हृदयरुग्णांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

हृदयविकाराचे निदान म्हणजे "हृदयाचा ठोका' चुकविणारीच घटना. एकतर थेट रुग्णाच्या जिवावर बेतलेला विकार आणि दुसरे म्हणजे अवघ्या काही तासांत लाखो रुपये उभारण्याचे नातेवाइकांपुढील आव्हान. अशा कात्रीत सापडलेल्या देशातील हजारो रुग्णांना स्टेंटच्या किंमती कमी झाल्याने निश्‍चितच दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, हे या विशिष्ट प्रकारच्या हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण. त्यामुळे हृदयाला त्याचे कार्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. परिणामी, हृदयविकाराचा झटका येतो.

हृदयविकाराचे निदान म्हणजे "हृदयाचा ठोका' चुकविणारीच घटना. एकतर थेट रुग्णाच्या जिवावर बेतलेला विकार आणि दुसरे म्हणजे अवघ्या काही तासांत लाखो रुपये उभारण्याचे नातेवाइकांपुढील आव्हान. अशा कात्रीत सापडलेल्या देशातील हजारो रुग्णांना स्टेंटच्या किंमती कमी झाल्याने निश्‍चितच दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, हे या विशिष्ट प्रकारच्या हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण. त्यामुळे हृदयाला त्याचे कार्य करण्यासाठी पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. परिणामी, हृदयविकाराचा झटका येतो. हा रक्तवाहिनीमधील अडथळा दूर करून रक्तपुरवठा नीट व्हावा, यासाठी स्टेंटचा वापर केला जातो. त्याच्या किंमती आजवर सर्वसामान्यांच्या हृदयात धडकी भरविणाऱ्याच होत्या. रुग्णाच्या प्रकृतीचा एकंदर विचार करून हृदयरोगतज्ज्ञ स्टेंटची निवड करतात. काही स्टेंट हे "ड्रग्जकोटेड' असतात. त्यांची किंमत सामान्य स्टेंटच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असते. त्यामुळे उपचारांचा खर्च आवाक्‍याबाहेर गेला होता. अशा सर्व स्टेंटच्या किंमती 85 टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आल्या आहेत. याआधी स्टेंटसाठी 36 हजारांपासून दोन लाखांपर्यंत रुपये मोजावे लागत होते. आता या किंमती किमान सात हजार आणि कमाल 30 हजार रुपये एवढ्याच असतील. आपल्या देशात आरोग्याबाबत जागृती नाही. त्याचा गैरफायदा काही रुग्णालय आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून घेतला जातो. अँजिओप्लास्टी हाही याचाच एक भाग होता. छातीत दुखू लागले, जळजळ होऊ लागली की "अँजिओग्राफी' करून कोरोनरी आर्टरीमध्ये "ब्लॉक' असल्याचे निदान नातेवाइकांना सांगायचे. "तातडीने प्लास्टी करावी लागेल. दहा मिनिटांत निर्णय घ्या. वेळ फार कमी आहे,' असा निरोप देताना न विसरता "पैसे भरा' असे सांगितले जात असे. अशा "प्रॅक्‍टिस'मधून असंख्य तरुणांवर "स्टेंटिंग' झाले आहे. काही रुग्णांसाठी याची निश्‍चित गरज होती; पण केवळ डॉक्‍टरांच्या दबावामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी उपचाराला परवानगी दिल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. नजीकच्या भविष्यात स्टेंटप्रमाणेच हृदयविकाराच्या उपचारांच्या खर्चाची मर्यादा रुग्णालयावर घालण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्‍यक आहे. त्यातून खऱ्या अर्थाने वैद्यकीय उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येतील.

Web Title: Stents prices heavily slashed