स्वतःशी स्पर्धा करणारी नेमबाज मनू भाकेर

संजय घारपुरे 
रविवार, 8 एप्रिल 2018

शूटिंग रेंजवरील मनू आणि अन्यत्र दिसणारी मनू यात खूप फरक आहे. मेक्‍सिकोत दोन सुवर्णपदके जिंकल्यावर वडिलांनी कसे वाटते विचारल्यावर हसत हसत ती म्हणाली, "फटाके फोडायला मजा तर येणारच ना!' घरात असली की तिची सतत बडबड सुरू असते; पण रेंजवर गेल्यावर कमालीची शांत, एकाग्र. तीन-चार तासांचा सराव, त्यास ध्यानधारणेची जोड दिली तरच यश मिळते, असे ती सांगत असे.

'पापा हो गया' हा व्हॉट्‌सऍप मेसेज रामकिशन भाकेर यांना येतो आणि हरियानाच्या झाझर जिल्ह्यातील गोरिया गावात आनंदाची एकच लहर पसरते. हे एकदाच नव्हे, तर एका महिन्यात सहा वेळा घडते. मार्चमध्ये मेक्‍सिको विश्वकरंडक स्पर्धेत दोन आणि सिडनीतील विश्वकरंडक कुमार स्पर्धेत चार अशी नेमबाजीतील सहा सुवर्णपदके जिंकलेली मनू सगळ्यांच्या गळ्यातील ताईत नसेल तरच नवल. आता तिने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळविल्याने मनूने खऱ्या अर्थाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

सुरवातीला केवळ खेळ खेळत राहण्यासाठी मनूने दोन वर्षांपूर्वी पिस्तूल उचलले आणि काही प्रयत्नात अचूक दहा गुणांचा शॉट्‌स मारण्यास सुरवात केली. हे पाहून तिच्या युनिव्हर्सल सीनियर सेकंडरी स्कूलमधील प्रशिक्षकही अवाक झाले. मनूचे खेळाच्या मैदानावरील यश त्यांच्यासाठी नवीन नव्हते, फक्त प्रश्न असे कोणत्या खेळात? याचे कारण ही मुलगी मुष्टियुद्ध, स्केटिंग, क्रिकेट, कबड्डी, टेबल टेनिस, कराटे, थांग ता (मणिपूर मार्शल आर्ट), ऍथलेटिक्‍स या सर्व खेळात यश मिळवत होती. राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट केल्यावरही ती खेळण्यासाठी "खेलो इंडिया'त सहभागी झाली होती. 

शूटिंग रेंजवरील मनू आणि अन्यत्र दिसणारी मनू यात खूप फरक आहे. मेक्‍सिकोत दोन सुवर्णपदके जिंकल्यावर वडिलांनी कसे वाटते विचारल्यावर हसत हसत ती म्हणाली, "फटाके फोडायला मजा तर येणारच ना!' घरात असली की तिची सतत बडबड सुरू असते; पण रेंजवर गेल्यावर कमालीची शांत, एकाग्र. तीन-चार तासांचा सराव, त्यास ध्यानधारणेची जोड दिली तरच यश मिळते, असे ती सांगत असे. प्रारंभी तिची बडबड ऐकणारे कोणी तिला गांभीर्याने घेत नव्हते. एवढेच कशाला शूटिंगचा मार्ग दाखवणारे वडीलही मनूने पिस्तुलाची मागणी केल्यावर "दोन वर्षे तरी नेमबाजी करणार ना', असे विचारत होते. झाझरचे जिल्हाधिकारी चौदा पंधरा वर्षांच्या मुलीला पिस्तूल कशाला हवे, असे विचारत होते; पण आता सर्व बदलले आहे. "माझी माझ्याशीच स्पर्धा' असते, असे मनू म्हणते. त्यामुळेच नेमबाजीत पुढे जाण्याचा जणू तिचा वज्रनिर्धारच होता. त्या मार्गाने आता ती यशस्वीपणे पुढे जात आहे. 

Web Title: shooter Manu Bhaker story