सच्चा सूरच रसिकमनाला भिडतो...!

हेमंत जुवेकर
बुधवार, 28 डिसेंबर 2016

गोव्यात नुकत्याच झालेल्या "सेरिंडीपिटी' कला महोत्सवात शुभा मुद्‌गल यांनी सादर केलेला एक अनोखा प्रयोग पाहता आला. "लिव्हिंग ट्रेडिशन' या नावाने सादर झालेल्या मैफिलीत संगीताचे सादरीकरण तर होतंच; पण सोबत होता परंपरा जागवण्याचा प्रयत्नही. विसाव्या शतकाशी नातं सांगणारा पोशाख या कलाकारांच्या अंगावर होता, सेटही तसाच होता. हे सादरीकरण केले मुराद अली (सारंगी)- अक्रम खान (तबलासाथ), कौशिकी चक्रवर्ती (गायन)- योगेश सम्सी (तबलासाथ), पुर्बायन चॅटर्जी (सतार)- सत्यजित तळवलकर (तबलासाथ) या तरुण कलाकारांनी. परंपरा आणि भविष्य याचा अनोखा मेळ साधणाऱ्या या प्रयोगाविषयी शुभा मुद्‌गल यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्‍न ः संगीत ही मुळातच मोहमयी जादू; पण या महोत्सवात त्या जादूला तुम्ही वेगळंच रूप दिलंत?
शुभा मुद्‌गल ः "सेरिंडीपिटी' कला महोत्सवात आम्ही कलावंतांनी जे सादर करायचं ठरवलंय ते फार वेगळं असं काही नाही. मुळात या प्रकल्पाचं नावच "लिव्हिंग ट्रेडिशन' असं आहे. आपल्या परंपरा कशा प्रवाही आणि सर्वसमावेशक आहेत हेच दाखवायचं होतं आम्हाला यातून. प्रवाहात अनेक नवनव्या गोष्टी मिसळत जातात, तर मागे पडतात; पण प्रवाह थांबत नाही. तो अखंडित वाहत असतो. त्यात आपल्याला समृद्ध करतील अशा अनेक गोष्टी सापडू शकतात. गरज असते त्या प्रवाहाचा साकल्याने अभ्यास करण्याची. तो सादर करण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यात मग अनेक गोष्टी येत गेल्या. जुन्या रेकॉर्डस्‌, कॉश्‍च्यूम्स, सादरीकरणाची वेगळी पद्धत वगैरे...

प्रश्न : पण ही कल्पना मुळात आली कशी, साकार झाली कशी?
- माझे पती अनिश प्रधान आणि मी आम्हाला दोघांनाही ऐकायला खूप आवडतं. अच्छी चीजे सुननेके बहोत शौकिन है हम. संगीतामधल्या दिग्गजांनी सूरांचा ताजमहाल उभा करून ठेवलाय. त्याची अनुभूती या ऐकण्यातून मिळते. अनेक जण भेटतात, आपल्या गाण्याची तारीफ करतात; पण या मातब्बरांचं गाणं ऐकलं की जाणवतं, अरे आपल्याला अजून खूप प्रवास करायचाय. या साऱ्यांमध्ये काहींना काही खास गोष्टी येत होत्या. त्यांचा सूर लावण्याचा ढंग, त्यांचा सादरीकरणाचा रंग या साऱ्यांपासून खूप काही शिकता येतं. त्यांच्या काळातील आव्हानांना, बदलांना त्यांनी कसं तोंड दिलं हेही जाणवतं.

