जिंदगी ही तो है!

सोनाली नवांगुळ
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

‘जाने क्‍या सोचकर नहीं गुजरा, एक पल रातभर नहीं गुजरा’ असेपण दिवस असतात. संध्याकाळ तयार करते तसली हुरहूर, बेचैनी आणि व्याकूळता महिनोन्‌महिने सरत नाही. आपण असतो ताठ्याचे. मुके राहतो. वाटतं की ही अवस्था खूप कारणांनी आलीय. भूतकाळ नि भविष्यकाळ यांच्या सांध्यावरचं आताचं जगणं नेमकं कसं हाताळावं कळत नाहीये. अशावेळी या ना त्या कारणांनी रडू येतं, पण आतून आपल्याला नीट ठाऊक असतं, की हे जे आपण रडतोय किंवा ही जी खिन्नता आहे तिचं ते केवळ तत्कालीक कारण आहे. काहीवेळा ही अस्वस्थता नि त्यातून आलेलं मौन रिक्त असतं, तर काही वेळा ते मुक्त करतं नि तुम्ही वेगळे होऊन जाता. पण हे नंतरचं काव्य.

‘जाने क्‍या सोचकर नहीं गुजरा, एक पल रातभर नहीं गुजरा’ असेपण दिवस असतात. संध्याकाळ तयार करते तसली हुरहूर, बेचैनी आणि व्याकूळता महिनोन्‌महिने सरत नाही. आपण असतो ताठ्याचे. मुके राहतो. वाटतं की ही अवस्था खूप कारणांनी आलीय. भूतकाळ नि भविष्यकाळ यांच्या सांध्यावरचं आताचं जगणं नेमकं कसं हाताळावं कळत नाहीये. अशावेळी या ना त्या कारणांनी रडू येतं, पण आतून आपल्याला नीट ठाऊक असतं, की हे जे आपण रडतोय किंवा ही जी खिन्नता आहे तिचं ते केवळ तत्कालीक कारण आहे. काहीवेळा ही अस्वस्थता नि त्यातून आलेलं मौन रिक्त असतं, तर काही वेळा ते मुक्त करतं नि तुम्ही वेगळे होऊन जाता. पण हे नंतरचं काव्य. माझी अशी अवस्था काही वर्षांपूर्वी मला येऊन भेटलेली (ती भेटतंच असते इथेतिथे, केव्हाही.) तेव्हा उदयकाकांनी न सुचून मला पुस्तकाच्या दुकानात ‘अक्षरदालना’त नेलं होतं. तिथली पुस्तकं उलटीसुलटी करून बघताना ‘कोरा कागद निळी शाई’ नावाचा काव्यसंग्रह उघडला नि दोन ओळींवर नजर ठरली...‘ऊन, पाऊस, थंडी, वारा काहीही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी ऐट येते पोरा...’ खूप काळ बंद असलेलं दार या ओळींमुळं किलकिलं झालं. उगीचच ताठ बसले. उगीचच स्वत:चे चांगले निर्णय आठवले. टप्प्याटप्प्यानं सापडत गेलेली माणसं, चांगुलपण, पुस्तकं, जागा असा बराच तळ ढवळत राहिला. नंतरच्या काळात हळूहळू जगण्यातल्या काही तुकड्यांकडं वेगळ्या कोनातून पाहणं साधत गेलं. आपल्या स्वभावाचा व नैराश्‍याचा पॅटर्न कळला हे कळून टवटवी आली. परत कधीतरी कळलं की हा पॅटर्नही खरा नव्हे, त्याबद्दलचं आकलन कधी गुंगारा देईल सांगता येत नाही. वेगवेगळ्या कारणांनी येणारी सगळी अस्वस्थता आपल्याच बळावर रेटायची हा हट्ट नको. जवळच्यांच्या वेळेचा अपव्यय कशाला, म्हणून त्यांना टाळायला नको. आडवंतिडवं, वेडंविद्र, प्रौढ, बेदरकारीचं नि शरणभावाचं जे असेल ते विश्‍वासाच्या कुशीशी बोलून घ्यावं. ऐकणारा तटस्थपणानं ऐकता ऐकता स्वत:शी सामोरा जातो असंही होतं.

मैत्रिणीनं, वंदनानं तर तिच्यापुरती युक्ती केलेली. म्हणाली, जे वाचतेय त्यातली ‘अफरमेशन्स’ लिहून काढतेय. ती लिहून काढताना व पुन्हा स्वत:ला सांगताना मनात एक निश्‍चय होतोय. गंमत म्हणजे विशिष्ट प्रश्‍नांच्या काचाने विशिष्ट भावावस्थेत असताना त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी अशी वाक्‍यं जणू वाट बघत असतात. फक्त आपण मान वर उचलण्याची देरी! - मीही लिहिलं मग, ‘जिंदगी ही तो है!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonali navangul write pahatpawal article in editorial

टॅग्स