शाळकरी पोराटकीपणा

शाळकरी पोराटकीपणा

वय वाढले तरी कित्येकदा आपल्याला व्यवहारीपणे वागता येत नाही. कधी तरी रस्त्यात आदरणीय व्यक्ती भेटते. वयाने, ज्ञानाने, कर्तृत्वाने ती मोठी असते. आपण न कळत तिच्यासमोर नतमस्तक होतो. आजूबाजूच्या गर्दीचे आपले भान सुटते. आपले हे भारावलेपण बघून ती व्यक्ती नकळत म्हणून जाते, "या एकदा निवांत वेळ काढून घरी.' आणि आपण हवेत तरंगायला लागतो. भाबडेपणानं ते निमंत्रण स्वीकारतो आणि फोन न करता, पूर्वकल्पना न देता त्या व्यक्तीच्या घरी जाऊन धडकतो. एखादे आगंतुक "परचक्र' घरात घुसल्यासारखी त्या व्यक्तीची अवस्था होते. त्यांचे अवघडलेपण अन्‌ वागण्यातील कोरडेपणा पाहून आपण गोंधळून जातो. बळेबळे दिलेला चहा आणि त्यांनी वरवरची केलेली थातूरमातूर चौकशी पाहून, कधी एकदा इथून बाहेर पडू असे होऊन जाते.

कधी तरी साहित्यिक, सांस्कृतिक वा वैचारिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आपल्या गावात येते. त्यांचे व्याख्यान किंवा गायन असते. आपण त्या कार्यक्रमाला जातो. समोरच्या रांगेतील खुर्च्या रिकाम्या असतात, पण त्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी म्हणून तिथे बसण्याचा उद्धटपणा आपण करीत नाही. योग्य जागा बघून आपण बसतो, स्वतःहून कुणाची ओळख करून घेणे आणि स्वतःची ओळख करून देणे आपल्याला जमत नाही. पण कधी तरी एखाद्याचे व्याख्यान किंवा गायन अप्रतिम होते. आपल्याला राहवत नाही. कार्यक्रम संपला म्हणजे आपण त्या पाहुण्यांचा हात हातात घेतो. मनापासून त्यांना दाद देतो. कधी तरी "मी अमूक तमुक' म्हणून स्वतःची ओळख सांगतो. तोवर तो पाहुणा कोरडा कटाक्ष टाकून निघून जातो आणि आपण मनातल्या मनात खट्टू होतो.

माझे कथाकार मित्र मधुकर धर्मापुरीकर, स्वतः ताकदीची कथा लिहिणारा हा माणूस एकेदिवशी फोनवर म्हणाला, ""अरे यार ! त्या अमूक नाटककाराचं ललित गद्याचं पुस्तक काय भन्नाट आहे ! असं लेखन वाचताना वाटतं, आयुष्यात असं इतकं तरल, संवेदनशील आपणास कधी तरी लिहिता येईल का?'' अन्‌ पुढे थोड्या हळव्या स्वरात म्हणाला, ""अरे ! हे पुस्तक वाचून झाल्यावर मला राहावलं नाही. खूप खटपट करून त्यांचा फोननंबर मिळवला अन्‌ फोन केला. मी इकडून इतकं भरभरून बोलतोय, तर त्यांचा कसलाच प्रतिसाद नाही !'' थोडा वेळ तो थांबला, म्हणाला, ""अरे यार, आपला हा शाळकरी पोराटकीपणा कधी जायचा राव !'' मी म्हणालो, ""आपणाकडे हा शाळकरी पोराटकीपणा जिवंत आहे, तोवर समजायचं आपल्यातला लेखक जिवंत आहे.'' या व्यवहारी जगात वावरताना आपण अनेकदा पोराटकी ठरतो. पण त्याने काय बिघडते? अवतीभवतीच्या जीवनातील अस्थिरता, अस्वस्थता, तरलता जेवढी या स्वतःचे पोराटकीपण जपणाऱ्यांना भिडते, कळते, तेवढी ती तथाकथित व्यवहारी लोकांना कळली असती, तर अस्थिरतेच्या उंबरठ्यावर जीवन जगणाऱ्यांना आज किती मोठा दिलासा मिळाला असता?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com