social
social

ब्लॉग माझा लेकुरवाळा... (श्रीमंत माने)

चेन्नईच्या राजेश्‍वरी शर्मा यांनी अलीकडेच एक परंपरा मोडली. लग्नात मुलीचं कन्यादानम्‌ वडिलांनीच करायचं असतं, ही प्रथा बाजूला ठेवून त्यांनी मुलगी संध्याचं कन्यादान ऑस्ट्रेलियन सॅमला केलं. कारण, राजेश्‍वरी ऊर्फ राजी या सिंगल मदर. लग्नानंतर त्या पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या होत्या. पतीच्या प्रोत्साहनामुळं त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण पूर्ण केलं.

"आयबीएम' कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. दोन मुलं, संसार अन्‌ नोकरी या त्रांगड्यात पतीचं पुरेसं सहकार्य मिळत नसल्याचं पाहून त्या वैतागल्या. लग्नानंतर सतरा वर्षांनंतर दोघांनी सहमतीनं विभक्‍त होण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलं अर्थातच आईकडे राहिली. मुलगी संध्या हिनं सॅमशी लग्नाचा निर्णय घेतला. तेव्हा राजींनी ठरवलं, लग्न हिंदू धर्मातल्या तमीळ ब्राह्मण पद्धतीनं चेन्नईत करायचं. त्यानुसार मुलीची आई, वडील, मैत्रीण सारंकाही असणाऱ्या राजींनी संध्याला स्वत:च्या मांडीवर बसवून कन्यादानम्‌ केलं. विवाह समारंभाच्या फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या वरुण सुरेश या छायाचित्रकारानं त्याच्या ब्लॉगवर ती छायाचित्रं टाकली. ती व्हायरल झाली. पुरुषप्रधान प्रथा-परंपरेला धक्‍का देणाऱ्या सिंगल मदर राजेश्‍वरी शर्मा जगभर पोचल्या. 

यातला हा प्रथा-परंपरेचा भाग बाजूला ठेवला, तरी पतीपासून विभक्‍त झालेल्या महिलेनं वाढवलेली मुलं हा विषय पाश्‍चात्य, पौर्वात्य दोन्हीकडच्या जगात अलीकडं ऐरणीवर येतोय. मुलांचं संगोपन हा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, त्याचप्रमाणं संस्कारांच्या दृष्टीनं थोडा चिंतेचाही विषय बनलाय. असं म्हटलं जातं की आईच्या प्रसववेदना अन्‌ मुलांच्या संगोपनातले कष्ट समजून घ्यायचे असतील, तर जावे त्यांच्या वंशा. आईचं दु:ख समजून घ्यायला आईच व्हावं लागतं. तथापि, तंत्रज्ञानानं अनुभूतीची कवाडं खुली केली आहेत. एका मातेचा अनुभव इतरांना बरंच काही शिकवून जातो. त्यातूनच उदयास आलेली नवी कम्युनिटी म्हणजे "मॉमी ब्लॉगर्स'. 

वडीलही मुलांची काळजी घेतात, आदर्श पालक बनण्याचा प्रयत्न करतात. परंतु, मुलं हा आईचा जीव की प्राण. गळेकापू स्पर्धेच्या धावत्या जगात मुलांवर विश्‍वास ठेवत, जगण्यातला त्यांचा आत्मविश्‍वास वाढवत, भल्याबुऱ्याची ओळख करून देत त्यांना स्वप्न पाहायला शिकवणं अन्‌ ती पूर्ण करण्यासाठी त्यांची शारीरिक व मानसिक तयारी करून घेणं, त्यांच्या पंखात बळ भरणं, त्यांना कणखर बनवणं, त्याचप्रमाणं अवतीभोवतीच्या सौंदर्याची व जगणं खरंच सुंदर आहे हा विचार रुजवून आनंदी जीवनाची उमेद वाढवणं, हे खरंच मोठं कौशल्याचं काम. आदिती बोस या "मॉम ब्लॉगर' कॅटरपिलरचं उदाहरण देऊन सुरवंटापासून फुलपाखरू बनण्यापर्यंतच्या अवस्था इतरांना समजावून सांगतात, ते या कौशल्यानंच. "इंडियन मॉम्स कनेक्‍ट'च्या प्रीती आधुनिक पालकत्वात भारतीय संस्कृतीचा विचार करायला लावतात अन्‌ सोबतच यौवनात प्रवेशणाऱ्या मुलींच्या अस्वस्थतेचे पैलू अन्य आईंना उलगडून सांगतात.

