शिवसेनामुक्‍त भारतीय जनता पक्ष?

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल.

भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल.

महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे भांड्याला भांडी लागायची, वस्तू परस्परांना फेकून मारण्यापर्यंत परिस्थिती जायची; पण भांडून झाले की सत्तेसाठी दोघेही एकत्र यायचे. ‘कमळाबाई’ म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिणवायचे. त्यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे सहन करावे लागे, असे भाजप नेते म्हणायचे. बाळासाहेबांचे हे बोल खरे तर स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारे; पण महाराष्ट्रासारख्या प्रतिकूल राज्यात थोडी तरी राजकीय जागा मिळावी म्हणून ते बोल गिळले जायचे.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासारखे बडे नेतेही हा विषय सोडून द्यायचे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’ला पाठिंबा न देता कधी मराठी उमेदवाराचा मुद्दा पुढे नेत, तर कधी प्रणव मुखर्जी यांच्या विद्वत्तेचा मान राखत शिवसेना थेट विरोधी बाजूला मतदान करायची.

‘सत्तातुराणाम न भयं न अभिमान’ या न्यायाने हे सारे निभावून नेले जायचे. भाजपच्या या पडत्या घेण्याला शिवसेना इतकी सरावली होती, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच भाषा कायम ठेवली गेली. अतिआक्रमक, काँग्रेसमुक्‍तीचा बेलगाम नारा देणारे मोदी-शहांचे पर्व भाजपमध्ये सुरू झाले, याची दखल शिवसेनेने पूर्वानुभवामुळे घेतली नाहीच. लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये पराभव झाल्याने गोंधळलेल्या भाजपने पुन्हा एकदा शिवसेना बरोबर यावी म्हणून पडती बाजू घेतली. पंढरपूरच्या सभेत शिवसेनेचे नवे कर्तेधर्ते उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी जाहीर टीका केली होती. सत्तासुंदरी दूर पळू नये, या एकमेव भावनेने मोदी- शहांनीही या विरोधाला नजरेआड केले. या प्रकारामुळे शिवसेना सोकावली. सत्तेची पदे पन्नास- पन्नास टक्‍के वाटून घेण्याचे भाजपचे धोरण हाच परवलीचा शब्द मानला गेला. ‘युतीचा धर्म’ हा केवळ बोलण्याच्या बाता आहेत, अशी सोयीस्कर समजूत करून घेत विधानसभेच्या जागावाटपात एकीकडे कमी जागा स्वीकारल्या; पण कणकवली, माण या दोन मतदारसंघांत ‘एबी’ फॉर्म दिले गेले.
भाजपही लोकसभा निवडणुकीचे निकाल अन्‌ काश्‍मीरबाबतचे ३७०वे कलम रद्द झाल्याच्या हवेत होता, त्यामुळे आपण सहज १३०चा टप्पा गाठू, असा फाजील आत्मविश्‍वास निर्माण झाला होता. निकालाने १०५ वर भाजपला आणून ठेवले आणि शिवसेनेचा स्वाभिमान पुन्हा फणा काढून वर आला. उद्धव ठाकरे हे धोरणी नेते, प्रतिकूलतेत पक्ष पुढे नेणारे; पण खासदार व संपादक संजय राऊत सकाळ- संध्याकाळ बोलत राहिले. भाजपऐवजी अन्य पक्षांशी चर्चा करता येईल, असे खुद्द पक्षप्रमुख सांगू लागले. युतीधर्म असा असतो काय, याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांना तर पडला असणारच; पण तो भाजपच्या दिल्लीकर नेत्यांना भेडसावू लागला. कदाचित प्रथमच. समसमान जागा म्हणजे मुख्यमंत्रिपद असा अर्थ लावणाऱ्या शिवसेनेला आपण केवळ ५७ जागा जिंकू शकलो आहोत, भाजपच्या जागा त्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत याचा सोयीस्कर विसर पडला. समसमान मतदारसंघ मागितले गेले का नाहीत, ‘मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याच्या भाजपच्या प्रचारावर आक्षेप का घेतला नाही, असे प्रश्‍न राऊतांना विचारताच येणार नाहीत, असा त्यांचा आविर्भाव असे. आता भाजपने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. खरे तर समवेत असलेल्या सहकाऱ्यांना, वाटचालीत साथ देणाऱ्या पक्षांना मागे टाकून पुढे जाण्याचा स्वभाव आता भाजपने आक्रमकपणे स्वीकारला आहे. वाद घालत भांडत-तंटत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अचानक झालेली युती जशी मतदारांनी डोक्‍यावर घेतली नाही, तशी युतीतील कलागत कार्यकर्त्यांनी घृणास्पद मानली. निकालानंतरही ‘महाराष्ट्र उपऱ्यांना स्वीकारत नसतो’ असा सूर मुखपत्रातून लावला गेला. ही औद्धत्याची परिसीमा आहे, असा निवाडा देत श्रेष्ठींनी ‘शिवसेनेला जागेवर आणा’ असे निरोप फडणवीस यांना पाठवले हे निश्‍चित आहे. फडणवीसांच्या चांगुलपणामुळे भाजपने जवळपास बरोबरीत जागा जिंकूनही मुंबई महापालिकेच्या चाव्या शिवसेनेकडे सोपवल्या गेल्या, याचेही स्मरण शिवसेनेने ठेवले नाही.
भाजप-शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले. आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. बडे पक्ष कायमच छोट्या पक्षांना संपवत असतात. मोदी- शहांचे राजकारण आक्रमक आहे, ते महाराष्ट्रातील फडणवीस आणि गडकरींप्रमाणे सामोपचाराचे नाही. भाजपला ३०३ चा टप्पा गाठता आला तो नव्या आक्रमकतेमुळे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण एकुणातला घटनाक्रम भाजपची वाटचाल शिवसेनेपासून मुक्‍ती घेण्याकडे असावा. ते शक्‍य आहे काय, महाराष्ट्रात तेवढी संघटनात्मक ताकद भाजप बाळगतो काय, हे पुढचे प्रश्‍न आहेत. त्याची उत्तरे मिळतील तेव्हा मिळोत; पण आता संसार बेकीकडे सरकतो आहे, याची जाणीव शिवसेनेने ठेवलेली बरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsenafree bjp party politics