भाष्य : प्रचार व्यवस्थापनाचे बदलते आयाम

‘निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन’ या संकल्पनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं.
BJP
BJPSakal
Summary

‘निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन’ या संकल्पनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं.

आभासी जगात मतदारांवर प्रभाव टाकण्याचं कौशल्य सर्वांनीच आत्मसात केलं. पण याचं रुपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये करण्यासाठी आभासी प्रतिमेला वास्तवाचे स्वरुप देण्याची गरज असते. संवाद रचनेइतकंच महत्त्व आहे, पक्षरचना व पूरक वैचारिक संस्थांच्या पाठबळाला.

‘निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन’ या संकल्पनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. भारतीय जनता पक्षाचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल प्रचाराचा मारा करून निवडणुकीची गणितं बदलली, अशी चर्चा आज सात वर्षांनंतरही कायम आहे. भाजपच्या ‘डिजिटल आर्मी’च्या धर्तीवर काँग्रेसपासून सर्वच पक्षांनी आपापल्या डिजिटल समूहांना बळ देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पक्षाने स्वतःची ‘डिजिटल आर्मी’ तयार करण्यावर भर दिला. माध्यम प्रतिनिधी ते सर्वसामान्य जनता असे सगळेच डिजिटल ध्रुवीकरणाचा कळत नकळत भाग बनत गेले आहेत. पण केवळ डिजिटल ध्रुवीकरणामुळेच निवडणुकांचे निकाल लागतात, बदलतात हा समज ताज्या निवडणूक निकालांनी खोडून काढला आहे.

प्रचाराची लक्षवेधक थीम, त्याच्या भरपूर जाहिराती, आमिषांची खैरात, जोडीला धार्मिक ध्रुवीकरणाची डिजिटल फोडणी दिली की, तुम्हाला हव्या तश्या निवडणुका जिंकता येतात, असं सर्वसामान्य गृहितक २०१४ ते २०१९ च्या निवडणुकांदरम्यान बनत गेलं. पण हेच पुरेसं असेल तर अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी करूनही भाजपने हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा का बनवला नसेल? ‘लडकी हूं लड सकती हूं’ या घोषणेला उत्तर प्रदेशात सरसकट सर्व महिलांचं पाठबळ का मिळालं नसेल? पाच पैकी चार राज्यात भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्तेत येणं आणि पंजाबात ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळणं या घटनांकडे बघतांना निवडणूक प्रचार व्यवस्थापनाच्या पद्धतीत होणाऱ्या बदलांवर चर्चा होणे गरजेचे आहे.

डिजिटल म्हणजे ‘हायपरलोकल’

यंदाच्या पाच राज्यांच्या निवडणुकीत डिजिटल प्रचाराचे सरसकटीकरण न होता अधिक सुलभीकरणच बघायला मिळाले. आशय आणि तंत्रज्ञान अशा दोन्हींमध्ये हायपरलोकल पर्यायांचा वापर करण्यावर अधिक भर राहिला. वय, आर्थिक, सामाजिक घटक अशा विविध घटकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांनी या रचनेचा उपयोग केला. यामध्ये लक्ष्याधारित दृष्टिकोन (targeted approach) आणि सातत्य टिकवून ठेवणाऱ्या पक्षांना तुलनेने अधिक यश मिळालेलं दिसून येतं. भाजपने ही रणनीती यावेळीही जुळवून आणली. त्यामुळे त्यांच्या उत्तर प्रदेशातल्या प्रचाराच्या प्रत्येक फेरीत मुद्दे आणि रचना यात फरक दिसून आला. ‘आप’नेही अशीच रचना पंजाब आणि गोवा या राज्यांत उभी केली होती. पंजाबसोबत गोव्यातही ‘आप’ला त्याचे परिणाम निकालातून मिळाले आहेत. अशाच रचना इतर पक्षांनीही निवडणूक प्रचारात राबवल्या. पण तुलनेने त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यामागे निवडणूक प्रचार व्यवस्थापनातील इतर मुद्दे महत्त्वाचे आहेत.

गेल्या काही वर्षात निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रचाराचा ओघ इतका होता की, सर्व पक्षांनी आपापल्या सोयीने हिंदुत्व अंगीकारून त्याला आपल्या संवादाचा भाग बनविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काँग्रेससारख्या पक्षांची मूळ विचारधारा मात्र सर्वच पातळ्यांवर मागे पडतांना दिसली. परिणामी स्वतःची हक्काची वैचारिक बांधणी असलेलं संघटन आणि पर्यायी मतदारांची बांधणी करण्यात काँग्रेससह सर्वच पक्षांना येत्या काळात प्राधान्य द्यावं लागणार आहे.

