‘कोरोना’विरूद्ध हवी जागतिक एकजूट

‘कोरोना’विरूद्ध हवी जागतिक एकजूट

कोरोना विषाणूमुळे जगापुढे अभूतपूर्व संकट उभे ठाकलेय. या विषाणूचा आणि भविष्यातील आर्थिक व पर्यावरणीय आव्हानांचा सामना जागतिक नेतृत्वाने एकत्रितपणे करण्याची गरज आहे. जागतिक एकजुटीची वज्रमूठच आपल्याला यातून सावरेल. 

जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड -१९ विषाणूचे संकट हे आपल्या आयुष्यातील सर्वांत रौद्र, सर्वाधिक प्रलंयकारी आणि सर्वाधिक परिणाम करणारे आहे, असे म्हणण्याचे धाडस आज करावेसे वाटते. चीनमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पहिला रुग्ण सापडल्यापासून एप्रिलच्या मध्यापर्यंत जगातील तब्बल एक तृतीयांश लोकसंख्या आपल्या घरातच बंदिस्त होईपर्यंत ‘कोरोना’ने खूपच वेगाने प्रवास केला. आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही आपत्तीने जगाला इतक्‍या वेगाने अशा प्रकारे विळखा घातला असेल, असे वाटत नाही. अशा प्रकारची आपत्ती जगाने यापूर्वी पाहिलेली नाही. त्यामुळे, ती अभूतपूर्व आहे. साहजिकच अशा वेळी सरकारला नेमके काय करावे, अर्थव्यवस्था कशी बंद करावी आणि पुन्हा सुरू करावी, याचे मार्गदर्शन करणारी कोणतीही नियमावली नाही. ‘कोरोना’चा हा विषाणू उत्परिवर्तित होऊन प्राण्यामधून मनुष्यात आला आहे. तो स्वत:ला लपविण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असल्याने विनाशकारी ठरतोय. संसर्गाची कोणतीही लक्षणे न जाणवताही आपण या विषाणूचा वाहक असू शकतो. त्यामुळे तो प्राणघातक, विध्वंसक आहे. 

मात्र, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सामूहिक असुरक्षिततेबद्दल विचार करायला हवा. सर्वशक्तिमान जागतिक नेते, सर्वाधिक अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या वैज्ञानिक संस्था आणि सर्वात शक्तिशाली आर्थिक महासत्ता या विषाणूला तोंड देत आहेत. त्याने आपल्याला नम्र बनविले, तसेच आपण कोणत्या गोष्टी वेगळेपणाने करण्याची गरज आहे, याचाही विचार करण्यास शिकविले. आपण त्यानुसार कृती करून आपले वर्तन बदलण्याची गरज आहे. मात्र, आपण नेमकी या ठिकाणीच चूक करतोय काय, अशी शंका येते. कोणत्याही आपत्तीमध्ये तत्काळ मदत व बचावावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते, ही वस्तुस्थिती आहे. पण भविष्याच्या दृष्टीने तिच्यापासून काय शिकायला हवे, याकडे मात्र दुर्लक्ष होते. ‘कोविड -१९’ च्या आपत्तीचे व्यवस्थापन अतिशय तत्काळ करण्याची गरज होती, यात काहीच शंका नाही. 

