तुझा तू वाढवी राजा

तुझा तू वाढवी राजा

जी माणसं पिढ्यानपिढ्यांच्या अज्ञानाच्या अंधःकाराचा ‘वारसा’ घेऊन वाटचाल करतात, त्यांना उजेडाचं आकर्षण अधिक असतं. पुढं आयुष्य उभं ठाकलेलं असतं, त्याला तोंड कसं द्यायचं, हे सांगणारं त्यांच्या अवतीभवती कुणी नसतं. ‘त्याचं तो बघून घेईल,’ म्हणून त्याला या अटीतटीच्या झुंजीत सोडून दिलेलं असतं. इथली व्यवस्था तर आपल्या बाजूने नाही; तरीही त्या व्यवस्थेचा भाग न बनता, त्याच व्यवस्थेत त्याला पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहावं लागतं. स्वतःचं स्थान निर्माण करावं लागतं. लहानपणी मोकळ्या वातावरणात वावरलेली, पण तथाकथित सुसंस्कृत जगाचं वारं न लागलेली ही माणसं स्वतःच स्वतःला कशी घडवतात?

जगभराचा कानोसा घेतला, की लक्षात येतं, त्यांच्या जडणघडणीत सर्वांत मोठा वाटा, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचा असतो. त्यांच्यासाठी प्रत्येक चांगलं पुस्तक एक सखोल जीवनानुभव असते. हो! आणि पुस्तकांच्या जगात केवळ दोनच प्रकारची पुस्तकं असतात. चांगली आणि वाईट. चांगलं म्हणजे सफाईदार, तरल शब्दांतून भावना व्यक्त करणारी पुस्तकं नव्हेत, तर माणसानं जे भोगलेलं आहे, ते व्यक्त करणारी पुस्तकं; मग ती कोणत्याही भाषांतील असोत अन्‌ कोणत्याही देशांतील असोत.

आपल्या मनात निर्माण होणाऱ्या शंका-कुशंकांचं निरसन ही पुस्तकं करतात. अनेक गूढ, अनाकलनीय, काही वेळा चारचौघांत ज्याची जाहीर चर्चा करता येत नाही, अशा गुह्याची चौकशी आपण पुस्तकात करतो. आपणास पडणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरं आपण पुस्तकात शोधतो. प्रत्येक वेळी या प्रश्‍नांची उत्तरं पुस्तकातून मिळतातच असं नव्हे; पण ते उत्तर शोधण्याचा मार्ग तरी निश्‍चित सापडतो. आपल्यातील रानटी रासवटपणा कमी करण्याचं काम ही पुस्तकं करतात. तुम्ही ज्या सांस्कृतिक सभोवतालात जगत आहात, तो सभोवताल कशाकशाने व्यापलेला आहे, त्या पर्यावरणात किती महत्त्वाची पुस्तकं लिहिली जात आहेत, किती महत्त्वाचे चित्रपट निर्माण होत आहेत, किती उंचीचं संगीत उदयाला येत आहे, त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्त्व आकार घेतं. जितक्‍या उत्तम प्रतीच्या कलाकृतींचा सहवास लाभेल, तेवढा आपला भविष्यकाळ उज्ज्वल ठरण्याची शक्‍यता असते. आपलं मन एकाअर्थी निर्विकार असतं. पिढ्यान्‌पिढ्यांची अक्षरओळख नसल्यानं भूतकाळात काय चांगलं होतं, काय वाईट होतं याच्याशी काही देणं-घेणं नसतं. त्यामुळे एकदा अक्षरओळख झाली, की जे मौल्यवान आहे, त्याकडेच मन आपोआप ओढ घेतं. ते कुठून आलं याचा विचार आपण करीत नाही. अशा वेळी एखादा अमेरिकन कृष्णवर्णीय लेखक आपणास जवळचा वाटतो, तसंच साने गुरुजींच्या ‘श्‍यामच्या आई’इतकंच महत्त्व आपल्याला दया पवार यांच्या ‘बलुतं’ आणि प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणीचे पक्षी’चं वाटतं. कोणत्याही सामाजिक चळवळींनी जे साध्य केलं नाही, ते मनामनांचं औदार्य वाढविण्याचं काम या आत्मकथनांनी केलेलं असतं. ग्रामीण समाजजीवन पुढे जाण्यासाठी ‘ग्यानबा-तुकोबां’च्या जोडीनं आधुनिक साहित्याचं वाचनही वाढायला हवं. तेव्हा तुझा तू वाढवी राजा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com