सळसळ...

sonali navangul
sonali navangul

मी शाकाहारी. त्यामुळं मासळी बाजारात जाणं काही शक्‍य नाही. प्रयत्न केलेला, पण वास सहनच होत नाही तिथला. मग कुठल्याशा सिनेमात किंवा माहितीपटात दिसलेला मासळी बाजार पाहिलेला; पण काही गोष्टींबद्दल असं दुरून पाहून ‘कनेक्‍शन’ नाही ना तयार होत! मला वास वगळून माहौलची ‘मजा’ घ्यायची होती. एक मित्र म्हणालेला, ‘मासळी बाजाराचं चैतन्यच मुळी तिथला तो धप्प भरून राहिलेला वास असतो. उरलेलं सगळं त्या वासाच्या पार्श्‍वभूमीवर तयार होतं.’ झालं का!
परवा एका नव्या भागात फिरताना अण्णांना म्हणालेले, की या भागात किती मांसाची दुकानं आहेत? तेव्हा ते म्हणाले, जरी ते मांसच असलं, तरी त्याला सुसंस्कृतपणे मटण किंवा चिकन म्हणतात. खाल्लं नाहीस तरी टर्म नीट वापर. तुझ्या आवडीचा नसलेला भाग आदरास पात्र नसणार हे चूक आहे. - तर या मनातल्या विचित्र अंतरामुळं खूप जागांच्या गमती मी गमावत होते. त्याच दरम्यान शुभा गोखलेची ‘बाजार’ नावाची चित्रमालिका बघितली नि माझी हौस फळली. शुभाच्या चित्रांमधला मासळी बाजार तिनं खरोखरी अनुभवलेल्या रंगा-गंधातून कॅनव्हासवर उतरला होता. कोळणींची बसण्याची ढब, त्यांचे सैलावलेले, तरारलेले कितीतरी देहाकार, रंगीतसंगीत कपडे, त्यांच्यापुढचे तऱ्हतऱ्हेचे हातात घेऊ शकू असे वाटणारे मासे, त्यांचे तुकडे करायची हत्यारे, रंगीत बास्केटी, मागच्या चमक हरवलेल्या टाइल्स... असं सगळं तिथल्या गजबजाटासह माझ्यात जिवंत झालं. यात कोळणींइतकाच महत्त्वाचा असणारा कावळा जागोजाग जणू त्यांची सोबत करत होता. प्रेमळ, आग्रही नि निर्विकार कोळणी यामागचं शुभानं पाहिलेलं चित्र तिच्या रंगांतून माझ्या सहजाणिवेचा भाग झालं. न पाहिलेला कोपरा जागवत त्याची गोष्ट मला सांगत राहिलं. गर्दीची अशी ठिकाणं त्यांचं वेगळंच तत्त्वज्ञान घेऊन काय काय सांगत राहतात!  गर्दाळलेला हा भरला बाजार उत्फुल्लतेनं दर्वळलेला असतोच, पण शांत झालेले बाजारही आपली वेगळीच गोष्ट सांगतात. तिन्हीसांज उलटल्यावर गारगोटीचा जो बाजार पाहिला, तो चित्रासारखाच मनावर उमटून राहिला आहे. रात्री जेवणबिवण करून शांत निवांत होऊन, दोन-तीन तासांपूर्वी गजबजलेल्या नि आता शांत झालेल्या रस्त्या-गल्ल्यांमधून फिरताना तिथले आवाज ऐकू यायला लागले. उन्हापासून आडोसा म्हणून लावलेली ताडपत्री, छत्र्या दिसायला लागल्या. मोलभाव करणाऱ्या बाजाराचा ‘आवाज’ तिथल्या गल्लीभर पसरलेल्या लसूण नि कांद्यांच्या सालांतून सजला होता. पालेभाज्यांचे न खपलेले बारकेसारके ढीग इतस्तत:, पण विशिष्ट रांगेत विखुरले होते. तांदूळ, डाळी, कडधान्यं मात्र इतकुशी कुठंतरी. हळदबिळद. भज्यांचा दबका वास. बाजार काळाच्या बरोबर व्यावहारिक असूनही, किती स्वप्नाळू ठेवतो, गोष्टी देतो. शांत झाल्यावरही त्याची सळसळ झिरपत राहते आपसूक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com