मायलेकी दळिताती,सात खणांच्या माडीवरी...(वुई द सोशल)

shrimanta mane write we the social
shrimanta mane write we the social

पहाटे जात्यावर दळण दळणाऱ्या आई-चुलतीच्या मांडीवर साखरझोप घेण्याच्या अनुभव ज्यांच्या गाठीला आहे, त्यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. आजच्या भाषेत "नॉस्टॅल्जिक' बनवणारी. पंधरा-वीस वर्षाआधी गाय पोईटव्हीन-हेमा रायरकर दाम्पत्यानं अत्यंत परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेला जात्यावरच्या ओव्यांचा ठेवा डिजिटल बनतोय अन्‌ सोशल मीडियावर, स्मार्टफोनवर अवतरायला लागलाय. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या "परी' (पीपल्स अर्काइव्ज ऑफ रूरल इंडिया) या "ऑनलाईन' नियतकालिकानं गेल्या तीन वर्षांत बरंच काम केलंय. परवा "स्क्रोल'नं त्यावर एक वृत्तांत केला. "इंग्लिश-विंग्लिश'मधल्या स्वानंद किरकिरेच्या "नवरई माझी लाडाची लाडाची गं', अशी त्याची सुरेल सुरवात केली. हा ठेवा सोशल मीडियावर येतोय. लोकांना आवडलाय हा प्रयोग.
जात्यावरच्या ओव्या हा संसारातल्या सुख-दु:खाची उन-सावली व्यक्‍त करणारा खास ग्रामीण महिलांचा ठेवा. लोककलांची मौखिक परंपरा व प्रवासाच्या उत्तुंग शिखराचं दर्शन घडवणारं संचित.
अरण्य गं वनामधी, कोण रडतं ऐका...
कोण रडतं ऐका, बोरी बाभळी बायका
कोण रडतं ऐका, सीतेला गं समजावाया...

असं रानावनात हिंडणाऱ्या दु:खी जानकीशी आपल्या दु:खाची जातकुळी जोडणारी ही कला. केवळ ही काटेरी अनुभव, वेदनाच नव्हे तर घरदार, संसार, शेती, नवरा-दीर-सासू-सासरा अन्‌ जाऊ-नणंद-मुलं अशा नात्यांतलं चांगलं-वाईट कप्पे उलगडून दाखवणारा पिढी-दर-पिढी जपलेला सूरसाज. फ्रेंच पोईटव्हीन व भारतीय हेमा रायरकर यांनी उण्यापुऱ्या वीस वर्षांत हजारावर खेड्यांमधून अशा लाखाहून अधिक ओव्या संकलित केल्या. हे संकलन "इंडियन पिझन्ट वुमेन स्पीक्‍स अप' ग्रंथात उमटलं. त्यातल्या तीस हजार ओव्यांचं "डिजिटल रेकॉर्डिंग', तर चाळीस हजारांचं इंग्रजीत भाषांतर झालंय. महाराष्ट्र व कर्नाटकच्या काही भागातला हा ठेवा ही "परी'च्या एकूण ग्रामीण संस्कृती संवर्धनाचा प्रारंभ आहे. देशातल्या सर्वच भागातल्या लोकसंस्कृतीचं संवर्धन त्यांना करायचंय.

गावकुसाच्या बाहेर व आतही राहणाऱ्या स्त्रियांच्या जगण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेलं परिवर्तन अन्‌ त्याबद्दल जात्यावरच्या ओव्यांमधून व्यक्‍त होणारी भावना, हा या संकलनाचा वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. त्यात पहिली, दुसरी किंवा तिसरी माझी ओवी गं म्हणत भीमरायाला, जोतिबाला, पंचरंगी झेंड्याला वंदन आहे. "भीमराया बंधू बनून सासरी पाहुणा म्हणून येतो', ही एका ओवीतली भावना आंबेडकरांप्रती समाजात असलेल्या श्रद्धेचं आगळंवेगळं अंग म्हणावं लागेल.
जात्यावरच्या ओव्या हा बायांच्या मनाचा आरसा जणू. त्यांच्या जगण्याचं दर्शन घडवणारा. या जुन्याचं वर्णन "ग्राइंडिंगमिल फोकसॉंग्ज', असं करणाऱ्यांना, पहाटे उठायचा आळस करणाऱ्यांना ते तसं समजणारं नाहीच. त्यांना उद्देशून गायीलेली ओवी सारं काही सांगून जाते...
पहाटंच्या दळण्याचा, येतो आळशीला गं राग,
बाई माझ्या उषाबाई, उठा भाग्याच्या गं दळू लाग
पहाटंच्या दळणाला रात, कुणाच्या गं वाड्यावरी
मायलेकी दळिताती, सात खणांच्या माडीवरी

हबाकचा आक्रोश
दंगल, युद्ध अथवा मानवी संहारांच्या घटनांचं वृत्तांकन करताना, समोर प्रचंड रक्‍तपात होत असतानाही व्यावसायिक कर्तव्य पार पाडताना एका तटस्थतेची आवश्‍यकता असते खरं; पण, दरवेळी हे शक्‍य होत नाही. विशेषत: निष्पाप कोवळी बालकं अमानुषपणे मारली जात असताना कर्तव्यकठोर पत्रकारांना, छायाचित्रकारांना स्वत:ला सांभाळता येतंच असं नाही. तेही कोसळतात, उन्मळून पडतात, आक्रोश करतात; कधी मनातून तरी कधी प्रत्यक्षही. सीरियातल्या यादवीचं, नरसंहाराचं वार्तांकन करणारा अब्द अलकादर हबाक हा व्हिडिओग्राफर परवा, 16 एप्रिलला असाच व्यक्‍त झाला. केफ्राया व अल-फुआ गावातल्या युद्धग्रस्तांना बाहेर काढले जात असताना बसगाड्यांमध्ये स्फोट झाले. 68 बालकांसह तब्बल 126 लोक त्यात मारले गेले. स्फोटाच्या हादऱ्यानं हबाक बाजूला फेकला गेला. उठून पाहतो तर अवतीभोवती निरपराधांचे, कोवळ्या बालकांचे छिन्नविछिन्न झालेले देह. गळ्यात अडकवलेल्या कॅमेऱ्यावरचं त्याचं भान सुटलं. तडफडणाऱ्या बालकांना उचलण्यासाठी तो धावला. पहिलं बालक निष्प्राण होतं. दुसऱ्याकडे धावत असताना तेही जिवंत नसल्याचं कोणीतरी ओरडलं. हबाक थांबला नाही. ते जिवंत होतं. त्याला घेऊन तो जिवाच्या आकांतानं रुग्णवाहिकेकडं धावला. मुहंमद अलरागीब नावाच्या दुसऱ्या छायाचित्रकारानं त्याचा तो आक्रोश टिपला अन्‌ ते छायाचित्र जगभर व्हायरल झालं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com