आजी-आजोबांसोबत राहणं शक्‍य नसेल तिथं कुणीतरी मुलांना वळण लावायला, त्यांच्या बालसुलभ शंकांचं निरसन करायला हवं असतं. ते इंटरनेटवर, ब्लॉगमधून करण्याचा प्रयत्न काहीजणी करतात. शैशव, पौगंडावस्था, तारुण्य हा मुलामुलींचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून कुणी बालकांना दिल्या जाणाऱ्या लशींचं वेळापत्रक पाळण्याच्या टिप्स देतात. कुणी मुलं अन्‌ पाळीव प्राणी यांच्या मैत्रीचा पट मांडतात. कुणी अभ्यास, खेळ, झोप यांच्या वेळापत्रकावर लिहितात. मुलांना स्वच्छतेची सवय कशी लावावी, कारच्या सीट मुलांसाठी कशा सोयीच्या असाव्यात किंवा आहारात बहुगुणी अन्नपदार्थ कसे द्यावेत, अशा एक ना अनेक गोष्टींची माहिती या ब्लॉगमधून दिली जाते. 
"मॉमीज इंटरनेट' चौफेर विस्तारतोय. "कीड्‌सस्टॉपप्रेस'वाल्या मानसी झवेरी जुळ्या मुलांच्या संगोपनावर लिहितात. "डॉक्‍टरमॉमी' म्हणून परिचित डॉ. हेमाप्रिया मुख्यत्वे अन्न व पोषणाचे सल्ले देतात. "बम्पस्‌एनबेबी'च्या संगीता मेनन "न्यू मॉम कम्युनिटी' चालवतात. इंडियन अमेरिकन मातांचं भावविश्‍व शब्दबद्ध करणाऱ्या रोशनी, "डायरी ऑफ डॉटिंग मॉम' लिहिणाऱ्या शैलजा, "द मॉम व्ह्युज'च्या स्वप्ना किंवा मुलांना पूर्णत: भारतीय नावं सूचविणाऱ्या "मा ऑफ ऑल ब्लॉग्ज'वाल्या प्रेरणा, "कन्फ्युजड्‌ पॅरेंट्‌स' नावाचा ब्लॉग चालवणाऱ्या एकता चावला, अशा कितीतरी भारतीय "मॉम ब्लॉगर्स'मुळे नव्या तंत्रज्ञानाद्वारे मातृत्वाचं प्रशिक्षण देणारी एक कम्युनिटी विकसित झालीय. 

"क्‍वीन ऑफ मॉमी ब्लॉगर्स' 
अमेरिकेतल्या हीथर आर्मस्ट्रॉंग यांना "न्यूयॉर्क टाईम्स'नं "क्‍वीन ऑफ मॉमी ब्लॉगर्स' असं गौरवलं आहे. संसारातली ओढाताण, मानसिक ताणतणाव, घटस्फोट, मुलीचं संगोपन वगैरे त्या परिस्थितीतून राजेश्‍वरी शर्मा गेल्या असतील, त्या सगळ्या अवस्था हीथर यांनी अनुभवल्या. सतरा वर्षांपूर्वी, 2001 मध्ये "डूस डॉट कॉम' नावाची वेबसाइट सुरू केली. भूक लागली तरी खात नाही म्हणून आपण मुलीला कसं घालूनपाडून बोललं ते लिहिलं. तेही थोडसं पश्‍चातापाच्या भावनेनं. तो, तसेच अन्य अनुभव त्या मांडत गेल्या. 2009 मध्ये त्यांच्या ब्लॉगचा महिन्याचा पेजव्ह्यू 40 लाखांवर पोचला होता. ऑपरा विन्फ्रेच्या शोमध्ये त्या झळकल्या. दरम्यान, असे ब्लॉग लिहिणाऱ्या आईंचा गोतावळा अमेरिकेत वाढत गेला. इन्स्टाग्रामवर अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या अमांडा वॅटर्स, तसेच जेमी लॉसन, री ड्रमांड, क्रिस्टन हॉवर्टन, ग्लेनॉन डॉएल अशी अनेक नावे ठळकपणे घेता येतील. आता मुख्य प्रवाहातली माध्यमंही त्याची नियमित दखल घेताहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com