डिजिटलचा प्रसार वाढला तशी माहितीबद्दलची जागरुकताही वाढत आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणेत फक्त डिजिटल आशयाचा भडिमार पुरेसा नसतो, तर त्याला पक्ष संघटनेच्या ऑफलाईन उपक्रमांची जोड द्यावी लागते. त्यासाठी पक्षाचा हक्काचा मतदार (वोट बँक) आणि अपेक्षित मतदार समजून घ्यावा लागतो. त्यानुसार अनुकूल पक्षरचना उभारावी लागते. ही रचना ऑनलाईन व ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारे उभी करावी लागते. त्यानंतर सुरू होतो मतदारांचा कौल.

मतदार ओळखा

मतदार समजून घेतांना मतदारांची स्त्री आणि पुरुष अशी प्राथमिक विभागणी होते. त्यानंतर शहरी आणि ग्रामीण अशी विभागणी होते. त्यापुढे जाऊन नवमतदार, जाती-समूह अशी घटकांच्या आधावरही मतदारांची विभागणी होते. या प्रत्येक घटकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा वेगवेगळ्या आहेत. मतदारांना आवाहन करताना प्रत्येक समूहाच्या अपेक्षा आणि आकांक्षा समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. आपल्या कारभारातून आणि त्यानंतर संवाद आणि प्रचार नियोजनातून या मुद्द्यांवर मांडणी करणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. डिजिटल प्रचाराचा प्रभाव वाढण्याच्या काळात या विभागणीला अधिक महत्व येते आहे.

निवडणूक व्यवस्थापनाच्या बदलणाऱ्या पद्धतीत माहितीच्या साठ्याचे (data) मूल्य वाढते आहे. ही माहिती वेगवेगळ्या स्वरुपात मिळवली जाते आणि वापरलीही जाते. यात वय, लिंग, शहर अशा स्थायी माहितीसोबतच आवडी-निवडीचे कल, तसेच सामाजिक, राजकीय घडामोडींवर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया यांचीही सातत्याने नोंद घेऊन संवाद रचनेत बदल केले जात आहेत. वर्तणुकीच्या नोंदी ठेवण्यापासून ते आकलन तयार करण्यापर्यंतच्या (Behavioural tracking ते Perception Building) प्राथमिक पातळीवर सुरू झालेला हा प्रवास येत्या काळात आकांक्षांची बांधणी करण्यापर्यंत गेला तरी आश्चर्य वाटू नये, अशी सध्याची परिस्थिती आहे.

विचारधारांची इको सिस्टिम

आभासी जगात मतदारांवर प्रभाव टाकण्याचं कौशल्य सर्वांनीच आत्मसात केलं. पण याचं रुपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये होत असताना आभासी प्रतिमेला वास्तवाचे स्वरुप देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे परिवर्तनाच्या या प्रक्रियेत संवाद रचनेइतकंच महत्व आहे - पक्ष रचना आणि पक्षाला पूरक वैचारिक संस्थांच्या पाठबळाला. एकेकाळी सहकार आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमांतून सत्तेची गणितं जुळवणाऱ्यांपासून आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा इतर पक्षांच्या वैचारिक पाठबळावर आधारित सत्तारचनेपर्यंतचा हा प्रवास हेच पुन्हा अधोरेखित करणारा आहे. निवडणूक व्यवस्थापनात अशा संस्थांचा उपयोग करून घेण्यासाठी मतदारांच्या बदलणाऱ्या गरजा ओळखून दूरगामी परिणाम करणारे निर्णय आणि धोरणं ठरवण्याची अपेक्षा येत्या काळात आवश्यक असेल. विचार आणि विकासाची दृष्टी देणारी एक संपूर्ण पिढी उभी करत नेण्याचं खडतर आव्हान सध्याच्या विरोधी पक्षांसमोर असेल.

माहितीचा वेग, वाढतं शहरीकरण लक्षात घेता सततच्या राजकीय घडामोडी, त्यामुळे होणारा संवाद, दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया यांचाही समाजमानवर दीर्घकालीन परिणाम होत जातो, हे समजून घ्यावं लागेल. याशिवाय स्थानिक उपक्रम आणि पक्षीय कार्यक्रमांचाही उपयोग मतदारांना प्रभावित करण्यासाठी होतो, याची जाणीव ठेवून रचना उभी करावी लागेल. त्यामुळे येत्या काळात केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदारांकडे जाण्याऐवजी राजकीय पक्षांनी निवडणूक व्यवस्थापनाचे क्षितीज अधिक विस्तारीत करणे आणि त्यानुसार कार्यवाही केली पाहिजे. अधिक व्यापक दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थापनाकडे बघणं म्हणूनच अधिक सयुक्तिक ठरेल. हा बदल केवळ केंद्रीय निवडणुकांसाठीच नाही तर स्थानिक निवडणुकांपासून सुरू करावा लागेल.

shital.pawar@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com