कमी पवित्र

sonali navangul
sonali navangul

चंद्रमोहन कुलकर्णींशी बोललं की जुन्या आठवणींतही काहीतरी खास जाणवायला लागतं. मागं एकदा त्यांच्याशी डिजिटल पेंटिंगविषयी गप्पा मारत असताना मिश्‍किल सूर लावत ते म्हणाले होते, ‘कसं आहे नं, मी जरा कमी पवित्र माणूस आहे. कागदावर रंग आणि ब्रशनं केलेलं चित्रंच पवित्र असं मी मानत नाही. आता माझा स्टुडिओ पाहशील तर एक खोली कॉम्प्युटरची आहे. तिथं फक्त तेवढंच आहे. उपयोजित प्रकारचं खूपसं काम तिथं चालतं. ते आटोपून मी दुसऱ्या खोलीत येतो. तिथं रंग, ब्रश, कॅनव्हास, कागद, खडू, इजल, रंग पुसायची फडकी आणि तो विशिष्ट वास असं सगळं असतं. कॉम्प्युटरच्या खोलीतून मी इथं आलो की तिथलं विसरतो. तिथं अनडू कमांड आहे, ती इथं नाही. इथं रंग सांडणार, पाणी पडणार, ती पुसायची फडकी लागणार. सगळ्याचा पसारा असणार. इथं मुळातच तुम्हाला पोज घ्यावी लागते. दोन्हीतल्या फरकाचं जास्त भान ठेवावं लागतं.’

पारंपरिक नि डिजिटल पेंटिंगचा खरा तर विषय, पण त्यांच्या त्या बोलण्याचा कंटेंट लक्षात घेऊन मी माझ्या हुरहुरीकडे बघितलं. या हुरहुरीचा चित्रांशी तसा संबंध नाही, पण मे महिन्याची लहानपणाची सुटी पेस्टल शेड्‌समध्ये सतत दिसत राहायची. मे महिना नि लहानपणाचं घट्ट नातं आणि त्याची वाट इतकी बघितली जायची की जणू सगळा काळ काबाडकष्ट केलेत नि एक महिना पेरोलवर सुटणारे. चिपळूणच्या दमट उकाड्यात आम्ही सगळी भावंडं जमलेली असायचो. खेळात रमून दिवस उडून जायचे. स्वयंपाकघरातून विश्‍वामित्राचा तपोभंग होईल, जमदग्नीचा राग कमी होईल असले वास सुटलेले असायचे. एका खोलीत आंब्यांची आढी लावून ठेवलेली असायची. तिन्ही त्रिकाळ हरतऱ्हेचे आंबे! मामा, मावश्‍या यांचे ठरवून निराळे पदार्थ व्हायचे. स्वयंपाक म्हणजे रहाटगाडग्याचा भाग नव्हताच. एकमेकांबद्दलची आस्था, जुन्या माणसांनी ठरवलेल्या काही परंपरा, रांधण्याच्या विशिष्ट प्रथा नि सगळे एकमेकांच्या भवती राहून शेवटी सजलेली पंगत. ती सुटी आता भूतकाळात गेली, असा विचार करताना वर्तमान जरा जडच होतो. सुटीदु:ख हे आपलं उगीच, पण आठवणीचा गोडवा उल्हासित करण्यासाठी जुनं काही नसल्याचं थकलेपण जडत्व देतं. काळाचं रडं रडायची ठराविक चाकोरी आजारी करते. चाकोऱ्या मोडण्यासाठीच असतात. - तेव्हा जुन्या आठवणींनी मेंदूत पाझरणाऱ्या रसायनांना जागून मीही मग ‘कमी पवित्र’ व्हायचं ठरवते नि आमरस, उकडीची मऊसूत पोळी व लाल मिरची नि हिंगाची खमंग फोडणी दिलेली फणसाची भाजी खाऊन मेची सुटी साजरी करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com