पारायण (पहाटपावलं)

डॉ. श्रीकांत चोरघडे
बुधवार, 31 जानेवारी 2018

काका म्हणाले, "अहो माई, साक्षात सद्‌गुरू तुमच्यावर प्रसन्न होऊन बालरूप घेऊन तुमच्या मांडीवर येऊन बसले होते आणि तुम्ही रडता कशाला? फार कमी लोकांना हे पुण्य लाभते.' आता माईच्या चेहऱ्यावर हसू फुटले. दु:खाची जागा आनंदाने घेतली. आनंदाश्रू ओघळायला लागले

माझे काका म्हणजे साधुपुरुष. त्यांची ज्ञानपिपासा आजही वयाच्या आठव्या दशकातही शमलेली नाही. स्वच्छ शब्दोच्चार, अपार ज्ञानसंग्रह आणि मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या चारही भाषांवर असलेले प्रभुत्व यामुळे एक उत्तम वक्ता म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीमधून कष्ट काढीत त्यांनी शिक्षण घेतले व शासकीय नोकरीमध्ये अत्युच्च पदावर पोचल्यानंतर ते निवृत्त झाले. आज समाजात त्यांना मान आहे. आर्थिक समृद्धी आहे, पण आचार, विचार, आहार आजही सात्त्विक आहे. कुठलेही व्यसन नाही. वाचनाचा व्यासंग आजही जपलेला आहे. रोजची पूजा, जपजाप्य यात त्यांचा दिवसाचा वेळ निघून जातो. कुणाला काही माहिती हवी असेल, सल्ला हवा असेल, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सूचना हव्या असतील, तर काकांकडे येणाऱ्यांचा राबता असतो.
एकदा मनोरमाबाई त्यांना भेटायला आल्या. सत्तरीला आलेल्या मनोरमाबाई काकांसमोर बसल्या व काही न बोलता अश्रू गाळू लागल्या. काकांनी विचारले "काय झाले?' शब्द निघत नव्हते. माईकाकूंनी पाण्याचा पेला पुढे ठेवला व विचारले, "काय झाले माई?'

हुंदके देत त्यांनी जे सांगितले त्याचा मथितार्थ असा होता. त्यांनी गुरुचरित्राचे पारायण करायचा संकल्प केला होता. रोज सकाळी शुचिर्भूत होऊन देवापुढे बसून सोवळ्याने रोज पारायण सुरू होते. घरच्यांना सूचना होत्या, की त्या पारायण करीत असताना "कुणी मध्ये यायचे नाही', "कुणी बोलायचे नाही.' त्या दिवशी पारायण संपत आले होते. तासभर उरला होता. तेवढ्यात त्यांचा अडीच वर्षांचा नातू बाहेरून आला व आजीच्या मांडीवर जाऊन बसला. आजीची पहिली प्रतिक्रिया रागाची होती. एक धपाटा देऊन त्याला ढकलले व सुनेला हाक मारली. तिच्यावर रागावून झाले. पारायण थांबले होते. पारोशाने आलेल्या नातवाने सोवळे विटाळले होते. रागाचा भर गेल्यावर भीती वाटायला लागली. पारायण अर्धे राहीले, तर सद्‌गुरू रागावतील, त्यांची अवकृपा होईल. त्या विचाराने अस्वस्थ झाल्या व रडकुंडीला आल्या. यातून मार्ग काढायला काका मार्ग दाखवतील म्हणून त्यांच्याकडे आल्या होत्या.

काकांनी शांतपणे ऐकून घेतले व ते हसून उद्‌गारले, "अहो माई, यात रागावण्यासारखे काय आहे? तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे'.
माईच्या चेहऱ्यावरचे रडू जाऊन आश्‍चर्याचे भाव आले. त्या उद्‌गारल्या, "मला नाही समजले'.

काका म्हणाले, "अहो माई, साक्षात सद्‌गुरू तुमच्यावर प्रसन्न होऊन बालरूप घेऊन तुमच्या मांडीवर येऊन बसले होते आणि तुम्ही रडता कशाला? फार कमी लोकांना हे पुण्य लाभते.' आता माईच्या चेहऱ्यावर हसू फुटले. दु:खाची जागा आनंदाने घेतली. आनंदाश्रू ओघळायला लागले.

तोच प्रसंग, त्याच माई, पण विचारांची दिशा वेगळी. नकारात्मक विचारांनी रडायला आले आणि आता सकारात्मक विचारांनी आनंद मिळाला.

Web Title: shrikant chorghade writes an article