अचम्भा दुनिया के लिए होगा...! (वुई द सोशल)

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

भलेही सर्वसामान्य भारतीयाला कधी विमानातही बसायला मिळालं नसेल. पीएसलव्ही अन्‌ जीएसएलव्हीमधला फरक कळत नसेल. उणे 253 अंशात पेट घेणाऱ्या द्रवरूप हायड्रोजन-ऑक्‍सिजनवर चालणारं क्रायोजेनिक इंजिनही त्याला माहिती नसेल; पण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे "इस्रो'नं एका रॉकेटवर सात देशांचे तब्बल 104 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केल्याचा अन्‌ अशी "सेंच्युरी' मारणारा भारत जगातला एकमेव देश असल्याचा प्रचंड आनंद त्याला झालाय. आनंद व्यक्‍त करण्याचं त्याच्या हाती असलेलं साधन म्हणजे "सोशल मीडिया'. गेले चार-पाच दिवस सर्वसामान्य भारतीय त्यावर व्यक्‍त होतोय.

भलेही सर्वसामान्य भारतीयाला कधी विमानातही बसायला मिळालं नसेल. पीएसलव्ही अन्‌ जीएसएलव्हीमधला फरक कळत नसेल. उणे 253 अंशात पेट घेणाऱ्या द्रवरूप हायड्रोजन-ऑक्‍सिजनवर चालणारं क्रायोजेनिक इंजिनही त्याला माहिती नसेल; पण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे "इस्रो'नं एका रॉकेटवर सात देशांचे तब्बल 104 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केल्याचा अन्‌ अशी "सेंच्युरी' मारणारा भारत जगातला एकमेव देश असल्याचा प्रचंड आनंद त्याला झालाय. आनंद व्यक्‍त करण्याचं त्याच्या हाती असलेलं साधन म्हणजे "सोशल मीडिया'. गेले चार-पाच दिवस सर्वसामान्य भारतीय त्यावर व्यक्‍त होतोय. मंगळयानावेळी हळदी-कुंकवाला आल्यासारख्या सजून, नटूनथटून आलेल्या "इस्रो'मधील आठ महिला शास्त्रज्ञांचे फोटो पुन्हा दिसायला लागलेत. शिवाय या घटनेवर विनोद-मिश्‍किलींनाही बहर आलाय. त्यातून शास्त्रज्ञांना हिणवण्याचा वगैरे उद्देश अजिबात नाही. अंतराळातील यशाचा देशावर प्रचंड प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांना आनंद झालाय अन्‌ तो व्यक्‍त करण्याची त्यांची पद्धत हीच आहे. 
म्हणूनच... 
इस्रो : अहो, ताई जरा सरकून बसा. अजून एक सॅटेलाईट बसेल. ओ मावशी, त्या बारक्‍या सॅटेलाईटला मांडीवर घ्या. ए, पोरा तू गिअरच्या पलीकडं पाय टाकून बस. 
रशिया : ओ जाऊ द्या की, आले की सगळे. 
इस्रो : थांबा जरा अजून दोन बसतील. 
किंवा... 
6 सीटर ऑटो में 14 सवारी, 
10 सीटर जीप में 25 लोग, 
52 सीटर बस में 152 लोग और 
1 रॉकेट पर 104 उपग्रह... अचम्भा दुनिया के लिए होगा, हमारे लिए ये रोज की बात है! 
तसेच... 
""इस्रोने आमच्याकडूनच प्रेरणा घेऊन इतके उपग्रह कोंबून अंतराळात पाठवले. देशहितासाठी आम्हाला कुठलंही क्रेडिट नकोय - काळ-प्पिवळी, वडाप चालक-मालक संघटना,'' 
अशा पोस्ट व्हायरल आहेत. त्यात राजकारणही आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना, "सारखंसारखं 70 साल, 70 साल करू नका, सत्तर वर्षांत काय केलं ते पहा', असं काहींनी सुनावलं. कोणी अरविंद केजरीवाल यांचा ताडासन करतानाचा फोटो टाकून त्याखाली "इस्रो का एक सॅटेलाईट भेजना रह गया', म्हटलं. "काही देशांच्या झेंड्यावर चंद्र आहे, काहींचा झेंडा चंद्रावर आहे', अशी शेजारच्या पाकिस्तानला उद्देशून तुलना झाली. 
अंतराळात फडकलेल्या तिरंग्याची ही दखल खेड्यापाड्यांपुरती मर्यादित नाही. "स्पेसएक्‍स'चा संस्थापक अन्‌ म्हटलं तर "इस्रो'चा स्पर्धक एलॉन मस्क यानंही भारतीय शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. मंगळयान मोहिमेनंतर न्यूयॉर्क टाइम्सनं सिंगापूरस्थित हेंग किम सॉंग यांचं भारताच्या यशाची खिल्ली उडवणारं व्यंग्यचित्र प्रकाशित केलं होतं. त्यासाठी संपादक अँड्रयू रोजेनथाल यांना दिलगिरीही व्यक्‍त करावी लागली होती. परवाच्या यशानंतर भारतीय व्यंग्यचित्रकार संदीप अध्वर्यू यांनी "इलाईट स्पेस क्‍लब'मध्ये भारत आणि दरवाजा ठोठावणारे अमेरिकन व स्विस अशा आशयाचं व्यंग्यचित्र रेखाटून अडीच वर्षांपूर्वीच्या हेटाळणीला प्रत्युत्तर दिलं. 

आसमां अब बाकी नहीं... 
गुरुवारी 104 उपग्रहांचं यश मिळवल्यानंतर तीनच दिवसांत "इस्रो'ने तब्बल 400 टन वजनाच्या "रॉकेट'साठी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी तमिळनाडूत महेंद्रगिरी इथं घेतली. माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी लवकरच "जीएसएलव्ही- एमके3'चेही प्रक्षेपण होईल, असं सांगितलं, तर शिवांथू पिल्लई यांनी भाकीत केलं, की 2030 पर्यंत चंद्रावरच्या धूलिकणांमधल्या हेलियम-3 च्या मदतीनं भारत ऊर्जेची गरजही भागवू शकेल. अन्य देशही हेलियम मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, त्यानं फरक पडत नाही. कारण, संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल, इतकं हेलियम चंद्रावर आहे, असं पिल्लई यांनी म्हटलंय. चंद्र किंवा मंगळावर मानवी अंतराळ अभियान आता यशाच्या टप्प्यात आहे व मधुचंद्रासाठी थेट चंद्रावर जाण्याचा क्षण फार दूर नाही, हा त्यांचा दावा आहे. 

Web Title: shrimanta mane writes about ISRO