राजहंस माझा निजला...!

राजहंस माझा निजला...!

निरपराध सीरियन नागरिकांची यादवीतली होरपळ दुर्लक्षून त्यांच्या अमेरिकेतल्या प्रवासावर ज्यांनी बंदी घातली, चार वर्षांपूर्वी अध्यक्ष बराक ओबामांचा सीरियात हस्तक्षेपाचा विचारदेखील मूर्खपणा असल्याचं ज्यांचं जाहीर मत होतं; बेधडक विधानं व आक्रमक वृत्तीमुळं जग ज्यांना 'पत्थरदिल' समजतं, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अचानक इतके कसे बदलले, सीरियावर टोमाहॉक क्षेपणास्त्रं डागण्याचा निर्णय त्यांनी तडकाफडकी का घेतला, हे कोडं अनेकांना पडलंय.

सीरियन लष्कराचा इडलिब शहरावरील रासायनिक शस्त्रांचा मारा व त्यात नव्वदच्या आसपास निरपराधांचे बळी, विशेषकरून कोवळ्या मुलांचा संहार हे त्या कोड्याचं उत्तर तसं वरवरचं आहे. आणखी एक वेगळं कारण आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडून अध्यक्षांना जगभरातल्या घडामोडींचं शिरस्त्याप्रमाणं होणारं रोजचं 'ब्रिफिंग' बहुतांशी वर्णनात्मक असतं, असं ट्रम्प यांना गेल्या जानेवारीत वाटलं. तेव्हा अक्षरी वर्णन कमी करण्याची, छायाचित्र व ग्राफिक्‍सचं प्रमाण वाढविण्याची सूचना त्यांनी केली होती. गेल्या मंगळवारी सीरियात रासायनिक हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प त्या वेळी फ्लोरिडामध्ये 'मार-ए-लागो' या त्यांच्या खासगी महालात मुक्‍कामाला होते. दुसऱ्या दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची चर्चा ठरलेली होती.


त्यापूर्वी, गुप्तचर विभागानं रासायनिक हल्ल्याची सचित्र माहिती त्यांना दिली. छायाचित्रं पाहून ट्रम्प हादरले. विषारी वायूच्या संहारातून बाळ वाचावं म्हणून त्या कोवळ्या जिवाला नाइलाजानं त्यांचे मातापिता पाण्यात फेकत असल्याचं एक दृश्‍य; अन्‌ शुभ्र, मऊशार बाळुत्यात गुंडाळलेल्या दोन जुळ्या मुलांचे मृतदेह छातीशी कवटाळून पित्याचा काळजाला घरं पाडणारा आक्रोश, या दोन छायाचित्रांनी ट्रम्प कळवळले.
राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रजांच्या कवितेत मुलाच्या मृत्यूमुळे भ्रमिष्ट झालेली माता, 'मांडीवरचा निर्जीव तुकडा मेलेला नाही तर निजलाय' असं सांगते. संतापानं, 'हे कोण बोलले बोला? राजहंस माझा निजला'', विचारते. त्याची पुन: अनुभूती यावी अशी ही सीरियातली दृश्‍यं.

मांडीवर मेले मूल, तो हृदया धक्‍का बसला
होऊनी कळस शोकाचा, भ्रम तिच्या मानसीं वसला
मग हृदय बधिरची झाले, अति दुःख तिजवी चित्ताला, राजहंस माझा निजला.


सीरियातल्या अशा दृश्‍यांमुळंच डोनाल्ड ट्रम्प यांचं काळीज पाझरलं म्हणतात. 'नो चाईल्ड ऑफ गॉड शुड एव्हर सफर सच हॉरर', असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच आर मॅक्‌मास्टर व संरक्षणमंत्री जिम मॅट्टीस यांच्याशी सल्लामसलत केली अन्‌ शायरात सैनिकी विमानतळावर हल्ल्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर सबुरीचा सल्ला देणारे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग तिथंच मुक्‍कामी होते. पण, त्यांनाही असं काही ठरेल याचा अजिबात अंदाज नव्हता.

आराध्या व श्‍लोकसाठी आराधना
चिमुकल्यांचा विषय असला, की 'सोशल मीडिया' हळवा होतो, हे आपल्याकडे महाराष्ट्रातही दिसून आलं. आराध्या योगेश मुळे या चार वर्षांच्या चिमुकलीचं हृदय बव्हंशी निकामी झालंय. वर्षभरापूर्वी हृदयविकाराचं निदान झालं अन्‌ तेव्हापासून दर पंधरा दिवसांनी मुंबईत मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात तिच्यावर उपचार करावे लागतात. तिच्यावर हृदय प्रत्यारोपण करायचं आहे, पण दाता मिळेना. तेव्हा, शनिवारी 'ट्‌विटर'वर 'सेव्ह आराध्या' हॅशटॅगने दात्याच्या शोधासाठी जागर झाला. 'ब्रेनडेड' रुग्णांचे अवयव गरजूंना दान करण्याकडे लोकांचा कल वाढतोय; तथापि, बालकांच्या गरजा वेगळ्या आहेत. अवयवांचा दाता व याचक दोहोंचं वय, वजन व अर्थातच रक्‍तगट जुळणं गरजेचं आहे.

आराध्याला चिमुकलं हृदय मिळवून देण्याच्या मोहिमेत अवघ्या तीन तासांत वीस हजारांहून अधिक 'ट्विपल्स' सहभागी झाले. 'मृत्यूनंतर तुम्ही स्वर्गात गेलात तरी तिथे हृदय किंवा अन्य अवयांची गरज नसते; तर ती गरज इथं पृथ्वीवर असते', अशा संदेशाद्वारे अवयवदानाची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न झाला. 'माय मेडिकल मंत्रा' या ऑनलाइन नियतकालिकाद्वारे काम करणारे पत्रकार संतोष आंधळे यांचा या कामी पुढाकार आहे. आराध्याप्रमाणेच नाशिकचा श्‍लोक आंधळे हा दीड वर्षाचा चिमुकलाही हृदयाचा गरजू आहे. योगेश मुळे विमा सल्लागार आहेत, तर सुनील आंधळे शेतकरी. मुलांचा जीव वाचविण्याची दोघांची धडपड सुरू आहे. हृदयाचे दाते मिळोत यासाठी त्यांच्यासोबत हजारो लोक प्रार्थना करताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com