त्याचे पंख परदेशी, परि ओळखीचे डोळे

सोमवार, 10 जुलै 2017

परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर असताना तिथले पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह जेरुसलेममध्ये दहा वर्षांचा बेबी मोशे व त्याची आया सॅंड्रा सॅम्युअल यांना भेटले. त्या भेटीनं साडेआठ वर्षांपूर्वीच्या जखमेची आठवण प्रत्येकाच्या मनात तरळली. ती जखम मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची, त्यात बळी गेलेल्या जवळपास पावणेदोनशे निरपराधांची अन्‌ इतक्‍या वर्षांनंतरही तो भ्याड हल्ला करणारे पाकिस्तानमध्ये मोकळे फिरत असल्याची. मोशे आता ‘स्टॉप कॉलिंग मी बेबी’, असं म्हणण्याइतका समजदार व मोठा झालाय.

परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर असताना तिथले पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह जेरुसलेममध्ये दहा वर्षांचा बेबी मोशे व त्याची आया सॅंड्रा सॅम्युअल यांना भेटले. त्या भेटीनं साडेआठ वर्षांपूर्वीच्या जखमेची आठवण प्रत्येकाच्या मनात तरळली. ती जखम मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची, त्यात बळी गेलेल्या जवळपास पावणेदोनशे निरपराधांची अन्‌ इतक्‍या वर्षांनंतरही तो भ्याड हल्ला करणारे पाकिस्तानमध्ये मोकळे फिरत असल्याची. मोशे आता ‘स्टॉप कॉलिंग मी बेबी’, असं म्हणण्याइतका समजदार व मोठा झालाय. डोळ्यावरच्या चष्म्यातूनही चकाकणारे डोळे गोलगोल फिरवीत त्यानं पंतप्रधानांना उद्देशून, ‘मिस्टर मोदी, आय लव्ह यू अँड यूवर पीपल इन इंडिया’ म्हटलं. त्या वेळी कोट्यवधी भारतीयांपैकीच एक सॅंड्रा त्याच्याकडे कौतुकानं पाहत होती. ते कौतुक जसं बाळ आता मोठं झाल्याचं होतं, तसंच जगानं दखल घेतलेल्या २६ नोव्हेंबर २००८च्या बुधवारी त्याच्या सुटकेसाठी केलेल्या धाडसाचं चीज झाल्याचंही होतं. बेबी मोशे भारतभर चर्चेत आला. ट्‌विटरवर तो ‘हॅशटॅग’ ट्रेंड होऊ लागला.  

इतिहासात होलोकॉस्ट म्हणून कुपरिचित असलेला ज्यू धर्मीयांचा महाभयंकर नरसंहार हिटलरच्या नाझी जर्मनीनं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडवून आणला. जवळपास साठ लाख ज्यू मारले गेले. त्यात किमान पंधरा लाख बालके होती. नि:शस्त्र व निरपराधांच्या समूहांवर अमानूषपणे गोळ्या चालवल्या गेल्या. जे वाचले, ज्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना ‘गॅसचेंबर्स’मध्ये टाकून संपवण्यात आले. ती होरपळ जगभरातल्या ज्यूंना संघटित होण्यास कारणीभूत ठरली. जगातल्या बहुतेक सर्व देशांमध्ये आपल्या मंडळींना एकत्र गुंफणारी ‘छाबड हसिडिक’ नावाची चळवळ ५०मध्ये सुरू झाली. सर्व प्रमुख शहरांत सिनागॉग नावाची प्रार्थनागृहे व छाबड हाऊस नावानं भेटण्याचं ठिकाण हे गेल्या सत्तर वर्षातलं त्या चळवळीचं विस्तारलेलं स्वरूप आहे. जगात अशी साडेचार हजारांहून अधिक छाबड हाऊसेस आहेत. दक्षिण मुंबईतलं नरिमन हाऊस हे त्यापैकीच एक. रबी गॅव्हरिअल नोच होल्टज्‌बर्ग व त्यांची पत्नी रिवका हे दोघे ते २००३ पासून चालवायचे. तेच मोशेचे माता-पिता. रबी ही धर्मशिक्षण देणाऱ्यांसाठीची पदवी. सॅंड्रा ही मोशेचा सांभाळ करण्यासाठी होल्टज्‌बर्ग दाम्पत्यानं नेमलेली पगारी आया. 

सॅंड्रा मूळची गोव्यातली. पण आयुष्य गेलं मुंबईत. दहशतवादी हल्यापूर्वी काही महिनेच अचानक मरण पावलेल्या तिचा नवरा जॉन केरळचा. जॅक्‍सन व मार्टिन ही सध्या अनुक्रमे पस्तिशीत व पंचविशीत असलेली त्यांची मुले. तशी ती दर बुधवारी छाबड हाउसमधल्या कामातून सुटी घेऊन मुलांकडं जायची. योगायोग म्हणा की बेबी मोशेचं सुदैव, नेमकी त्या बुधवारी ती गेली नाही. हल्ला झाला तेव्हा ती तळमजल्यावर होती. कानठळ्या बसवणारा गोळीबार ऐकल्यानंतर थोड्या वेळानं ती घाबरीघुबरी होऊन वरच्या मजल्यावर गेली अन्‌ तिथलं दृश्‍य पाहून गारठून गेली. गॅव्हरीअल व रिवका ही पती-पत्नी रक्‍ताच्या थारोळ्यात अन्‌ त्या रक्‍तानं माखलेला मोशे ‘नॅनी, नॅनी’ करीत त्या पार्थिवांच्या बाजूला रडत बसलेला. हल्लेखोर छाबड हाउसमध्येच लपून बसले होते. संधी पाहून मोशेला उचलून घेऊन सॅंड्रा जिवाच्या आकांताने छाबड हाउसच्या बाहेर धावत सुटली अन्‌ तो कोवळा जीव वाचला. 

अवघ्या दोनेक वर्षाचा मोशे माता-पिता व ‘नॅनी’ याशिवाय कोणाला ओळखतच नव्हता. अवतीभोवती हे रक्‍ताचे सडे का घातले जाताहेत, हे तर त्याला कळायचा प्रश्‍नच नव्हता. आपण काहीतरी अचाट धाडसं करतोय हे ध्यानीमनी नसताना सॅंड्रानं केलेल्या मोशेच्या सुटकेची तुलना ज्यूधर्मीयांनी ‘होलोकॉस्ट’मधल्या सुटकांशी केली. तिला इस्राईलचं नागरिकत्व दिलं. या घटनेनं केवळ मोशेच्याच नव्हे तर सॅंड्राच्याही आयुष्याला दैवी कलाटणी मिळाली. अनुराधा पौडवालांनी गायिलेल्या सुधीर मोघे यांच्या गीतातल्या ‘‘कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले, त्याचे पंख परदेशी, परि ओळखीचे डोळे’’ या शब्दांसारखं आयुष्य ती तिकडं जगतेय. आई व वडील दोन्हीकडच्या आजी-आजोबांकडे मोशे स्थिरावल्यानंतर आता सॅंड्रा विशेष मुलांचा सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत काम करीत असली, तरी मोशेच्या आयुष्यात तिचं जे स्थान कोरलं गेलंय ते कायम राहील.

Web Title: Shrimant mane article Sandra Samuel 26/11 attack