आता कसोटी चित्रपट प्रेक्षकांची

सुनील सुकथनकर
शनिवार, 21 एप्रिल 2018

या वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या वर्षी पुरस्कार समितीच्या प्रथम फेरीच्या विभागात एक परीक्षक म्हणून मी काम पाहिले. . या वर्षी ‘सुवर्णकमळ’ मिळालेला ‘व्हिलेज रॉकस्टार’ हा चित्रपट आसामच्या खेड्यातली पौगंड वयातली मुलगी-तिची आई-गाव-मुलं या साऱ्यांचे भावविश्व एखाद्या माहितीपटाच्या खरेपणाने दाखवत, पण जीवननाट्याचे दर्शन घडवत जाणारा आहे. एका तरुण दिग्दर्शिकेने कथा-पटकथा इथपासून ते छायाचित्रण-संकलन स्वतःच करत तो बनवलेला आहे, ही आनंदाची बाब! या वर्षीची पूर्ण यादी पहिली तर वेगवेगळ्या भाषा आणि तंत्र विभाग यात समाधानकारक निर्णय झाले आहेत असे वाटते.

या वर्षीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. या वर्षी पुरस्कार समितीच्या प्रथम फेरीच्या विभागात एक परीक्षक म्हणून मी काम पाहिले. . या वर्षी ‘सुवर्णकमळ’ मिळालेला ‘व्हिलेज रॉकस्टार’ हा चित्रपट आसामच्या खेड्यातली पौगंड वयातली मुलगी-तिची आई-गाव-मुलं या साऱ्यांचे भावविश्व एखाद्या माहितीपटाच्या खरेपणाने दाखवत, पण जीवननाट्याचे दर्शन घडवत जाणारा आहे. एका तरुण दिग्दर्शिकेने कथा-पटकथा इथपासून ते छायाचित्रण-संकलन स्वतःच करत तो बनवलेला आहे, ही आनंदाची बाब! या वर्षीची पूर्ण यादी पहिली तर वेगवेगळ्या भाषा आणि तंत्र विभाग यात समाधानकारक निर्णय झाले आहेत असे वाटते. या सगळ्यांत मराठी चित्रपट कुठे आहे?

इतर चार ज्येष्ठ परीक्षक मंडळी मराठी चित्रपटाकडे अपेक्षेने पाहताना दिसली- आनंद वाटला. या विभागातल्या गुजराती चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट खूपच खरे होते. प्रामाणिक आशय, साधेपणा, धंद्यापलीकडे जाऊन नवे करण्याची उमेद आणि समाजाशी नाळ ठेवण्याचा प्रयत्न हे मराठी चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण या इतर भाषिक परीक्षकांनाही जाणवले. मराठीत आता तीन-चार प्रकारचे चित्रपट बनताना दिसत आहेत. समाजातल्या दुर्बल घटकांचे प्रश्न, जातिभेद, अपंगत्व, गरीब मुले- मुली, शिक्षणाची आस अशा विषयांभोवती खूप चित्रपट फिरत आहेत. त्यातले काही मनाने चांगले, पण चित्रपट परिभाषेत अति-कच्चे असेही आहेत. काही कदाचित इराणी चित्रपटांच्या प्रभावामुळे याच पठडीतले, पण परिणामकारक आहेत. शहरी जीवनाबद्दलचे काही चित्रपट कदाचित व्यावसायिक म्हणून बनवले जाऊन राष्ट्रीय पुरस्कारांसाठी पाठवलेच जात नसावेत. त्यामुळे जे शहरी चित्रपट होते ते चांगले असूनही चांगल्या शहरी चित्रपटांची वानवा जाणवली. या सगळ्यांतून- शाळेच्या परेडसाठी निवड व्हावी, याकरिता धडपडणारा धनगर मुलगा-‘ म्होरक्‍या’ (उत्कृष्ट बालचित्रपट आणि बालकलाकाराला विशेष पुरस्कार), एका शहरी सोसायटीतल्या मुलांच्या नाटुकल्यातून निर्माण झालेली धार्मिक तेढ दाखवणारा ‘धप्पा’ (सर्वधर्मसमभाव चित्रपट), मतिमंद मुलाचा- त्याच्या लैंगिकतेचा प्रश्न मांडणारा, त्याच्या आई-बापाची कुचंबणा सांगणारा ‘कच्चा लिंबू’ (उत्कृष्ट मराठी चित्रपट) यांची दाखल घेतली गेली; पण त्याचबरोबर ‘इडक’ ‘रेडू’, ‘क्षितिज’, ‘पळशीची पी.टी.’, ‘व्हिडिओ पार्लर’, ‘बबन’, ‘मुरांबा’ यांनी घडवलेल्या दर्शनाची दखल शेवटच्या निर्णयात होऊ शकलेली नाही. लघुपटांमध्ये ‘पावसाचा निबंध’ (उत्कृष्ट दिग्दर्शन व ध्वनी), ‘मयत’ (उत्कृष्ट लघू-चित्र), ‘चंदेरीनामा’ (अभिप्रेरक लघुपट) हेही विसरून चालणार नाहीत.

