हेमलकसा

हेमलकसा

परभणीच्या कृषी महाविद्यालयात विनोबा भावेंचं ‘शिक्षण विचार’ पुस्तक वाचण्यात आलं. शेतीशास्त्रातील उच्चशिक्षणाविषयी आक्षेप घेताना विनोबांनी म्हटलं आहे, ‘‘आज शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीच्या बाहेर, शहरातील कृषी महाविद्यालयात आणून शेतीचे आधुनिक शिक्षण दिले जात आहे, हे सर्वस्वी चुकीचे आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर गीता सांगितली म्हणून अर्जुन लढू शकला. आज शेतकऱ्यांच्या मुलांना जे चार भिंतींतील वर्गातून शेतीशास्त्र शिकविले जात आहे, ते श्रीकृष्णाने अर्जुनाला, वर्गात गीता शिकविण्यासारखे आहे.’’ ते वाचल्यापासून मन सैरभर झालं. त्यानंतर वर्ध्याला जाण्याचा योग आला, तेव्हा पवनार आश्रमात जाऊन विनोबांची भेट घेतली. त्यांचं मौन होतं. पाटीवर लिहून प्रश्‍न विचारला. ‘‘आता आम्ही कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी मग काय करावं? तुम्ही तर म्हणता आजचे शिक्षण चालू ठेवल्याने तरुण पिढीचे जेवढे नुकसान होत आहे, तेवढे ही शिक्षण व्यवस्था बंद केल्याने होणार नाही. तेव्हा आमचं कृषी विद्यापीठ आंदोलन करून आम्ही बंद करावं का?’’ कारण ते चालू ठेवण्यापक्षा बंद ठेवणं खूप सोपं होतं; पण विनोबांनी पाटीवर एवढंच लिहिलं, ‘‘पहले आप अपनी पढाई पर ध्यान दिजीये,’’ नाराज झालो. ज्या अपेक्षेनं गेलो होतो, तिथंही काही समाधानकारक उत्तर मिळालं नव्हतं. मग मनाची हीच घालमेल व्यक्त करणारं पत्र यदुनाथ थत्तेंना लिहिलं. त्यांनी सुचविलं, ‘‘मे महिन्यात मूलजवळील जंगलात सोमनाथ इथं बाबा आमटे जी श्रमसंस्कार छावणी आयोजित करतात तिथं जा. कदाचित तुला काही प्रश्‍नांची उत्तरे मिळतील.’’

मे महिन्यातील रणरणत्या उन्हात तो एसटीनं केलेला एवढ्या दूरवरचा प्रवास. एक मन म्हणत होतं, काय हा वेडेपणा? कुठल्या अनोळखी प्रदेशात, लोकांत जात आहेत आपण? बरोबरची इतर सर्व मुलं अभ्यासात गुंतलेली. स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणारी. आपण मात्र वडिलांनी मेससाठी पाठविलेले पैसे खर्च करून हे काय करीत आहोत? असं काय मिळणार आहे तिथं? पण सोमनाथमध्ये देशभरातून आलेली उत्साही मुलं-मुली भेटली. साधनाताईंनी सर्वांची आपुलकीनं केलेली विचारपूस. प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला.

सकाळी शारीरिक श्रम केल्यावर जंगलातील ओढ्यावर अंघोळ अन्‌ दुपारी जेवणानंतर बाबा आमटेंचं ते अंगावर रोमांच उभं करणारं आत्मप्रकटीकरण. त्याला भाषण म्हणावं, की ज्वालाग्रही काव्य? माणसानं मनात आणलं तर कसल्याही प्रतिकूलतेवर तो मात करू शकतो, असा विश्‍वास बाबांच्या बोलण्यानं, त्यांच्या सहवासानं आणि त्यांच्या कामानं तेव्हा आमच्यात निर्माण केला. तेव्हा नुकताच डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासोबत तिकडे आणखी दूर दंडकारण्यातील भामरागडजवळ हेमलकसा इथं लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला होता. परवा शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं गडचिरोलीला जाणं झालं, तेव्हा हेमलकसाला जाता आलं. आनंदवन, सोमनाथ अनेकदा गेलो. पण भामरागड पहिल्यांदाच. बोलू त्याविषयी...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com