फुटबॉल मैदानावर मणिपुरी जलवा 

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

ऑलिंपिकच्या नुसत्याच आठवणी... 
भारतीय फुटबॉल संघ कधीकाळी ऑलिंपिक खेळला होता, हे सांगितलं तर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. कारण, त्या गोष्टीला आता कित्येक दशके उलटून गेलीत. अनवाणी पायांनी फुटबॉल खेळणारा संघ 1948च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. नागालॅंडचे डॉ. तालिमेरान अओ त्या संघाचे कर्णधार होते. नंतर फुटबॉल संघटनेने अनवाणी पायाने किकवर बंदी घातली.

पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, के. श्रीकांत यांचे सुखावणारे बॅडमिंटन विजय असोत; जिमनॅस्ट दीपा कर्माकरची नजाकत असो; गेला बाजार "प्रो-कबड्डी'तला थरारही विचारात घेतला तरी चालेल; हे नक्‍की की क्रिकेट हा क्रीडाधर्म मानणाऱ्या भारतात संधी मिळते तेव्हा क्रीडारसिक अन्य खेळाडूंनाही डोक्‍यावर घेतात. टेनिसपटू लिअँडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झानं हे प्रेम अनुभवलंय. बॉक्‍सिंग-कुस्ती-नेमबाजी अथवा "ट्रॅक अँड फिल्ड'मधलं यशही देशवासीयांची छाती अभिमानानं फुलवून जातं. ताजं उदाहरण फुटबॉलचं. पाऊण तासाच्या दोन "हाफ'मध्ये मिळून नव्वद मिनिटांचा हा खेळ शारीरिक क्षमतेचा प्रचंड कस पाहणारा. परिणामी, जागतिक वगैरे नोंद करण्याचं स्वप्नही बाळगू नये, अशी स्थिती. पण, सतरा वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेनं, यजमान म्हणून मिळालेल्या संधीमुळं अशक्‍यतेतही स्वत:चं पाणी जोखून घेण्याची संधी भारताला मिळाली. 

चोवीस संघांच्या या स्पर्धेतला साखळी सामन्यांचा टप्पा पूर्ण झालाय. तगडे सोळा संघ आता उपउपांत्य फेरीपासून "नॉकआउट' खेळतील. अपेक्षेप्रमाणं भारत तिथं पोचलेला नाही. पण, देश फुटबॉलमय झालाय म्हटलं तरी चालेल. लोक टीव्हीपुढं बसताहेत. सहा ऑक्‍टोबरला स्पर्धा सुरू झाली, त्या शुक्रवारी व नंतर सोमवारी, गुरुवारी, भारताच्या सामन्याच्या वेळी ती संख्या लाखांमध्ये होती. सोशल मीडियावर चर्चा झाली. ट्‌विटरवर ट्रेंडिंग झालं. ज्यांची नावंही सहज उच्चारता येत नाहीत, अशा अनोळखी खेळाडूंचं आक्रमण-बचावातलं कौशल्य रसिकांनी देहभान पाहून अनुभवलं. जसं कोल्हापूरचा अनिकेत जाधव याच्याकडं महाराष्ट्राचं लक्ष होतं. 

याचा एक फायदा झाला. भलेही एकशे तीस कोटी लोकसंख्येचा भारत "फिफा' रॅंकिंगमध्ये 130 व्या क्रमांकावर असेल, "फिफा वर्ल्डकप' व "फिफा अंडर 17 वर्ल्डकप'चे फेसबुक पेज फॉलो करणाऱ्यांमध्ये मात्र भारत नंबर वन आहे. पहिल्या पेजच्या चार कोटी चाहत्यांमध्ये तर दहा टक्‍के भारतीय आहेत. सतरा वर्षांखालील मुलांकडून चमत्काराची अपेक्षा कुणी केली नव्हतीच; पण, दुबळा संघ असूनही आपली मुलं अमेरिका, कोलंबिया, घाना वगैरेंना कडवी झुंज देताहेत, पराभव झाला तरी तो सन्मानजनक असतो, नामुष्कीजनक नसतो अन्‌ महत्त्वाचं म्हणजे कोलंबियाविरुद्ध गोलही मारला जातो, हे पाहून भारतीय फुटबॉलरसिक हरखून गेले. 

या कामगिरीमुळे आता भारतीय मुलांना जगाचं आभाळ खुलं झालंय. पाच फूट 10 इंच उंचीचा गोलकीपर धीरज सिंग, चपळ चाली रचणारा कर्णधार अमरजित, जिकसन सिंग अथवा बचावफळीतला अन्वर अली, संजीव स्टॅलिन वगैरे गुणवान खेळाडू युरोपियन क्‍लबच्या नजरेत भरलेत. विशेष म्हणजे ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्यांएवढी नाही नसेल अशा ईशान्येकडच्या छोट्या राज्यांमधून ही प्रतिभा भारतीय क्षितिजावर अवतरलीय. कर्णधार अमरजित कियाम व कोलंबियाविरुद्ध ऐतिहासिक गोल नोंदवणारा जिकसन हे दोघे आतेभाऊ-मामेभाऊ. इंफाळजवळच्या थाउबलचे. त्याशिवाय धीरज सिंग मोइरांगथेम, बोरिस थांगजाम, सुरेश वांगजाम, निंथोइंग मितेई, नॉगडाम्बा नाओरेम व मोहम्मद शहाजहान, असे एकूण आठ जण मणिपूरचे, तर अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना खेळल्यानंतर कोच लुईस नॉर्टन दा मातोस यांनी बाहेर बसवलेला कोमल थातल हा सिक्‍कीमचा. एकवीस जणांच्या भारतीय संघात नऊ रत्ने ईशान्येकडून आलेली, 1948 मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व करणारे नागालॅंडचे डॉ. तालिमेरान अओ यांचा समृद्ध वारसा चालवणारी! 

ऑलिंपिकच्या नुसत्याच आठवणी... 
भारतीय फुटबॉल संघ कधीकाळी ऑलिंपिक खेळला होता, हे सांगितलं तर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. कारण, त्या गोष्टीला आता कित्येक दशके उलटून गेलीत. अनवाणी पायांनी फुटबॉल खेळणारा संघ 1948च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. नागालॅंडचे डॉ. तालिमेरान अओ त्या संघाचे कर्णधार होते. नंतर फुटबॉल संघटनेने अनवाणी पायाने किकवर बंदी घातली. पुढच्या 1952 व 1956 च्या ऑलिंपिकमध्ये भारताने आता स्वप्नवत वाटावी अशी कामगिरी नोंदवली. खाशाबा जाधव यांच्या कुस्तीतल्या ब्रॉंझसाठी संस्मरणीय ठरलेल्या 1952च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताचा फुटबॉल संघ चांगला खेळला अन्‌ 56 च्या मेलबर्न ऑलिंपिकमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा पराभव करताना भारताच्या नेव्हील डिसूझा यांनी हॅटट्रिक नोंदवली होती. तशी कामगिरी करणारे पहिले आशियाई.

Web Title: Shrimant Mane writes about FIFA U 17 World Cup and Manipur