घाई नकोय...

सोनाली नवांगुळ
Friday, 15 February 2019

खूपदा होतं असं की रिक्षावाला ‘येणार नाही’ म्हणतो. नव्यानं नकार ऐकताना मागच्या अनुभवांचं गाठोडं मग आपोआप उलगडतं नि जुनानवा राग भस्सकन बाहेर येतो. मागे एकदा वयानं पिकलेला रिक्षावाला ‘नाही येत’ म्हणाला. त्याला गोड बोलून-ओरडून तयार केला नि व्हीलचेअर रिक्षाजवळ लावली, तर म्हणाला, ‘ओ बाई, नवी रिक्षा ह्ये. तुमचा गाडा टेकवू नका तिला.’ व्हीलचेअर रिक्षापाशी नीट टेकवून, एक महाश्‍वास घेऊन मगच मला वर चढता येणार होतं. मी तणतणले की व्हीलचेअरला गाडा का म्हणावं? मी काय कुणाचं नुकसान करणारी दिसते का? माणसं शरीराच्या स्थितीतून गरजू दिसली की कुणीही येऊन सूचना द्याव्यात नि तुच्छ लेखावं ही जगरहाटी आहे का?

खूपदा होतं असं की रिक्षावाला ‘येणार नाही’ म्हणतो. नव्यानं नकार ऐकताना मागच्या अनुभवांचं गाठोडं मग आपोआप उलगडतं नि जुनानवा राग भस्सकन बाहेर येतो. मागे एकदा वयानं पिकलेला रिक्षावाला ‘नाही येत’ म्हणाला. त्याला गोड बोलून-ओरडून तयार केला नि व्हीलचेअर रिक्षाजवळ लावली, तर म्हणाला, ‘ओ बाई, नवी रिक्षा ह्ये. तुमचा गाडा टेकवू नका तिला.’ व्हीलचेअर रिक्षापाशी नीट टेकवून, एक महाश्‍वास घेऊन मगच मला वर चढता येणार होतं. मी तणतणले की व्हीलचेअरला गाडा का म्हणावं? मी काय कुणाचं नुकसान करणारी दिसते का? माणसं शरीराच्या स्थितीतून गरजू दिसली की कुणीही येऊन सूचना द्याव्यात नि तुच्छ लेखावं ही जगरहाटी आहे का? मीटरप्रमाणे पैसे घेणारच ते नि मीही देणारच, तरी सगळ्याच पातळ्यांवर का म्हणून संघर्ष असावा? ‘सेल्फ एस्टीम’ नावाचा प्रकार माळ्यावर ठेवून जगायचं काय? माझ्या डॉ. आश्‍विनी म्हणाल्या, ‘तू थोडं थांबून दुसरी रिक्षा घ्यायला हवी होतीस. रागाच्या नि अपमानाच्या झळीत तू तुझ्या शरीरातल्या किती चांगल्या पेशी मारल्यास. सगळ्यांना आपण सुधारू शकत नाही. नुस्ता विकतचा मनस्ताप! त्यानं ‘नको’ म्हटलं असताना हट्टानं रिक्षात चढून घरी परतणं, यात दिसताना तू जिंकलीस तरी काय किमतीवर?’ - त्यांनी माझ्या मनाच्या व शरीराच्या काळजीपोटी सांगितलं ते खरंच होतं हे नंतर पटलं. काही संघर्ष आपण ओढवून घेतो.

कालचंच बघा. रिक्षा सोडण्याची रिस्क रात्री परवडणार नव्हती. एकटीच होते. रिक्षावाल्यानं जादा पैसे सांगितले. मी वरवर शांत स्वरात मात्र तल्खीनं म्हटलं, ‘मी देईन पैसे, पण हे बरोबर आहे का ते तुमचं तुम्ही बघा.’ रिक्षा चालू झाल्यावर थोडा वेळ रिक्षावालेही गप्प नि मीही. मग तेच बोलायला लागले, ‘ताई, मी रोज सातच्या आत धंदा सुरू करतो. रात्री साडेआठला इथलं थांबवून रंकाळ्याच्या एका स्टॉपवरनं २२ कि.मी.वरच्या माझ्या गावाच्या वाटेत असणारी भाडी घेतो. उशीर झाला की ती मिळत नाहीत नि मला रिकामं जावं लागतं. म्हणून जादा पैसे सांगितले. दिवसभर इमानीत धंदा करतो. कश्‍टमर बसला की त्यांना मीटर टाकून दाखवतो. एक रुपया जास्त नाही कुणाकडनं. आई-बाप थकलेले. मुलं सरकारी शाळेत शिकतात. शेतीभाती नाही. बायको रोजंदारीवर जाते. दिवसभर घाम गाळून पन्नासभर रुपये हातात येतात. घामाच्या दर थेंबाचा हिशेब घेतंय जगणं, देतंय कमीच. पण प्रामाणिक आहे मी. माझ्याबद्दल गैरसमज करून घिऊ नका.’ - खरंय नामदेवदादा. प्रतिक्रियेची घाई नकोय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonali navangul write pahatpawal article in editorial