आलिंगनाआधी ‘नजराणा’ (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते.

शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते.

शि वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखेर सात वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे काम गती घेऊ लागले आहे! अर्थात, लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्या नसत्या, तर या कामाला मुहूर्त नेमका कधी लाभला असता, ते सांगता येणे कठीणच आहे. बाळासाहेबांच्या या स्मारकासाठी गेल्या काही महिन्यांत झपाट्याने हालचाली झाल्या आणि अखेर गेल्या महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत हक्‍काची तीनही राज्ये भारतीय जनता पक्षाला गमवावी लागल्यामुळेच या स्मारकासंदर्भात झपाट्याने हालचाली सुरू झाल्या, ही बाब उघड आहे. या पराभवानंतर भाजपला मित्रपक्षांची गरज कधी नव्हे एवढी भासू लागली आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बाळासाहेबांच्या ९२व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांच्या मोठ्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या सरकारात शिवसेना सामील असूनही गेल्या चार-साडेचार वर्षांत ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’तील-एनडीए या दोन सर्वांत जुन्या मित्रपक्षांचे कमालीचे ताणले गेलेले संबंधच या स्मारकास झालेल्या विलंबास कारणीभूत आहेत. मात्र, मुंबई महापालिकेची सत्ता हातात असतानाही शिवसेनेला या स्मारकासाठी उचित जागा मिळवण्यास इतका विलंब का लागला? शिवसेना या स्मारकासाठी मुंबईत शिवाजी पार्कलगतचे महापौर निवासच मिळावे म्हणून अडून बसली, हेच त्याचे कारण आहे. मुंबईच्या सागरतीरी वसलेली ‘महापौर निवास’ ही पुरातन वास्तू कायद्याखालील संरक्षित वास्तू आहे आणि त्यामुळेच हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अखेर शिवसेनेची मैत्री अभंग राखण्यासाठीच प्रथम सरकारने ही वास्तू या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी १०० कोटींची तरतूदही केली! एका अर्थाने येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आपली साथ सोडू नये, यासाठी भाजपने सरकारी तिजोरीतून शिवसेनेला बहाल केलेला हा ‘नजराणा’च आहे!

अर्थात, यानंतरही शिवसेना-भाजप दरीचा प्रश्‍न अनिर्णीतच आहे आणि त्यास प्रामुख्याने संसदेत मागील दाराने म्हणजेच राज्यसभेच्या माध्यमातून प्रवेश करणाऱ्या काही नेत्यांची भूमिका कारणीभूत आहे, असा दावा थेट निवडणूक लढवणारे शिवसेनेचे खासदार करत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून, भाजपने शिवसेनेला अपमानास्पद वागणूक दिली, हे खरेच. गेल्या लोकसभेत या दोन पक्षांनी एकदिलाने निवडणुका लढवून राज्यातील ४८ पैकी ४३ जागा जिंकल्या होत्या. या यशानंतर भाजपला आपले ‘शतप्रतिशत भाजप’चे स्वप्न दिसू लागले आणि चारच महिन्यांत आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेबरोबरच्या आपल्या ‘युती’ला तिलांजली दिली. तेव्हापासून आणि पुढे शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतरही या दोन कथित मित्रांमध्ये कमालीचा संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर अखेर भाजपशी निवडणुकांच्या राजकारणात कधीही युती न करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर शिवसेना नेते, पदाधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी यांच्या मेळाव्यात या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करून घेणे, हा निव्वळ उपचार होता. पण आता निवडणुका अगदीच तोंडावर आल्यावर शिवसेनेच्या विद्यमान लोकसभा सदस्यांना भाजपविना जनतेला सामोरे जाणे अवघड वाटू लागले आहे. उद्धव ठाकरे भले या ‘युती’चा हट्ट धरणाऱ्या खासदारांना ‘भाजपला अंगावर घ्यायची ताकद नसेल तर बाहेर पडा,’ असे इशारे देत असले, तरी तसे खरेच झाले तर ती शिवसेनेतील फूट असू शकते. शिवाय, हे विद्यमान खासदार बाहेर पडलेच तर भाजप त्यांना उमेदवारी देणार नाही कशावरून? त्याचवेळी शिवसेनेच्या चार मंत्र्यांनीदेखील ‘युती’साठी आग्रह धरल्याचे वृत्त आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त साधून, त्यांच्या स्मारकाच्या स्थळावर झालेल्या गणेशपूजनाच्या सोहळ्यास फडणवीस जातीने उपस्थित राहिले. त्याचे प्रमुख कारण अर्थातच भाजपला शिवसेनेची गरज आता कधी नव्हे इतकी भासू लागली आहे, हेच आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांची आघाडी होणार आणि शिवाय अन्य काही समविचारी पक्षांनाही या आघाडीत स्थान मिळणार, हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वाच्या नावाने ललकाऱ्या देणारे शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात लढले, तर निकाल काय लागतील, हे उघड आहे. त्याचीच धास्ती थेट निवडणुकांच्या मैदानात उतरणाऱ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना वाटते आहे. भाजपने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी बहाल केलेली ‘महापौर निवासा’ची देखणी वास्तू आणि १०० कोटी रुपयांची तरतूद या पार्श्‍वभूमीवर सूचक कृती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भाजपबद्दलची भूमिका मवाळ झाली आणि हिंदुत्व तसेच राममंदिर ही दोन कारणे पुढे करत शिवसेनेने भाजपला प्रेमालिंगन दिले, तर त्यात नवल वाटण्याजोगे काहीच नसेल!

Web Title: shivsena bjp politics in editorial