गेले द्यायचे राहून...

गेले द्यायचे राहून...

ज्यांच्या कुटुंबात हजारो वर्षे शिक्षण नव्हते, जिथं केवळ श्रवणपरंपराच प्रदीर्घ काळापासून चालत आली होती, तीही धार्मिक, भावनिक, आध्यात्मिक अंगानेच जपली गेली, तेथे बौद्धिकतेची, तर्काची रुजवात अगदी अलीकडील पन्नास-साठ वर्षांत झाली. ज्या पिढीला प्रथमच शिक्षणाचा लाभ झाला, त्या पिढीत एक मोठा संभ्रम आपण पाहात आलेलो असतो. एकतर शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडल्यावर जाणिवाही जागृत झालेल्या असतात. अक्षरांची ओळख झाल्यानं शेकडो वर्षांपासून दडपलेल्या अस्मिता जागृत होऊन, समाजजीवनात त्या अस्मितांची खदखद जाणवायला लागलेली असते.

अशा अस्वस्थ वातावरणात, जिथं जुन्याची मोडतोड होते आणि नवं काही घडत असतं, तेव्हा त्या जुन्या चौकटी भेदण्याची वेळ येते, तेव्हा ज्यांच्याकडं क्षमता आहे; पण लोक काय म्हणतील, या दडपणापोटी अशी माणसं काहीच न करता, शांत बसून भोवताली जे जे घडतं ते ते निर्लेप वृत्तीनं पाहात बसतात; पण काळ काही त्यांच्यासाठी थांबत नाही. समाजजीवन निकोप बनविण्यासाठी काही आंदोलनं, चळवळी, संघर्ष अवतीभवती चालू असतात आणि आपण विचार करतो- नाही, हे आपलं काम नाही. त्यापासून सुरक्षित अंतर राखून आपण दूर राहतो. काही वेळा वाटतं ही जी घुसळण चालू आहे, त्यातून आपणास कविता सुचते आहे; पण आपण म्हणतो- नाही आत्ताच नको. आपणाकडे अजून कविता लिहिण्याइतकी प्रगल्भता आली नाही. नंतर वय वाढतं. काळ बदलतो अन्‌ वाटायला लागतं- छे! हे कविता-बिविता लिहिण्याचं आता आपलं वय राहिलं काय? अन्‌ तेही राहून जातं.

कधी आपणासाठी जिव्हाळ्याच्या विषयावर कुणी काही अद्वातद्वा बोलतो. कुणी ज्यात आपलं आतडं गुंतलं आहे, अशा विषयावर विपर्यस्त लिहितो. आपण मनातून संतापतो. एक शिवी हासडावी वाटते; पण आपण लोक काय म्हणतील म्हणून तेव्हाही ओठावर आलेली शिवी, सुसंस्कृत वाटावं म्हणून गिळून टाकतो. आपण कसं वागलं म्हणजे इतरांना बरे वाटेल, असा विचार करीत आपण जगायचं ठरवलं, तर आपलं जगणं निव्वळ पालापाचोळाच होऊन जाईल.

तुम्ही लहान असा की, मोठे. सामान्य असा की, असामान्य. काळाच्या ओघात कधीतरी एखादी विशिष्ट भूमिका तुमच्या वाट्यास येते. ही भूमिका निभावताना तुम्ही कुणाशी स्पर्धा करीत नसता. तुमचं स्वतःचं मनच तुम्हाला ग्वाही देतं की, आता तू ही भूमिका पार पाडलीच पाहिजे. तू हे केलं नाहीस, तर आणखी इतर कुणी हे तुझ्याहून चांगलं करणार नाही. आपणाकडे बरचंसं काही असूनही, आपण काहीच न केल्यामुळं ‘गेले द्यायचे राहून’ अशी अवस्था वाट्यास येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com