आधीच माहीत होतं, भक्‍तांना बाबाचं सत्य!

सोमवार, 28 ऑगस्ट 2017

आत्मविश्‍वासाचं महत्त्व सांगणारी ती बोधपर गोष्ट  आठवतेय? गावात पाऊस पडावा म्हणून वरुणराजाच्या प्रार्थनेचं आयोजन केलं जातं. सगळा गाव एकत्र येतो; पण केवळ एक लहान मुलगाच छत्री घेऊन आलेला असतो. गुरमित, राम, रहीम अशा वेगवेगळ्या धर्मांचे संकेत नावाला जोडणारा अन्‌ तरीही बलात्कारासारखा घृणास्पद अपराध करणाऱ्या डेरा सच्चा सौदाच्या रॉकस्टार प्रमुखाला सीबीआय कोर्टानं दोषी ठरविल्यानंतर त्याच्या आंधळ्या भक्‍तांनी उत्पात माजवला. अराजक काय असतं, हे देशाला कळालं. आसमंत आगीच्या ज्वाळांनी, काळ्या धुराच्या लोटांनी व्यापले. अनेकांचे बळी गेले. तेव्हा, व्हॉट्‌सॲपवर आलेल्या एका पोस्टमुळं ती मुलाची गोष्ट आठवली.

आत्मविश्‍वासाचं महत्त्व सांगणारी ती बोधपर गोष्ट  आठवतेय? गावात पाऊस पडावा म्हणून वरुणराजाच्या प्रार्थनेचं आयोजन केलं जातं. सगळा गाव एकत्र येतो; पण केवळ एक लहान मुलगाच छत्री घेऊन आलेला असतो. गुरमित, राम, रहीम अशा वेगवेगळ्या धर्मांचे संकेत नावाला जोडणारा अन्‌ तरीही बलात्कारासारखा घृणास्पद अपराध करणाऱ्या डेरा सच्चा सौदाच्या रॉकस्टार प्रमुखाला सीबीआय कोर्टानं दोषी ठरविल्यानंतर त्याच्या आंधळ्या भक्‍तांनी उत्पात माजवला. अराजक काय असतं, हे देशाला कळालं. आसमंत आगीच्या ज्वाळांनी, काळ्या धुराच्या लोटांनी व्यापले. अनेकांचे बळी गेले. तेव्हा, व्हॉट्‌सॲपवर आलेल्या एका पोस्टमुळं ती मुलाची गोष्ट आठवली. पोस्ट अशी, ‘‘गुरमित राम रहीमचे अनुयायी कोर्टाचा निकाल ऐकायला लाठ्याकाठ्या, शस्त्रे घेऊन आले; पण गुरू निर्दोष सुटेल असा विचार करून कोणीही मिठाई आणली नव्हती. याचाच अर्थ, भक्‍तांनाही सत्य माहीत होतं!’’

गुरमित राम रहीमला लैंगिक शोषणाच्या पंधरा वर्षे जुन्या खटल्यात दोषी ठरविण्याआधीच सोशल मीडिया सक्रिय झाला होता. स्वत:ला मेसेंजर ऑफ गॉड म्हणजे देवाचे निरोपे म्हणविणारे असले भोंदूबाबा सगळ्याच राजकीय पक्षांना हवे असतात व मतांचा भला मोठा मोबदलाही ते उकळत असतात. म्हणूनच की काय गुरमित राम रहीमच्या पाठिंब्यानं सत्तेवर आलेलं हरियानातलं मनोहरलाल खट्टर सरकार निष्क्रिय राहिलं. मग पंजाब-हरियाना उच्च न्यायालयालाच बंदोबस्ताविषयी निर्वाणीचे इशारे द्यावे लागले. तरीही खट्टर सरकारनं पंजाब-हरियानाची केंद्रशासित राजधानी चंडीगडला खेटून असलेल्या पंचकुलामध्ये संचारबंदीतही लाखो लोक जमा होऊ दिले. वृत्तवाहिन्या शुक्रवारी दुपारपर्यंत वार्तांकनाच्या नावावर त्या जमावाचंच मनोरंजन करत होत्या. बाबाला दोषी ठरवणारा निकाल लागल्यानंतर ओबी व्हॅन व कॅमेरामन हेच त्या जमावाचं लक्ष्य बनले. तेव्हा कुठं वृत्तवाहिन्या आक्रमक झाल्या अन्‌ राम रहीम बाबा व त्याच्या हिंसक भक्‍तांविरूद्ध देशभर जनक्षोभ उभा राहिला. 

