या चिमण्यांनो, परत फिरा रे...

shiwani wakil
shiwani wakil

आमच्या घरालगत एक जुनं घर होतं. त्या घराच्या बंद खिडक्‍यांजवळ, पत्र्यांवर अधूनमधून चिमण्या, कावळे, कधी कबुतरं यायची. आमच्या खिडकीतून ते दिसे. पण खिडकीपाशी जाताना आवाज आला, की चिमण्या उडून जात. तिथं पक्षी येतात हे लक्षात आल्यावर आम्ही तिथं तांदूळ, ज्वारी टाकू लागलो. पण पक्षी दिसल्यावर धान्य टाकलं की ते दचकायचे आणि उडून जायचे. मग आम्ही ते येण्याआधीच धान्य टाकायचो. मग सकाळी हळूहळू चिमण्या येऊन दाणे टिपायच्या. काही दिवसांनी त्या घराच्या कौलांजवळ चिमण्यांची वर्दळ वाढली. त्या चोचीतून काड्या, कापूस घेऊन येताना दिसू लागल्या. त्या घरटी बांधत होत्या. आता आम्ही दाणेच नव्हे, तर भात, पोळी, भाकरीचे तुकडेसुद्धा घालू लागलो. काही वेळा चिवडा, भडंग, खाऊच्या डब्यातील चुरासुद्धा. असे पदार्थ ते आवडीने टिपत. त्यांचा धान्यापेक्षा इतर खाण्याला असलेला ‘प्रेफरन्स’ पाहून गंमत वाटे. त्यातला एखादा पक्षी पोळी-भाकरीकडे दुर्लक्ष करून दाणे टिपू लागला, की आम्ही म्हणायचो, ‘यू नो, ही ईज टू हेल्थ कॉन्शिअस!’
तिथं ठराविक वेळी पक्षी येतात, हे पाहून छान वाटे. पण हळूहळू चिमण्या कमी होत गेल्या आणि काही दिवसांनी बंदच झाल्या. बाकी कावळे, कबुतरे, साळुंख्या, अधूनमधून अनोळखी पक्षी येत राहिले. त्यानंतर चिमण्या एकूणच कमी दिसत आहेत हे लक्षात आलं. आता त्यांना घरटी बांधायला जागा तरी कुठं आहे? त्याचदरम्यान, सगळीकडं मोबाईलचे टॉवर दिसू लागले. त्यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. त्यांना अन्न मिळत नाही, वाढतं प्रदूषण अशी कारणं वाचून वाईट वाटलं. चिऊताई हरवली, असं वाटलं.

पक्षी हा पर्यावरणाचा तापमापक मानला जातो. त्यामुळे त्यांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. जीवसृष्टीला धोका निर्माण करणाऱ्या मानवनिर्मित गोष्टींकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं काही जागरूक नागरिक प्रयत्न करत आहेत, ही आश्वासक गोष्ट आहे. आता ‘चिमणी वाचवा’ ही चळवळ सुरू झाली आहे. २०१० पासून वीस मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा होतो. लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम होत आहेत. आता बऱ्याच ठिकाणी चिमण्या पुन्हा परतू लागल्या आहेत, त्यांची चिवचिव पुन्हा ऐकू येत आहे. त्यांच्यासाठी खाद्य, पाणी उपलब्ध करण्याचे वेगवेगळे उपाय व घरट्यांचे पर्यायही उपयुक्त ठरत आहेत. याबाबत लहान मुलांमध्येही जाणीव दिसते आहे. आपण ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट ’च्या संकल्पनेनुसार घरातल्या टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पक्ष्यांसाठी खाण्याची, पाण्याची आणि निवाऱ्याचीही सोय करू शकतो.
आमच्या शेजारच्या त्या घराच्या जागी आता काँक्रीटची टोलेजंग इमारत उभी आहे. तिथल्या काँक्रीटच्या छज्जांवर एसीची आउटर युनिट्‌स आहेत. तिथं पूर्वीसारखं पक्ष्यांचं अंगण गजबजत नाही. अधूनमधून कबुतरे दिसतात, पण आता तिथं धान्य, पोळी-भाकरी टाकता येत नाही. आम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे वेगवेगळे प्रयोग मात्र करतो. कधी मातीच्या परळात, तर कधी छोट्या डबीचे शिंकाळे करून त्यात पाणी ठेवतो. वाटायचं, त्यांना पाणी दिसत नसेल काय? मग एका काठीच्या टोकाला छोटा डबा बसवला आणि ती काठी खिडकीतून बाहेर येईल, अशा पद्धतीने खिडकीच्या गजांना बांधली. काही वेळानं तिथं फडफड ऐकू आली म्हणून पाहिलं, तर त्या डब्यावर झेपावलेल्या कबुतराच्या पंखाच्या फटकाऱ्यानं सगळं पाणी सांडलं होतं. मग आम्ही तो प्रयोग गुंडाळला आणि पुन्हा खिडकीत व जिन्याच्या कठड्यावर पाणी भरून ठेवू लागलो.

असेच काही दिवस गेले. एके दिवशी दार उघडून बाहेर पडणार, इतक्‍यात जिन्याच्या कठड्यावर अनपेक्षितपणे एक चिमणी दिसली. ती पाण्याच्या डब्याभोवती तुरुतुरु फिरत, मधूनच इवल्याशा चोचीने पाणी पीत होती आणि पाण्यात डोकं बुडवून पंख फडफडवून मजेत अंघोळ करत होती. ते पाहून ‘उन्हात चांदणं हसलं’ असं वाटलं. आपल्याप्रमाणेच पर्यावरणाचा घटक असलेल्या या इवल्या जिवांसाठी आपण एवढं करणं तो बनता है ना?
मागे एक व्हिडिओ पाहिला होता. त्यात रंगपंचमीच्या रासायनिक रंगांमुळं होरपळून निघालेलं कुत्रं पाहून शहारले होते. फटाक्‍यांच्या आवाजानं सैरभैर होणारे प्राणीही पाहिले आहेत. माणसाची प्रगती असो वा उन्माद, त्याची किंमत या मुक्‍या जिवांना मोजावी लागू नये, ही माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प आजच्या नववर्षदिनी करूया!
(लेखिका कोल्हापूर येथील विद्यार्थिनी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com