कोकणचे अर्थकारण धोक्‍यात

mango
mango

कोकणची संपन्नता इथल्या पीक पद्धतीमुळे आहे. कमी क्षेत्रात जास्त पैसे मिळवून देणारी येथील पिके लाखो कुटुंबांची पोशिंदी आहेत. काही गुंठे शेतजमीन असणारे कुटुंबही कोकणात खाऊन-पिऊन सुखी असते; पण वातावरणातील सततच्या बदलामुळे हा पोशिंदाच अस्थिर झाला आहे. मुंबईसह कोकणचा विचार केला तर रायगडपासून मुंबईपर्यंत औद्योगिकरणाचा प्रभाव दिसतो; मात्र तळकोकणाकडे सरकताना प्रामुख्याने कृषी, मासेमारी हेच उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आढळतात. पर्यटन वाढत असले तरी त्यालाही खूप मर्यादा आहेत; मात्र शेतीतील उत्पन्नातून लाखो कुटुंब पिढ्यानपिढ्या जगत आहेत. कोकणात जवळपास ४ लाख हेक्‍टरवर फळबागा आहेत. शिवाय भात, नाचणी इत्यादी पिके घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलाचा परिणाम कोकणावर जाणवू लागला आहे. समुद्राजवळ असल्याने प्रभाव अधिक जाणवतो. अलिकडचे निसर्ग चक्रीवादळ याचेच उदाहरण. आताही कोकणात अवकाळी पावसाची झोड होती. गेल्या पाच-दहा वर्षात थंडी आणि पावसाचे वेळापत्रक पार कोलमडलंय. उन्हाळाही अधिक प्रखर झालाय. याचा थेट परिणाम कोकणच्या हापूस, काजूसह कोकम, नारळ, सुपारीवर जाणवतो. कोकणची ओळख असलेल्या हापूससाठी हे बदल सर्वाधिक धोकादायक आहेत. हापूस संवेदनशील पीक; मात्र यातले उत्पन्न लक्षात घेवून मधल्या काळात कोकणात लागवड क्षेत्र खूपच वाढले. जवळपास १.६५ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. इथली आंब्याची उत्पादकता २.५०टन प्रति हेक्‍टरी आहे. कोकणचा हापूस आपल्या गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रंग, आकार, टिकाऊपणा यामुळे परदेशातही मागणी असते; मात्र ही वैशिष्ट्ये हापूसमध्ये उतरण्यात विशिष्ट तापमानाची भूमिका महत्त्वाची असते. आंबा मोहोरासाठी १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली, तर फलधारणेसाठी २० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हवे असते. पाऊस किती पडतो यापेक्षा तो केव्हा पडतो हे आंब्यासाठी महत्त्वाचे. मोहोर येण्याच्या काळात पाऊस झाला तर पालवी येण्याची शक्‍यता वाढते. मोहोर यायला सुरवात झाल्यानंतर पाऊस झाला तरीही फलधारणेवर परिणाम होतो. ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उष्णता अचानक वाढली तर गळ, फळांवर डाग असे होते. 

फवारणीचा खर्च डोईजड
हापूससाठीच्या आदर्श वातावरणासाठी ऋतुचक्र बदलून चालत नाही; मात्र दहा वर्षात वातावरणातील बदलांचे प्रमाण चढत्या क्रमाने आहे. याचा थेट परिणाम हापूसच्या उत्पादन आणि दर्जावर होत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे रोगही वाढत आहे. साहजिकच औषध फवारणी व इतर खर्च वाढून उत्पादन खर्चाचे गणित बिघडतंय. या सगळ्याचा परिणाम म्हणून कोकणात नव्याने आंबा लागवडीबाबत निरूत्साह वाढतोय. वातावरणीय बदल असेच सुरू राहिल्यास हापूस कितपत परवडेल, हा प्रश्‍न आहे. मात्र, या पिकावरच कोकणचे अर्थकारण आणि हजारो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. आंब्याबरोबरच काजूचे क्षेत्रही मोठे आहे. हे पीक तुलनेत प्रतिकूल स्थितीतही तग धरणारे. मात्र अलिकडे काजूच्या संकरीत जातींची लागवड होते. व्यवस्थापन व्यापारी तत्त्वावर होते. खते, किटकनाशके, जलव्यवस्थापन करून बागा उभ्या केल्या आहेत; पण त्यावरही हवामान बदलाचा प्रभाव जाणवतोय. पहिल्या आठ ते दहा वर्षातच काजू कलमे रोटा लागून मरण्याचे प्रमाण वाढले आहे. किडीमुळे मोहोर राखणे कठीण बनले आहे. सुपारी, नारळ या पिकाबाबतही अनेक अडचणी आहेत.

मासे मिळण्यावरही परिणाम
वातावरण बदलाचा फटका कोकणच्या अर्थकारणाचा दुसरा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या मासेमारीलाही बसत आहे. वातावरण बदल, वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी हंगामाचे दिवस घटत आहेत. समुद्रातील जलप्रवाह बदलत असल्याने मासे मिळण्यात घट होताना दिसते. मासे मिळण्याचे प्रमाणही विषम होत आहे. जागतिक तापमान वाढीचा शास्त्रज्ञांचा अंदाज खरा ठरला, तर मासे मिळण्यावर आणखी परिणाम होण्याची भीती आहे. एकूणच वातावरण बदलाचा गंभीर परिणाम कोकणच्या अर्थकारणावर होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दहा वर्षात याची तीव्रता वाढूनही त्यावर ठोस संशोधन होताना दिसत नाही. अशीच स्थिती राहिल्यास कोकणचे अर्थकारण अडचणीत येईल. त्याचा थेट परिणाम इथल्या रोजगारावर होण्याची शक्‍यता आहे. 

...तर संकट आणखी गडद
वातावरण बदल थोपवणे सहज शक्‍य नाही; मात्र नेमके बदल आणि त्याचे परिणाम यावर प्रभावी संशोधनाची गरज आहे. कोकणची भौगोलिक रचना, पीक पद्धत वेगळी आहे. त्यामुळे कोकणावर होणाऱ्या वातावरण बदलाच्या परिणामांबाबत वेगळे संशोधन आवश्‍यक आहे. पारंपरिक पीक पद्धत टिकवण्याबरोबरच पर्यायी पिकांबाबतही संशोधन गरजेचे आहे. अन्यथा, वेळ हातातून गेली तर कोकणचे अर्थकारणही पूर्णतः कोलमडण्याची भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com