shrimant kokate
shrimant kokate

महिलांचा आदर करणारे शिवराय

छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे होते. त्यांचे एक ब्रिटिश चरित्रकार डेनिस किंकडे म्हणतात, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे.’’ शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्याविषयी प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, ‘‘शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात आहे.’’ त्यांनी जातिभेद केला नाही, तसेच स्त्री-पुरुष असा भेदभावदेखील केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे कार्य त्यांनी केले. शिवचरित्राचे अभ्यासक लालजी पेंडसे म्हणतात, ‘‘शिवाजीराजे उपेक्षित, गोरगरीब वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते.’’ समाजात मजूर, कष्टकरी, शेतकरी, श्रमकरी आणि विशेषतः सर्व जातिधर्मांतील महिला कायमच उपेक्षित असतात, त्यांच्याबाबत शिवाजी महाराज सहृदयी होते.

राजाराम शास्त्री भागवत यांनी लिहिलेल्या चरित्रात ते म्हणतात, ‘‘शत्रू पक्षातील जखमी व शरण आलेल्या सैनिकांवर शिवाजी महाराज औषधोपचार करून सुखरूप माघारी पाठवत असत.’’ शिवाजी महाराजांच्या कार्याचे, नीतिमूल्यांचे वर्णन देशी-विदेशी अभ्यासकांनी केलेले आहे. थोर शिवचरित्र अभ्यासक डॉ. बाळकृष्ण हे डच, पोर्तुगीज, ब्रिटिश साधनांच्या आधाराने शिवरायांबाबत सांगतात, ‘‘शिवाजीराजांची नजर अत्यंत तीक्ष्ण होती. ते नेहमी स्मितहास्य करून बोलत. ते अत्यंत बुद्धिमान होते. ते नेहमी चैतन्यशील असत. कामात जलद आणि उत्साही असत. त्यांची चाल उत्साही असे. त्यांच्या राहणीमानात डामडौल नव्हता. ते विलासी जीवनापासून दूर होते. त्यांच्या छावणीत नर्तकी, मद्यालये आणि अमली पदार्थांवर कडक निर्बंध होते.’’ डॉ. बाळकृष्ण पुढे म्हणतात, ‘‘शिवाजी महाराजांच्या राज्यात व परराज्यांतील मोहिमांमध्ये स्त्रियांना नेहमीच आदराने वागवले जाई. स्त्रियांना कैद करायला बंदी होती. त्यांना अत्यंत सन्मानाने वागवले जात असे.’’

छत्रपती शिवाजी राजांचा दंडक होता, की स्वराज्यातील व परराज्यांतील स्त्रियांचा आदर केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील व शत्रूंच्या स्त्रियांदेखील नेहमीच मानाने वागविले. मोगली फौजेतील रायबाघीण शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढली. त्यात तिचा पराभव झाला. ती पकडली गेली, तेव्हा शिवाजीराजांनी तिला तिच्या हुद्यानुसार सन्मानाची वागणूक दिली. तिचा आदर-सत्कार करून तिला तिच्या छावणीत सुखरूप पोचविले.  दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढल्या. त्या वेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा केली. सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान केला. त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसवून दूध पाजल्याचे शिल्प आजदेखील यादवाडला पाहावयास मिळते. राजकीय संघर्षात महिलांचा अनादर होणार नाही, याची दक्षता शिवाजी महाराजांनी घेतली होती.

शिवाजी महाराजांनी पनवेलजवळचा प्रबळगड जिंकला, त्या लढाईत तेथील किल्लेदार केसरीसिंह धारातीर्थी पडला. त्याची आई, पत्नी आणि मुले यांना मावळ्यांनी शिवरायांसमोर हजर केले. तेव्हा शिवरायांनी त्यांना अभय दिले. केसरीसिंहाच्या आईचा व पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून त्यांच्या देऊळगाव या मूळ गावी सुखरूप पाठविले. आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा, बहिणीचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते. त्या धोरणाची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली.

मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो, ‘‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे.’’ शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे, स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा, ही उच्च कोटीची नैतिकता आहे. शिवाजीराजांच्या ठायी अशी नैतिकता होती. त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यांतील महिलांचे संरक्षण केले. महिलांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा केली, हे त्याचे एक उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातुःश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी शिरसावंद्य मानला. १६४२ ते १६७४ पर्यंतच्या महत्त्वाच्या घटनाप्रसंगी जिजाऊसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तोरणा किल्ला जिंकणे, अफजलखानाचा वध, आग्रा येथून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी शिवाजीराजांनी जिजाऊसाहेबांचा सल्ला घेतला. यातून स्पष्ट होते, की स्वराज्यातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग होता. स्त्रीसुद्धा बुद्धिमान आहे, हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, यावर शिवरायांचा दृढ विश्‍वास होता. जिजाऊसाहेबांच्या सक्रिय सहभागातून हे स्पष्ट होते, की शिवकाळातील निर्णयप्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे. शिवाजीराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजविले, सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. शिवाजीराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच हे शक्‍य झाले.

महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांची शिवरायांनी कधीच गय केली नाही. महिलांनाही जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारा स्वकीय असला तरी शिवरायांनी त्याला कठोर शिक्षा दिली. पोटी मुलगाच जन्माला यावा, अशी अपेक्षा बाळगणारे अनेक लोक आजही आहेत. वंशाला दिवा मुलगाच असतो, असे समजणारेही लोक आहेत. महिलांचा अनादर म्हणजे शूरपणा वाटणारे महाभाग आहेत. अशा अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या महिलांबाबतच्या धोरणाची आजही गरज आहे. आपल्या राजकीय, धार्मिक विरोधकांच्या महिलांचादेखील आदर, सन्मान, संरक्षण करणे हेच खरे शिवकार्य आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, त्यांना संधी देणे हे शिवकार्य आहे. राजकीय लढा चालूच राहील; पण त्या राजकीय लढ्यातदेखील विरोधी बाजूच्या महिलांचा सन्मान करणे, ही खरी शिवभक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रसंग आले. पण त्यांनी नैतिकता कधीही सोडली नाही. औरंगजेब, दिलेरखान, शाहिस्तेखान, अफजलखानाबरोबर संघर्ष केला. पण त्यांच्याही महिलांचा शिवाजीराजांनी आदर केला. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com