युतीतील आपटबार (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

शिवसेना- भाजपमध्ये  आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर  निवडणूक निकालानंतरच मिळेल.

शिवसेना- भाजपमध्ये  आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर  निवडणूक निकालानंतरच मिळेल.

पं तप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात विविध विकास योजनांचे उद्‌घाटन करत असताना, तिकडे मराठवाड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युतीची चर्चा गेली खड्ड्यात!’ असे जाज्वल्य उद्‌गार काढून भारतीय जनता पक्षाला सणसणीत उत्तर दिले आहे. अर्थात, हे उत्तर मोदी यांना नव्हे, तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांना होते. शहा यांनी चारच दिवसांपूर्वी लातूरमध्ये, शिवसेना बरोबर आली नाही, तर ‘उनको पटक देंगे!’ अशा तिखट शब्दांत शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर आता या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा ‘कलगीतुरा’ जोरात सुरू झाला आहे. खरेतर पंढरपुरात विठ्ठलाच्या साक्षीने उद्धव यांनी ‘चौकीदार चोर है!’ या राहुल गांधी यांनी लोकप्रिय केलेल्या वाक्‍याचा आधार घेऊन, थेट मोदी यांना लक्ष्य केले, तेव्हाच या दोन्ही तथाकथित मित्रपक्षांमधील संबंध किती विकोपाला गेले आहेत, ते स्पष्ट झाले होते. त्यामुळे मोदी हे महाराष्ट्राच्या भूमीवर आल्यावर उद्धव यांना काही प्रत्युत्तर देतील काय, याबाबत उत्सुकता होती. प्रत्यक्षात मोदी यांनी भाषणात शिवसेनेचा उल्लेखही केला नाही आणि राहुल यांना लक्ष्य करण्यावरच समाधान मानले. ही भाजपची सावधगिरीची खेळी असू शकते. दोघांत कमालीची कटुता निर्माण झालेली असूनही कदाचित युती झालीच तर त्या वेळी शिवसेनेवर टीका न करणारे मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, म्हणूनच ही काळजी घेतली असावी. शिवसेनेच्या जहरी टीकेनंतरही प्रदीर्घ काळ मौन बाळगणाऱ्या भाजपने आता प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी अमित शहा यांच्यावर सोपवलेली दिसते.

लोकसभा निवडणूक शिवसेनेला साथीला घेऊन लढल्यानंतर मिळालेल्या बहुमतानंतर भाजपला पंख फुटले आणि त्यानंतर चारच महिन्यांत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी २५ वर्षे असलेली युती तोडून भाजपने ‘शतप्रतिशत’चा प्रयोग करून बघितला. त्यानंतर महिनाभरातच भाजपशी प्राणपणाने लढलेली शिवसेना थेट सरकारात सामील झाली! या कोलांटउडीनंतरही शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडणे थांबविले नव्हतेच. मात्र, पंढरपुरात उद्धव यांनी थेट मोदी यांची संभावना अप्रत्यक्षपणे ‘चोर’ अशी केल्यानंतर शिवसेनेच्या दुसऱ्या- तिसऱ्या फळीतील नेत्यांनाही जोर चढला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सहकारी रामदास कदम यांनीही मंगळवारी ‘आम्हाला पटकू पाहणाऱ्यांना गाडून टाकू!’ असा वार अमित शहा यांच्यावर केला. मात्र, त्यानंतरही भाजपचे राज्यातील नेते सावधच असल्याचे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ‘लोकशाहीत कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार असतो,’ या उत्तरावरून दिसून आले. त्याचवेळी महाराष्ट्र भाजपचे प्रमुख प्रवक्‍ते माधव भांडारी यांनी, ‘शिवसेनेबाबत प्रतिक्रिया व्यक्‍त न करण्याचा धोरणात्मक निर्णय’ असल्याचे सांगितले आहे. या सावधगिरीचा अर्थ स्पष्ट आहे. शिवसेनेबरोबरचे संबंध इतके विकोपाला गेल्यानंतरही युती होईल अशी अंधूक का होईना, आशा भाजपला असल्याचे दिसते. एकेक मित्रपक्ष गळून पडत असताना, भाजपला आता शिवसेनेची गरज पूर्वी कधी नव्हे इतकी वाटू लागली, हेच याचे कारण आहे.

मात्र, उद्धव यांनी ‘युतीची चर्चा गेली खड्ड्यात!’ असे उद्‌गार बुधवारीच काढले असले, तरी युती न झाल्यास महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत खरोखर खड्ड्यात कोण जाणार, याची जाणीव या दोन्ही पक्षांना असणार. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होणार, हे जवळपास निश्‍चित आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत युती आणि मोदी यांनी निर्माण केलेली हवा यामुळे भाजपने २३, तर शिवसेनेने १८ अशा एकूण ४१ जागा जिंकल्या होत्या आणि हा युतीच्या राजकारणपर्वातील विक्रमच होता. आता मोदी यांच्या लोकप्रियतेची सुरू असलेली घसरण, साडेचार वर्षांच्या कारभारातील उणिवा आणि त्याचवेळी राज्यभरात शेतकरी व बेरोजगार यांच्यात कमालीचा असंतोष आहे. त्यामुळे युती न झाल्यास शिवसेना व भाजप मिळून जेमतेम २०-२२ जागा जिंकू शकतील, असा अंदाज वर्तविला जातो. त्यापलीकडली बाब म्हणजे युती न झाल्यास शिवसेनेचे काही खासदार- आमदार थेट भाजप छावणीत जाऊ शकतात, हे उद्धव यांना ठाऊक असणारच. अमित शहा यांनी आपल्या आवाजाची पट्टी लातूरमध्ये कमालीची वाढवली, त्याचे हेही एक कारण असू शकते. त्यामुळेच इतके दिवस शिवसेना- भाजपमध्ये सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर आता थेट खडाखडीत झाले असले, तरी प्रत्यक्षात कोण कोणाला पटकणार आणि कोण खड्ड्यात जाणार, या प्रश्‍नाचे उत्तर लोकसभेच्या निकालानंतरच मिळणार, हे उघड आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena bjp politics in editorial