मराठी चित्रपटसृष्टीत सकस निर्मिती होते आहे. काही प्रमाणात निर्माते धंद्यापलीकडे विचार करत आहेत. ग्रामीण चित्रपटांपैकी काहींनी चित्रीकरण स्थळांचे नावीन्य, साध्या माणसांची कलाकार म्हणून निवड, प्रादेशिक बोलींचा ठसठशीत वापर या गोष्टी अंगीकारल्या आहेत. अभिनयातला नाटकीपणा, व्यक्तिरेखाटनातली साचेबद्धता काढून टाकता आली, तर हे चित्रपट प्रगल्भ होतील. दूरचित्रवाणीच्या सुलभ शैलीचा प्रभाव नाकारला, तर शहरी चित्रपट अधिक दमदार होतील. तांत्रिक प्रयोग सोपे झाल्याच्या आनंदात काही वेळा कथा-पटकथा कच्च्या राहताहेत. प्रामाणिकपणा असेल तर त्यात कष्ट घ्यायला कलावंत उद्युक्त होतील.काही प्रमाणात सामाजिक जाणीव असणे म्हणजेच उत्तम चित्रपट बनवता येणे असा गोंधळ उडतो आहे, तर काही वेळा आम्ही वेगळी जातीय, प्रांतीय जाणीव घेऊन येतो आहोत; म्हणून कलेचे मापदंडच बदला असा रेटा दिसतो आहे. परिणामकारक चित्रपट हा प्रेक्षक, समीक्षक साऱ्यांनाच विचार करायला लावतो, आपल्या जाणिवा विकसित करायला, बदलायला लावतो. त्याला ना धंद्याच्या गणितांचा दाखला लागतो ना राजकीय पाठबळ! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे पुढे काय- हाही एक मोठा प्रश्न आहे! वाहिन्या आणि वितरण यंत्रणा आणि काही प्रमाणात सुस्त प्रेक्षकही या नव्या बदलांपेक्षा जुन्याच गणितांमध्ये रममाण होत आहेत.अनेक वृत्तपत्रे हिंदी चित्रपट किंवा मराठीतल्या नव्या ‘सेलिब्रिटी’ नामक जमातीबद्दल छापण्यात मश्‍गुल आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर ग्रामीण चित्रपटांना फुटणारी ही नवी पालवी भडक मसाल्यात करपून जाईल आणि दर्जेदार शहरी चित्रपट बुद्धी गहाण टाकण्याच्या बोलीवर निर्मात्यांची किंवा वाहिन्यांची पायरी चढू लागेल. मराठी चित्रपटसृष्टीची आज तयार झालेली प्रगतिशील प्रतिमा पुन्हा मलिन व्हायला वेळ लागणार नाही.

Web Title: sunil sukathankar write editorial