नव्या सिद्धार्थाची शोधयात्रा

sriranjan aawte
sriranjan aawte

: अरे, साठोत्तरीवाल्यांनी एवढं लिहून ठेवलंय; तुम्ही नवं काय लिहिणार !
: अगदी खरंय. व्यासांनी तर सारं जगच उष्टं केलंय. तरीही तुम्ही लिहिलंत हे विशेष.
: अरे, पण आमच्या काळाचे काही पेच आम्ही मांडू तरी शकलो.
: आणि आमच्या काळाचे पेच नाहीत? आता या काळात तुम्ही आहात की नाही? की काळ संपला तुमचा? पिढ्यांचे हिशेब आणि वर्गीकरणाचे फंडे एकदा रद्दीत द्यावेत. डोळे धुऊन घ्यावेत अन्‌ चष्मे फेकून नवं जग पाहावं.
---
एका सीनियर साहित्यिकासोबत झालेला माझा हा संवाद. पोकळ शेरेबाजी आणि अनाठायी पालकत्व घेण्याची आस यात अडकलेल्यामागच्या पिढीचे बव्हंशी प्रतिनिधित्व करणारे काही आवाज सतत कानी पडत असतात. नोस्टॅल्जियात रमलेली ही पिढी आजच्या आमच्या युवा पिढीला एका झटक्‍यात डिसकार्ड करण्यास आतुर झालेली असते. ‘आमच्या वेळी ना’ असे म्हणत ते ‘घालीन लोटांगण’ करत गिरक्‍या घेत राहतात.
‘पांडुरंग सांगवीकर’ शतखंडित झाला, ‘ययाति’चे तारुण्य टिंडरवर ओसंडून वाहू लागले अन्‌ पेठांमधले चौसोपी वाडे उद्‌ध्वस्त झाले, असं किती काय काय, तरी यांच्या प्राचीन सनातन गाडीचे चाक कुठल्या चिखलात रुतून बसले आहे, कोण जाणे! कदाचित अशा चिखलामुळेच ‘कमळ’ उगवत असावं! असो. तर या काळाचे पेच आहेत. भयानक गुंतागुंतीचं बहुपेडी, बहुस्तरीय असं हे त्रांगडं. या काळाचा वेग, दिशा आणि मर्म काहीच मुळी समजत नाही.
प्रचंड सुसाट वेगात हा काळ धावतो आहे. चिमटीत पकडता येत नाही. निसटून जातो सतत. सरकत्या जिन्यावरुन चालल्यासारखं. आपण स्थिर आहोत, असं वाटतं स्वतःला; पण वेगात पुढे जात राहतो.
कॅलिडिओस्कोपमधून पाहताना क्षणाक्षणाला रंग बदलत जातात तसं काहीसं; पण हाती काही लागत नाही. पाऱ्यासारखं निसटून जातं ते. अदिश राशींची सुसाट बुलेट ट्रेन बेभान, बेपर्वा. तिच्यातील धग शमत नाही आणि परमोत्कर्षाचे क्षणही गाठता येत नाहीत. व्यक्त होता येत नसल्यानं होणारी घुसमट पसरत जाते दाही दिशा. समाधानाचे तुकडे इतस्ततः विखुरले जातात आणि लौकिक खदाखदा हसू लागते. अशा वेळी जगण्याची अर्थपूर्णता शोधण्यासाठी नवा ‘सिद्धार्थ’ पुन्हा बाहेर पडतो आहे. विपुलतेतून नव्हे तर भयाण कमतरतेतून. असोशीतून.
आवेगातून. अगतिकतेतून. असण्याचं इप्सित शोधत. मोक्षाचे पत्ते शोधत, मुक्तीच्या पिन कोडवर. जगण्यासाठी, धावण्यासाठी हवं असणारं चिमूटभर प्रयोजन आणायचं कुठून? उसनवारीने प्रेरणा आणायची कशी?
निरर्थकतेचा भव्य डोलारा बांधला जाण्याच्या काळात सिनीकल असणं हीच स्वाभाविक प्रकृती मानावी की काय, इतका प्रचंड व्हॅक्‍यूम ! ऑनलाइन इमोजींच्या माध्यमातून भावनिक आधार केंद्रं उभारली जाण्याच्या वेळी ही विस्तीर्ण पोकळी जीवघेणी ठरली नाही, तरच आश्‍चर्य!
बेरोजगारी, उपासमार आणि शिक्षण कृषी आरोग्याची वाताहत या साऱ्यातून आत्महत्येची जणू सुप्त लाट निर्माण झाली आहे आणि हे सारं प्रस्तराखाली दाबून एक अलिशान चित्र राजा रंगवतो आहे, अच्छ्या दिनांची स्वप्नं भुईसपाट करणारा राजा अवतरला तरी आम्ही रोम जळत असताना पार्ट्या झोडणा-या निरो राजाच्या पाहुण्यांसारखं भ्रमिष्ट झालो आहोत. एकटेपणाचे सोहळे साजरे करत आहोत. आमच्या वाट्याला ना स्वातंत्र्ययुद्ध ना घोषित आणीबाणी ना हिरोशिमा, नागासाकी. आहे ते निव्वळ आमचं हतबल असणं. ‘फाइटक्‍लब’ या सिनेमातील हा गोळीबंद संवाद माझ्या कादंबरीतील एका पात्राच्या तोंडीही आहेः
We are the middle children of History
No purpose or place
We have no great war
No great depression
Our great war is spiritual war
Our great depression is our lives!
हे इब्सेनियन शोकांतिकेप्रमाणे असलेलं आमचं स्वतःचं स्वतःसोबत असलेलं वैफल्य एका आध्यात्मिक युद्धाला आमंत्रण देत आहे. आत-बाहेर, सर्वत्र युद्ध. विवेक हतबुद्ध. यातून बाहेर कसं पडायचं? स्वतःच अभिमन्यूच्या चक्रव्यूहात अडकल्याप्रमाणे ही अवस्था. ‘आपुलाचि वाद आपणासी’ अशी स्थिती; पण संवादाचा प्रस्फोट झालेल्या काळात मनाचे सारे दरवाजे बंद. अशा आव्हानात्मक काळात स्वतःला निरखत जाणं, आकळून घेणं हेच किती कठीण ! आयडेन्टिटीजचे बहुरंगी कोलाज आणि संधींची अभावग्रस्तता या तारेवर तांडवनृत्य सुरू आहे आणि कानावर कोणतंच संगीत पडत नाही. लय हरवून गेलेल्या काळात यमकबद्ध रचना करणा-या कवीसारखी असहाय्य तडफड आणि एकेका थेंबासाठी आसुसलेल्या चातकाप्रमाणे फडफड! तरीही  ‘दिल बहलाने के लिए गालिब ये खयाल अच्छा है’ म्हणत आम्ही सुरेश भटांना आठवत राहतो-
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com