पितापुत्र नात्याचा हॉट एअरबलून 

raymond
raymond

मुंबईतल्या मलबार हिल भागातल्या राहत्या घराचा वाद उच्च न्यायालयात नेणारे व त्यामुळं माध्यमांमध्ये, सोशल मीडियात चर्चेत आलेले उद्योगपती विजयपत सिंघानिया यांची एक हृद्य आठवण नाशिकजवळच्या सिन्नरनं उणेपुरं एक तप जपलीय.

26 नोव्हेंबर 2005 ला या धाडसी उद्योजकानं वयाच्या 67 व्या वर्षी हॉट एअरबलूनमध्ये अवकाशात 69 हजार 852 फूट उंचीपर्यंत प्रवासाचा जागतिक विक्रम नोंदवला. अमेरिकेतल्या पेर लिंडस्ट्रॅंडचा 1988 मधला विक्रम मोडीत निघाला. तेव्हा भल्या सकाळी मुंबईत रेसकोर्सवरून अवकाशात झेपावलेले सिंघानिया नाशिक-शिर्डीदरम्यान सिन्नरजवळ उतरले होते. आपण इथं उतरावं ही परमेश्‍वराचीच इच्छा, असं भारावलेले सिंघानिया म्हणाले होते. महत्त्वाचं म्हणजे वडिलांच्या त्या कर्तबगारीचा सर्वाधिक आनंद कुणाला झाला असेल, तर त्यांचे पुत्र गौतम यांना. त्याआधी 1998 मध्ये अत्यंत कमी वजनाच्या विमानानं लंडन ते अहमदाबाद असा एकट्यानं प्रवासाचा पराक्रम नोंदविणारे व त्यासाठी थेट जेआरडी टाटांच्या पंगतीत विराजमान झालेले विजयपत सिंघानिया आता ज्यासाठी चर्चेत आले ते कारण मात्र एकूणच वृद्धांची परवड अधोरेखित करणारं आहे. 

मलबार हिलवरच्या जेके हाउसमधल्या डुप्लेक्‍स फ्लॅटच्या मालकीवरून विजयपत सिंघानिया मुलगा गौतमवर नाराज आहेत. त्या वादाची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. नंतर एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं, की मुलांवर हवं तितकं प्रेम करा; पण सर्वस्व त्यांच्या हाती सोपवून अशीही वेळ आणू नका, की अडचणीच्या वेळेस आपल्या हाती काहीच राहणार नाही. तो त्यांचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हाट्‌सऍपवर पोस्ट फिरताहेत. सारं काही कधीच मुलांच्या ताब्यात देऊ नका, असं आवाहन केलं जातंय. त्यातच वयाच्या ऐंशीच्या उंबरठ्यावर पोचलेल्या सिंघानिया यांना परवा गुरुवारी एका क्‍लबमध्ये चक्कर आली. ब्रिच कॅंडी इस्पितळात दाखल करावं लागलं. प्रकृती ठीक आहे. परिणामी, लवकरच रुग्णालयातून सुटी मिळेल. सुटीनंतर त्यांना भाड्याच्या घरी जावं लागेल, हे अनेकांसाठी वेदनादायी आहे. 

दोन वर्षांपूर्वी रेमंडची सगळी सूत्रे हाती घेणाऱ्या गौतम सिंघानिया यांचीही या वादावर बाजू आहे. पित्याप्रमाणंच गौतम सिंघानियाही धाडसी आहेत. कार रेसिंगमध्ये त्यांचं नाव आहे. इंग्लंडमध्ये तशी रेस जिंकण्याचा गौरव त्यांच्या नावे आहे. गौतम यांचे आजोबा कैलासपत सिंघानिया यांनी 1944 मध्ये रेमंड वूलन मिल्स अल्बर्ट रेमंड व अल्बर्ट जॅक रेमंड यांच्याकडून विकत घेतली अन्‌ सिंघानिया रेमंडसाठी ओळखले जाऊ लागले; पण त्याआधीही सिंघानिया हा देशातला अत्यंत नावाजलेला उद्योजक परिवार होताच. जेके हाउस हे नाव सिंघानियांचे पूर्वज जुग्गीलाल व कमलपत यावरून पडलेलं. त्या इमारतीची फेरबांधणी करताना ज्या दरानं घरं मिळतील असं ठरलं होतं, तो दर आता कंपनीला परवडणारा नाही अन्‌ मुलगा व कंपनीचा अध्यक्ष या द्वंद्वात मला कंपनीची काळजी करावी लागेल, असं गौतम सिंघानिया यांचं म्हणणं आहे. एकूणच प्रकरण नाजूक आहे. तितकेच अन्य काही नाजूक पदर त्याला आहेतच. 

सिंघानिया, टाटा व महाराणी एलिझाबेथ... 
सायरस मिस्त्री, गौतम सिंघानिया अन्‌ विशाल सिक्‍का या तिघांमध्ये एक साम्य आहे. पहिल्या दोघांनी गेल्या वर्षी पन्नाशीचा उंबरठा ओलांडला, तर सिक्‍का त्यांच्यापेक्षा वर्षभरानं तरुण. केवळ वयाचंच नव्हे, तर आणखी एक मोठं साम्य तिघांमध्ये आहे. दोन पिढ्यांमधल्या विचारातला फरक म्हणा, की अन्य काही; पण मिस्त्री व सिक्‍का यांना त्यांच्या उद्योग साम्राज्याचं प्रमुख पद सोडावं लागलं, तर व्यवसाय व नातेसंबंध अशा दोन टोकांवर लटकलेल्या तारेवरची कसरत गौतम सिंघानियांच्या वाट्याला आलीय. गेल्या ऑक्‍टोबर 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्या वेळी रतन टाटा यांची भूमिका जशी होती, तशीच परवा विशाल सिक्‍का यांनी इन्फोसिसचं व्यवस्थापकीय संचालकपद सोडलं तेव्हा नारायण मूर्ती यांची होती. व्यवसायातल्या मूल्यांची चर्चा त्या निमित्तानं सुरू आहे अन्‌ हे केवळ भारतातच सुरू आहे असं नाही. 1926 चा जन्म असलेली, वयाच्या शताब्दीकडे प्रवास करणारी अन्‌ 1952 पासून राजमुकुट भूषविणारी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथदेखील प्रिन्स चार्ल्‌ससाठी पद सोडायला तयार नाही, अशी बातमी बंकिंगहॅम पॅलेसमधून बाहेर आलीय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com