प्रश्न : पण राजवाड्याच्या दालनासारखा सेट, कलाकारांचे विसाव्या शतकासारखे कपडे...
- पूर्वी गाणं बहुधा राजदरबारातच सादर होई. निवडक मैफिलीच होत. राजपरिवार आणि त्यांचे सरदार अशा मोजक्‍या लोकांपुरतं मर्यादित असत त्या. अपवादानं काही मंदिरांतही गाणं सादर होई म्हणा; पण चांगलं गाणं मोठ्या प्रमाणात रसिकांपर्यंत पोचू लागलं ती रेकॉर्डिंगची सोय आल्यानंतरच. पण ही सारी गायक मंडळी होती ना, त्यांच्या मैफिली रात्र-रात्र चालत. त्यांचा रागविस्तार अगदी तबियतीत असे; पण रेकॉर्डस्‌च्या गरजेप्रमाणे त्यांना त्यांचं गाणं तीन किंवा पाच मिनिटांतच रेकॉर्ड करावं लागे. ये तो गागर मे सागर वाली बात हो गई ना...लेकिन उन्होने ना केवल उसे अपनाया बल्की अपनाही बना लिया. कारण आपण आजही या रेकॉर्ड ऐकतो ना तेव्हा जाणवतं, त्यांनी आपल्या मैफिलींचा सारा आनंद या तीन मिनिटांत बंदिस्त करून पेश केलाय. त्या आनंदप्रवाहात डुंबून जाताना वारंवार जाणवतं ते हेच की यातून आपण काहीतरी घ्यायला हवंय. हा आनंद इतरांनाही वाटायला हवा. या कलाकारांचा हा महान अंदाज मला या सेरिंडीपिटी कला महोत्सवात रसिकांसमोर सादर करावासा वाटला; पण त्याला आजच्या कलाकारांची जोडही लाभायला हवी होती. फिर मैंने मुराद अली भाई (सारंगीवादक) और हमारी संगीत बिरादरीके कलाकारोंसे संपर्क किया. त्यांना कल्पना आवडली; पण जुन्या कलावंतांची रेकॉर्ड थोडक्‍यात ऐकवायची आणि नंतर या कलाकारांच्या रागांचं, चीजेचं सादरीकरण अपने अंदाजमे सादर करायचं एवढंच त्या मैफिलीचं स्वरूप नसणार होतं. पुराने जमानेमें जो पोशाख पहेनते थे, साफा मेडल असं सारं परिधान करून त्या मैफिलीचं सादरीकरण करायचं होतं. तुम्ही ती मैफील ऐकली ना, त्यात सुरवातीला जे सादरीकरण केलं ते उभं राहून केलं गेलं. कारण पूर्वी दरबारात ते तसंच सादर होई. सारंगी, तबल्यासारखी अवजड वाद्यं कमरेला बांधून वाजवणं सोपं नव्हे; पण परंपरांची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी ते आनंदाने केलं. त्यांना रोहित बाल यांनी अतिशय योग्य पद्धतीने त्या काळाशी नातं सांगणाऱ्या वेशात सजवलं होतं. तो माहौलच उभा करायचा होता आम्हाला. या कलाकारांनी आपल्या गायकीने त्यावर कळस चढवला.

प्रश्न : हल्लीच्या लोकप्रिय संगीताच्या मैफिलीत गायक-वादक विलंबित गायन-वादनाऐवजी द्रुत लयीला जास्त प्राधान्य देताना दिसतात. सच्च्या गाण्याऐवजी चमत्कृतीला प्राधान्य मिळतंय असं वाटतं?
- सच्चा कलाकार गाणं सादर करतो तेव्हा ते संपूर्ण असतं; पण केवळ विलंबित म्हणजेच चांगलं संगीत आणि द्रुत लय म्हणजे केवळ चमत्कृती असं मुळीच नाही. क्षमता असतील तर विलंबित तालातही तुमच्या गाण्याचं सौंदर्य दाखवू शकताच की, आणि रसिक तेवढ्या क्षमतेचे असतील तर ते त्यांना भावेलच. रसिकांची क्षमताच नसेल तर द्रुत लय असो की चमत्कृती. ते त्या मैफिलीत थांबणार नाहीच; पण मला एक सांगायला हवं की महाराष्ट्र असो की गोवा, खूप चांगले ऐकणारे असतात इथे. संगीत के पारखी बहोत है यहॉं. खूप जाणकारीने ऐकतात. खूप आनंद घेतात संगीताचा. त्यामुळे कलाकार इथे खुलतोच आणि अर्थातच त्याचं गाणंही. शेवटी गाण्यातली एकच गोष्ट खरी- इथे सच्चा सूरच मनापर्यंत पोचतो, सच्चा सूरच टिकतो.

Web Title: shubha mudgal experiments at serendipity fest in goa