यादरम्यान, अनेक गोष्टींची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात होती. टीव्ही, इंटरनेट, मोबाईल डाटा वगैरे सारं काही बंद असताना कोर्टानं सुनावलं म्हणून आदल्या सायंकाळी तो बाबा ‘व्हिडिओ’द्वारे अनुयायांना शांततेचं अपील करीत होता. कोर्टानं दोषी ठरवलेल्या बाबासोबतची जुनी छायाचित्रं, नरेंद्र मोदींपासून अनेकांनी त्यांची केलेली स्तुती सारं काही निकाल येताच सोशल मीडियावर अवतरलं. हरियानाचे मुख्यमंत्री खट्टर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रं प्रामुख्यानं चर्चेत राहिली. डेरासमर्थकांच्या गर्दीत गुन्हेगार घुसले, असा दावा करणाऱ्या खट्टर यांना तर ती घुसखोरी रोखण्याची जबाबदारी कुणाची, याचंही भान नव्हतं. वादग्रस्त विधानं करून आपल्याच सरकारला अडचणीत आणण्यासाठी कुप्रसिद्ध असलेले साक्षी महाराज व सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बाबा राम रहीमचं समर्थन केल्यानं लोकक्षोभाच्या आगीत तेल ओतलं. चार राज्यात इंटरनेट सेवा बंद असताना ट्विटरवरून शांततेचं अपील करणाऱ्या पंतप्रधानांवरही टीका झाली. 

अन्यायाविरुद्धच्या धाडसाचे कौतुक
डेरासमर्थक पंचकुला शहराला वेढा टाकून बसले असल्यानं बाबा राम रहीमला सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरनं कारागृहाकडे हलवण्यात आलं. त्यातही त्याची बडदास्त ठेवल्याचा आरोप झाला. तेव्हा, उमटलेल्या प्रतिक्रियांमध्ये काश्‍मीरमधल्या हिंसक जमावाशी संबंधित पेलेट गन व ह्युमन शिल्डचे संदर्भ ठळक होते. पेलेट गन काय केवळ काश्‍मीरसाठी राखून ठेवण्यात आल्यात काय, असा सवाल उपस्थित झाला. ‘गर्दीतला हिंसाचार थोपवण्यासाठी मेजर गोगोईंना का बोलवले नाही किंवा बाबा राम रहीमला जीपच्या पुढे बांधून तुरुंगापर्यंत का नेले नाही’ अशी विचारणा करणाऱ्यांमध्ये जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उद्योगपती हर्ष गोएंका आदी होते. आणखी एक तुलना जोरात आहे - बलात्काऱ्यांना फाशीची मागणी करताना कुठेही अनुचित प्रकाराचं गालबोट न लागलेले महाराष्ट्रातले लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे अन्‌ बलात्काऱ्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले, जाळपोळ-तोडफोड करणारे डेरासमर्थक यांची. ‘बलात्काऱ्यांना फाशीची मागणी करताना हजारो लोक मेणबत्त्या पेटवतात तर बलात्काराचे समर्थन करणारे शहरे पेटवतात,’ ही मार्मिक पोस्ट व्हायरल झाली. याशिवाय, श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशा बलात्कारी बाबांवर किती अंधविश्‍वास ठेवायचा, लेकीबाळी त्याच्या चरणी वाहायच्या, यावर अनेक जण अंतर्मुख होऊन गंभीरपणे विचार करताहेत. २००२ मध्ये बाबाविरूद्ध तक्रार करणाऱ्या त्याच्या सेविका, बातम्या छापल्या म्हणून हत्या झालेले पत्रकार राम चंदर छत्रपती व प्रचंड दबावाला भीक न घालता निकाल देणारे न्यायाधीश यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Shrimant mane article Dera sacha sauda