रंगोत्सव निसर्गाचा

sunita tarapure
sunita tarapure

आज होळी. वसंतोत्सवाचा प्रारंभ. मुळातच आपण उत्सवप्रिय. त्यात होळीपासून रंगपंचमीपर्यंत साजरा होणाऱ्या या रंगोत्सवाइतका नटवा, नखरेल उत्सव दुसरा नाही. वर्षभर इच्छांना मुरड घालत, जनरीतीप्रमाणे वागताना उसळणं, उफाळणं, नाचणं, गाणं, रंगवणं विसरावंच लागतं. त्यामुळं हे सारं मुक्तपणे करण्याची मुभा असलेल्या रंगोत्सवाची ओढ वाटणं स्वाभाविक.

सहज वाटलं, आपण योजिलेल्या या रंगोत्सवाची वाट बघताना आपल्या अवतीभवती नित्यनेमानं होणाऱ्या रंगपंचमीकडं आपली डोळेझाक होतेय का? मुळात जीवसृष्टीची निर्मिती हाच शाश्‍वत वसंतोत्सव नव्हे काय? पाहा ना, प्रत्येक ऋतूचा रंग वेगळा. हरेक दिवसाची शोभा निराळी, उगवतीपासून ते मावळतीपर्यंत... निव्वळ आकाराची निळाईही केवढी वेगवेगळी. कोवळ्या पालवीपासून जीर्ण पानगळीपर्यंत... हिरवेपणाच्या नाना तऱ्हा. शिवाय चैत्रातल्या नवपालवीचा पोत श्रावणातल्या हिरवाईपेक्षा किती निराळा. जास्वंद लाल, गुलाब लालभडक. गुलमोहोरही लालबुंद आणि पांगाऱ्याची तर तेजोमयी लाल ज्वाला... प्रत्येकाची लाली आगळी. पांढऱ्या रंगात कसलं आलंय वैविध्य. असं वाटत असेल तर निशीगंध, मोगरा, चाफा, शेवंती, जाई-जुई यांचं धवल सौंदर्य निरखून पाहावं. सोनचाफा, बहावा, तीळ, मोहरी, बिट्टी... फुलं पिवळीच; पण छटा निरनिराळ्या. झाडं, पानं, फुलं, प्राणी, पक्षी, कीटक, नदी, नाले, डोंगर, दऱ्या... यांच्या रंग-रूपांतून तो जगन्नियंता केवढी वैविध्यपूर्ण चित्रं रेखाटतो. निसर्गातल्या या प्रत्येक घटकाचं गायन, वादन, नर्तन अखंड चालू आहे. दशदिशांतून चालू असलेला हा वसंतोत्सव आपण अनुभवणार की नाही? निसर्गातले हे रंग जमिनीतून उगवतात, की आकाशातून पाझरतात कोण जाणे? पण आत्यंतिक व्यवहारी जगात रंग-रस-गंधहीन होत चाललेल्या आपल्या आयुष्यातली सौंदर्याची ओढ टिकून राहते, ती निसर्गाच्या या रंगपंचमीमुळेच. भोवतालच्या कोलाहलात आपला चेहरा आणि स्वभाव हरवून बसलेले आपण स्वतःच स्वतःला परके होत आहोत, अशा वेळी सृष्टीकर्त्याच्या कुंचल्यातून साकारलेल्या या मनोहारी रंग उधळणीमुळंच आपलं जगणं पूर्णतः बेरंग झालेलं नाही. अशा वेळी कृत्रिम रंग हाती घेण्याची गरज आहे? रासायनिक रंग ठीक की नैसर्गिक बरे या वादात गुरफटणं योग्य ठरेल? मुळात नैसर्गिक रंगांच्या नावाखाली झाडांची पानं, फुलं, फळं ओरबाडून, कुस्करून, चिरडून रंगनिर्मिती कशासाठी करायची? त्यापेक्षा ते आहेत तिथंच अधिक शोभिवंत दिसणार नाहीत का?

असं म्हणतात, की शैशवात मातीचा, यौवनात प्रीतीचा, प्रोढत्वात साफल्याचा आणि शेवटी मुक्तीचा रंग सापडावा, आसमंतातली नित्याची रंगपंचमी मनःपूत अनुभवताना कदाचित आपण त्यात अलगद मिसळून जाऊ, द्वैत नुरेल आणि कुणी सांगावं मुक्तीचा रंग गवसेलही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com