 ‘कोरोना’ प्रादुर्भावाचा जगासाठी धडा
आज अद्ययावत रुग्णालये, दर्जेदार आरोग्यसुविधा असणाऱ्या श्रीमंत देशांतही अनेकांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागत आहेत, तर यापैकी काहीच नसलेल्या विकसनशील देशांमध्ये काय हाहाकार उडेल, याची कल्पनाही करवत नाही. त्याचप्रमाणे, मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्याने कशी परिस्थिती उद्‌भवेल, याचीही कल्पना अंगावर काटा आणणारी. गोरगरिबांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जीवनमान रोजच्या कमाईवर अवलंबून असते. या सर्व पार्श्वभूमीवर ‘कोरोना’नंतरचे ‘न्यू नॉर्मल’ मानवी जीवन कसे असेल, या जागतिकीकरणाच्या जगातील सर्वांत गंभीर मुद्द्यांची चर्चा करू. पुढील आणीबाणीला तोंड देण्यासाठी जगभरातील नेते व संस्थांनी ‘कोविड -१९’ पासून काय शिकायला हवे. खरे तर एकत्रितरीत्या या संकटाचा सामना केला पाहिजे, हे आपल्याला समजते, पण आपण तसे करत नाही, हे कटूसत्य आहे. चीनने ताबडतोब माहिती न दिल्याने हा विषाणू इतर देशांमध्ये पसरला. जागतिक आरोग्य संघटनेनेही पटकन पावले उचलली नाहीत किंवा संघटनेच्या इशाऱ्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसेल. 

जानेवारीअखेरपर्यंत संघटनेने चीनमधील कंटेन्मेट झोनवरच लक्ष केंद्रित केले होते. जागतिक पर्यटनावर बंदी घालेपर्यंत दिरंगाई केल्याने ‘कोरोना’चे संकट गडद झाले. त्यानंतर, इतक्‍या कठीण काळात जगाला ठोस मार्गदर्शनाची गरज असताना या आरोग्य आणीबाणीविरुद्ध असहाय्यपणे लढणाऱ्या या संघटनेने आपली विश्वासार्हता गमावली, यात नवल ते काय? संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीनेही कित्येक आठवडे बैठकच घेतली नाही. 

केवळ चीन आणि जागतिक आरोग्य संघटनाच नव्हे, तर प्रत्येक देश स्वत:पुरतेच पाहतो आहे. आरोग्यसेवकांसाठीचे मास्क व विशेष किटची तस्करी करण्यापासून पहिल्यांदा लस बनविण्यापर्यंत ही स्पर्धा टोकाला पोचलीय. एकमेकांवर अवलंबून असलेल्या जगाचे कोरोना विषाणू हे अपत्य असल्याचे माहीत असतानाही अशी स्पर्धा घाबरवणारी ठरते. आहाराच्या वाईट सवयी असणाऱ्या चीनमधून हा विषाणू निर्माण झाला. मात्र, आपण एकमेकांशी जोडलेल्या जगात राहत असल्याने हा संसर्ग पसरला. आपले शक्तिस्थान हीच आपली कमतरता आहे. हा विषाणू जगातील इतर ठिकाणी असाच पसरत राहिल्यास तो आपल्याबरोबर कायम राहील. त्याचा एकत्रितपणे मुकाबला केल्याशिवाय आपण जिंकणार नाही. आजच्या जागतिक नेतृत्वाची अवस्था म्हणूनच काळजीत टाकते. ‘कोविड - १९’ने बहुपक्षवाद संपवला, संयुक्त राष्ट्रांचाही मृत्यू ओढवलाय, असे अनेक जण म्हणत आहेत. मात्र, तसे होणार नाही. ‘कोरोना’, तसेच भविष्यातील हवामान बदलाच्या आणीबाणीशी सामना करण्यासाठीही जागतिक नेतृत्वाची गरज आहे. जगातील एकच देश उत्सर्जन करत राहिल्यास बाकीच्यांच्या प्रयत्नांवर पाणी पडू शकते. मात्र, एकत्रित काम करण्याची इच्छा असल्यास सर्व देशांनी परस्परसहकार्याचा करार केला पाहिजे. प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचा अधिकार आहे. जागतिक अवंलबित्व असलेल्या आपल्या जगाला जागतिक नेतृत्वाची गरज आहे. ‘कोविड- १९’नंतरच्या ‘न्यू नॉर्मल’ जगासाठी आपण हे लक्षात ठेवायलाच हवे. हा ‘उद्याचा’ प्रश्न आपल्याला सोडवावाच लागेल. 

(लेखिका नवी दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरन्मेंट’च्या महासंचालक आहेत.)
(अनुवाद : मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com