ह्यूमन शिल्ड...!

श्रीमंत माने
सोमवार, 17 एप्रिल 2017

तो मतदानासाठी बाहेर पडला. मतदान केल्यानंतर तो गमपोरा गावात राहणाऱ्या त्याच्या बहिणीकडे एका नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोटारसायकलने निघाला होता. वाटेत लष्करी जवानांच्या तुकडीनं आपल्याला गाठलं. मोटारसायकल हिसकावून घेतली अन्‌ लष्करी जीपला पुढे बांधून अनेक खेड्यांमधून फिरवलं, असा त्याचा दावा आहे.

अक्षयकुमार-सोनाक्षी सिन्हाचा 'रावडी राठौर' चित्रपट आठवा. त्यातलं एक दृश्‍य. खलनायक एमएलए बावुजीच्या (विनीतकुमार) हवेलीतून त्याचा अय्याशी, बलात्कारी मुलगा मुन्नाला नायक विक्रम राठौर उचलून आणत असताना बावुजी आवाराचं मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांगतो. मग, अक्षयकुमार मुन्नाला पोलिस जीपच्या पुढच्या भागाला बॉनेटवर बांधून वेगाने दरवाजाकडे निघतो. लगेच दरवाजा उघडायचं फरमान निघतं. याला म्हणतात 'ह्यूमन शिल्ड' किंवा मानवी कवच. या नावाचा एक अमेरिकन चित्रपटही आहे. 'रावडी राठौर' बेतलाय तेलगूमधल्या 'विक्रमारकुडु'वर. त्याचं हिंदी डबिंगही आहे. तमिळमध्ये 'सिरूथाई', कन्नडमध्ये 'वीरा मडक्करी', बंगालीत तीन असे अन्य चित्रपटही त्याचेच 'रिमेक' आहेत. मूळ 'विक्रमारकुडु'मध्ये अभिनेता रवी तेजानं ते दृश्‍य जोरदार केलंय. 'ह्यूमन शिल्ड'ची तशीच घटना काश्‍मीरमध्ये घडली. त्याचा हा फिल्मी संदर्भ.

'ह्यूमन शिल्ड' बनलेल्या 26 वर्षाच्या काश्‍मिरी तरुणाचं नाव आहे फारूख अहमद दार. बडगाम जिल्ह्याच्या बीरवाह तालुक्‍यातलं चिल ब्रास हे त्याचं गाव. शाली विणण्याच्या व्यवसाय ते कुटुंब करतं. गेल्या रविवारी, 9 एप्रिलला श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होतं. तो मतदानासाठी बाहेर पडला. मतदान केल्यानंतर तो गमपोरा गावात राहणाऱ्या त्याच्या बहिणीकडे एका नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोटारसायकलने निघाला होता. वाटेत लष्करी जवानांच्या तुकडीनं आपल्याला गाठलं. मोटारसायकल हिसकावून घेतली अन्‌ लष्करी जीपला पुढे बांधून अनेक खेड्यांमधून फिरवलं, असा त्याचा दावा आहे. गुलाम कादीर या त्याच्या भावानेही तसाच दावा केलाय.
श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदान झालं अवघं सात टक्‍के अन्‌ हिंसाचारात बळी मात्र गेले आठ. त्यामुळं काश्‍मीर खोऱ्यातली मोबाईल इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. ती सुरू झाल्यानंतर शुक्रवारी फारूखच्या 'ह्यूमन शिल्ड'चा व्हिडिओ समोर आला. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रथम त्यावर भाष्य केलं अन्‌ काही तासांत तो व्हिडिओ सोशल मीडियावर 'व्हायरल' झाला.

खरं तर फारूखची जणू वरातच निघाली व तिच्याशी राष्ट्रीय रायफल्सचा संबंध असल्याचं सांगितलं जातं. व्हिडिओ समोर येताच लष्करानं चौकशीचे आदेश दिलेत. आसामचा मूळ रहिवाशी असलेल्या अधिकाऱ्यानं त्यासाठी पुढाकार घेतल्याचा ठपका आहे अन्‌ त्या अधिकाऱ्यानं त्या कृत्याची जबाबदारी स्वीकारताना दावा केला आहे, की दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनी एका मतदान केंद्रावर बारा निवडणूक कर्मचारी, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांचे 9 जवान तसेच जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या दोन जवानांना घेरले होते. त्या सर्वांची सुटका करण्यासाठी त्याला हे पाऊल उचलावं लागलं. फारूख अहमद दार हा दगडफेक करणाऱ्यांपैकीच एक होता आणि फुटीरवादी आंदोलकांच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला समोर करावं लागलं.
फारूख अहमद व त्याच्या कुटुंबीयांचा दावा खरा की 'ह्यूमन शिल्ड'चा प्रयोग करणाऱ्या अधिकाऱ्याचा हे नेमकं सांगता येणार नाही. तथापि, या मुद्द्यावर सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री सुरू आहे. काही जण लष्कराकडून होणाऱ्या मानवी छळाच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. दुसरीकडे 'बरं झालं अद्दल घडवली' म्हणत लष्कराच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

जवानांची संतापजनक विटंबना
'ह्यूमन शिल्ड'च्या मुद्द्यावर लष्कराला घेरण्याचे प्रयत्न होत असताना गेल्या रविवारीच बडगाम जिल्ह्यात मतदानावर बहिष्काराचं आवाहन करीत दगडफेक करणाऱ्या आंदोलक तरुणांनी हैदोस घातला. मतदान केंद्रांवरून परत निघालेल्या निमलष्करी जवानांना मारहाण केली, टपल्या मारल्या, नारेबाजी केली, 'इंडिया गो बॅक'चे नारे लावले. जवानांची ही विटंबना, अवहेलना व्हिडिओच्या रूपाने संपूर्ण देशाने सोशल मीडियावर पाहिली. लोकांची तळपायाची आग ते पाहून मस्तकात पोहोचली.

गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग यांसारखे क्रिकेटपटू किंवा काश्‍मीरचा विषय आला की आक्रमकपणे व्यक्‍त होणारा अभिनेता अनुपम खेर हे सेलेब्रिटी ज्याप्रमाणे या विटंबनेच्या मुद्द्यावर काश्‍मीरमधील फुटीरवाद्यांवर तुटून पडलेत, त्याप्रमाणे सोशल मीडियावर सामान्य देशवासीयांचा संताप व्यक्‍त झाला. हातात रायफली घेतलेल्या जवानांनी दाखवलेला संयम कौतुकास्पद असला तरी आता तो आणखी दाखविण्याची गरज नाही, सारं काही सहन करण्याच्या क्षमतेबाहेर गेल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर काही संशयिताना अटक झाली.

Web Title: shrimant mane writes on army tying man to jeep in kashmir