयडीसीत घेतल्या गेल्या. चाळीस टक्के जमिनीवर रो-हाउस, रहिवाशी सोसायट्या, घरे, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स तर ३०टक्के जमिनीवर शेती होते. १९९८च्या जवळपास शेंद्रा परिसरातील तीन हजार एकरपेक्षा जास्त जमिनी एमआयडीसीसाठी घेण्यात आल्या. यानंतर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत जवळपास आठ हजार एकर जमीन संपादित झाली. शेंद्रा कमंगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत १०४लहान मोठ्या कंपन्या आहेत. यामध्ये लिभेर, स्टरलाईट, महावितरणचे मोठे पॉवर हाऊस आहे. ऑरिक सिटीमुळे जमिनीला सोन्याचा दर आहे. याच जमिनीवर आता कारखान्यांसह बंगले, घरे, टोलेजंग इमारती उभे राहात आहेत. गावात चोवीस तास वीज तसेच एमआयडीसीडीचे पाणी येणार असल्याने परिसरही झपाट्याने विकसित होत आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com