माणसांचं वागणं

शेषराव मोहिते
बुधवार, 19 एप्रिल 2017

ही  माणसं अडाणी नसतात. मनानं क्षुद्र नसतात. मुळातून दुष्टही नसतात. त्यांच्या मनाच्या उमदेपणाचा अनुभव आपणास अनेकदा आलेला असतो. जीवनाच्या ज्या टप्प्यावर कुणाच्या तरी प्रोत्साहनाची गरज असते, तेव्हा त्यांनी आपणास प्रोत्साहन दिलेलं असतं. आपल्या सुप्तावस्थेतील गुणांचं त्यांनी कौतुक केलेलं असतं. ही माणसं ज्या क्षेत्रातील असतात, तिथं त्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसाही काही प्रमाणात उमटविलेला असतो. एकेकाळी त्यांच्याकडं पाहूनच आपणही काही स्वप्नं पाहिलेली असतात. बाहेरच्या जगाचा आपला तेव्हा फारसा संपर्कही आलेला नसतो. आपलं गाव म्हणजेच आपलं जग, हे तेव्हाचं वास्तव असतं.

ही  माणसं अडाणी नसतात. मनानं क्षुद्र नसतात. मुळातून दुष्टही नसतात. त्यांच्या मनाच्या उमदेपणाचा अनुभव आपणास अनेकदा आलेला असतो. जीवनाच्या ज्या टप्प्यावर कुणाच्या तरी प्रोत्साहनाची गरज असते, तेव्हा त्यांनी आपणास प्रोत्साहन दिलेलं असतं. आपल्या सुप्तावस्थेतील गुणांचं त्यांनी कौतुक केलेलं असतं. ही माणसं ज्या क्षेत्रातील असतात, तिथं त्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसाही काही प्रमाणात उमटविलेला असतो. एकेकाळी त्यांच्याकडं पाहूनच आपणही काही स्वप्नं पाहिलेली असतात. बाहेरच्या जगाचा आपला तेव्हा फारसा संपर्कही आलेला नसतो. आपलं गाव म्हणजेच आपलं जग, हे तेव्हाचं वास्तव असतं. तेव्हा हीच माणसं आपणास खूप मोठीही वाटलेली असतात. त्यांनी दिलेलं मानसिक बळ आणि केलेली आपल्या गुणांची कदर, यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञताभाव आपल्या मनात असतो; पण आपण गाव सोडून बाहेर पडतो, आपल्या जाणिवेची क्षितिजं विस्तारतात, तेव्हा हीच माणसं आपल्याशी वेगळंच वागतात.

आई-वडिलांपेक्षा शेतीत आपण काहीतरी भव्यदिव्य करावं म्हणून मोठ्या उत्साहानं फळबागा लावतो. विहीर आटली, म्हणून विंधन विहीर, मोटार, नवीन पाइपलाइन करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज मंजूर करून घेतो; पण एकेकाळी शाळेत असतानाचा जिवलग मित्र जो आता गावच्या सोसायटीचा चेअरमन झाला, तोच कर्ज मिळू देत नाही.

गावाकडील ज्यांना आजवर आदरणीय मानलं, ते कुणी आपण राहतो त्या शहरात भेटले म्हणजे आपणास कोण आनंद होतो! त्यांचं आदरातिथ्य करावं म्हणून चांगल्या हॉटेलमध्ये त्यांना घेऊन जातो. ती माणसं आपली खुशाली विचारतात. आपण उत्साहाच्या भरात सगळं सांगतो. नव्यानं बांधलेल्या घराचं कौतुक, मुलाबाळांचं शिक्षण... आपण भाबडेपणानं, भरभरून बोलत राहतो अन्‌ काही वेळानं लक्षात येतं - आपलं हे सगळं ऐकून, त्यांचा चहा कडवट झाला आहे. मग आपण हिरमुसले होऊन गप्प बसतो. पुन्हा कधी गावाकडे गेलो तर ही माणसं आधीच्यासारखं आत्मीयतेनं बोलत नाहीत. सहज म्हणून चौकशी केलीच, तर घरासाठी घेतलेलं कर्ज अजून फिटलं की नाही एवढंच विचारतात.

अशी ही माणसं जवळच्या नात्यातील असतात. गावातील रोजच्या संबंधातील असतात. दूरच्या नात्यातील, भावकीतील कुणीही असू शकतात. एकेकाळी आपणाविषयी आस्था आणि आपुलकी असणाऱ्या माणसांच्या मनात असा सूक्ष्म, पण तीव्र मत्सर केव्हापासून अन्‌ का जागा झाला हे कळत नाही अन्‌ मग या माणसांशी कसं वागावं, या विचारानं आपण गोंधळून जातो. एकेकाळच्या उमद्या, सहृदयी माणसांचं हे खुरटलेपण पाहून आपण हळहळतो.

असं वागण्यामागं कदाचित त्यांचा आजवर झालेला भावनिक कोंडमारा अन्‌ नागरी समाजानं केलेली अवहेलना याचा राग तर ते आपणावर काढत नसावेत? अशावेळी मग आपली दुहेरी कुचंबणा होते. त्यांच्यासोबत वागताना त्यांच्या पातळीवर न जाता अन्‌ मनाचा तोल ढळू न देता त्यांचं हे असं वागणं सहृदयतेनं समजून घेणं एवढेच आपल्या हाती उरतं.

Web Title: sheshrao-mohite articles