असा हवासा दंश...

शुक्रवार, 5 एप्रिल 2019

दिसणं नाजूक. अंगकाठी सडसडीत, इतकुसं नाक, टपोरे डोळे. तिला पाहिलं की, कुणालाही प्रेम प्रेम प्रेम यावं. आवाज मात्र विशिष्ट किनरा नाही. हुकमी, मोठा. काही हवं तर आज्ञा देते ती, नुसतं सांगत नाही सरळ. हवं ते शिस्तशीर करवून घेते समोरच्याकडून. उगीच संकोच वगैरे चैन करत नाही. माझी शेजारीण ती. युतिका. अगदी पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा वाटलं, जेमतेम तीन वर्षांची पोर किती सजलीय नीटनेटकी! केसांना रोज वेगवेगळ्या क्‍लिप्स, भारी गोड छोटे फ्रॉक्‍स किंवा टीचभर टीशर्ट.

दिसणं नाजूक. अंगकाठी सडसडीत, इतकुसं नाक, टपोरे डोळे. तिला पाहिलं की, कुणालाही प्रेम प्रेम प्रेम यावं. आवाज मात्र विशिष्ट किनरा नाही. हुकमी, मोठा. काही हवं तर आज्ञा देते ती, नुसतं सांगत नाही सरळ. हवं ते शिस्तशीर करवून घेते समोरच्याकडून. उगीच संकोच वगैरे चैन करत नाही. माझी शेजारीण ती. युतिका. अगदी पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा वाटलं, जेमतेम तीन वर्षांची पोर किती सजलीय नीटनेटकी! केसांना रोज वेगवेगळ्या क्‍लिप्स, भारी गोड छोटे फ्रॉक्‍स किंवा टीचभर टीशर्ट. कधी कधी वाटतं, मनात फार रागराग झाला, साठून आलं की असे छोटुसे कपडे पाहावेत, हाताळावेत नि त्यानंतर आपल्याच मनातलं प्रेम नि सात्विकता पाहून चकित होत राहावं.

मागच्या वर्षी आली ती इथे. माझं तिचं पहिल्या फटक्‍यात जमू लागलं. हलकं फूल ती. माझ्या व्हीलचेअरच्या फुटरेस्टवर उभं राहून गुलाबीसर बोट दाखवत इकडं-तिकडं ने असं सांगायची. तिला माझं घर फार प्रिय, कारण सगळं व्हीलचेअरवरून साधावं इतक्‍या कमी उंचीचं. त्यामुळे दर दहा मिनिटांनी हात धुवायचा नि पुसायचा; पण नॅपकीन नीट ठेवायचा ही शिस्तही आवडीनं पाळायला लागली. आम्ही तिच्या नावाची ‘टायटल ट्यून’सुद्धा बनवली. माझ्याकडे येणाऱ्या मित्र-मैत्रिणींना हात नागमोडी वळवत ती ते म्हणून दाखवायची, ‘युटिकीऽऽऽयुटिकीऽऽऽयुटिकीऽऽऽ...’ ‘ळ’चा आणि एका अक्षराचा उच्चार गंडलेला त्यामुळे तिचं नवं भाषाशास्त्र समजून वागावं-बोलावं लागतं, नाहीतर छटाकभर असणाऱ्या मॅडमचा घुस्सा आकाशाला भेदून भूमंडळ डळमळवतो. बोट नाचवत, रागानं हेलकावे खाणारं अंग हळूहळू आपल्यापाशी घेत सांभाळून तिला दुसऱ्या विषयाकडं वळवावं लागतं. ‘युटू, स्वयंपाकात मदत कर,’ म्हटलं की खूष. कदाचित तिला सारखं न हटकल्यामुळं नि मनासारखं धडपडू दिल्यामुळे ती माझं बऱ्यापैकी ऐकते. माझ्याशी जोडलेल्या जवळपास सगळ्यांना ही भेटलीय किंवा माहिती तरी आहे. तिचं गॅदरिंग झालं नुकतंच. ‘तू पेमी (जोरात आहा), मैं पेमी (आणखी जोरात) पिर क्‍या देदीक्‍याअम्मा, तम्मातम्मा लोगो हम्मा’ या स्वत:च्या शास्त्रात ढाळलेल्या गाण्यावर जेव्हा ती नागीण होऊन डोक्‍यावर पिटुकल्या हातांनी इटुकला फणा उभारते तेव्हा वाटतं, तिच्या निरागसतेचे, सहजपणाचे दंशावर दंश व्हावेत. सगळं सोपं होऊन जाईल. एका सिनेमात शिक्षेचा भाग म्हणून गुन्हेगारांना फूल व मूल दिसता कामा नये याची काळजी का घेतली गेली, ते कळूनच गेलं. ‘पॉवरचेअरवरून कधी जौया फिरायला?’ असं आर्जवी विचारत ती मला घराबाहेर काढते. आम्ही लांबलांब फिरतो. ती मांडीवर बसलेली असते. गर्दी, स्पीडब्रेकर पाहून कधीही घाबरून घट्ट धरत नाही. विश्‍वास ठेवण्याची तिची तऱ्हा मला अधिक माणूस बनवते.