फोन लगा तू अपने दिल को जरा...

सुनीता तारापुरे
बुधवार, 6 मार्च 2019

परवा चालता चालता एक मैत्रीण म्हणाली, ‘लहाणपणी रस्त्यावरचा दगड ठोकरत घरापर्यंत घेऊन जायचो ना, तसं पुन्हा करावंसं वाटतंय...’ मी म्हटलं, ‘कर ना मग!’ तर म्हणाली, ‘छे गं, आत्ता या वयात? लोक काय म्हणतील?’ मी म्हटलं, ‘काही का म्हणेनात, तुला करावंसं वाटतं ना, झालं तर मग! तुझ्या या कृतीनं तुला किंवा इतरांना इजा पोचणार नाही, एवढं बघ,’ इकडं तिकडं बघत काहीशा संकोचानं तिनं समोरचा छोटासा दगड ठोकरला... आणखी एकदा... आणखी... लहान मुलांसारखी आनंदानं फुलून आली.

रस्त्यावर उभं राहून बर्फ गोळा खाण्याची इच्छा पूर्ण झाल्यावर अशीच आनंदानं निथळणारी सखी आठवली. एकीला पतंग उडवायचा होता, दुसरीला बुलेट चालवायची होती... किती साध्या इच्छा, पण ‘शोभतं का हे?’ या हेटाळणीला घाबरून दडपून टाकलेल्या, वाचलं होतं की, भारतातल्या ८५ टक्के स्त्रिया या सतत तणावाखाली असतात, हे जे आदर्शतेचं भूत मानगुटावर बसलंय, त्यानं निर्माण केलेला ताण हेही एक कारण असणार याचं. स्त्रियांचं प्रमाण जास्त असेल, पण पुरुषांनाही याच भुतानं झपाटलंय.आजकालचे मॅनेजमेंट गुरू सांगतात, ‘इतरांना ॲपॉईंटमेंटस्‌ देताना, स्वतःला विसरू नका. स्वतःलाही द्या थोडा वेळ आणि जाणून घ्या काय आहे मनाच्या तळाशी खोलवर दडलेलं.’ गंमत म्हणजे त्याचीच तर भीती वाटते आपल्याला. कारण मनाचा तळ थोडा जरी डहुळला तर वर येतील दडपून टाकलेल्या अनेक इच्छांची भुतं आणि पकडतील आपली मानगूट घट्ट. ज्यांना आपण दिली होती आश्‍वासनं... अमूक झालं की हे नक्की करणार मी... तमूक वर्षाचा झालो, की आहेत तू अन्‌ मी... पण ते टप्पे केव्हाच मागे पडतात आणि इच्छा दपडलेल्याच राहतात. उलट वर साचत राहतात आणखी दडपल्या इच्छांची भुतं. यातल्या बहुतांश तर अगदी साध्या. आपल्या रोजच्या दिनक्रमाला थोडीशी मुरड घातली की सहज साध्य करता येण्याजोग्या. पण, माझ्या घराला, मुला-बाळांना, व्यापार-व्यवसायाला, ऑफिसला... माझी गरज आहे. माझ्याशिवाय कसं होणार त्यांचं, या भ्रमात माझ्यातल्या ‘मी’लाही माझी ओढ आहे हे विसरतोय का आपण? घरच्या-दारच्या सगळ्यांना खूष करण्याच्या नादात कोमेजत चाललेल्या मनाकडं साफ दुर्लक्ष होतंय का आपलं? मग, तद्दन फिल्मी भाषेत सांगायचं तर, ‘फोन लगा तू अपने दिल को जरा...’ तेवढ्यानंही ती खुळी स्वप्नं मोहोरतील, टवटवीत होतील, लडिवाळ मिठी घालतील... त्यातून फुटेल नवी पालवी या वठत चाललेल्या देहाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunita tarapure write pahatpawal in editorial