सुपरहिरोंचा सुपरबाप! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

स्टॅन ली यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या अर्ध्या डझन सुपरहिरोंनी किमान चार-पाच पिढ्यांचे बालपण सुखद नि समृद्ध तर केलेच, पण त्याचबरोबर त्यांच्या कथांनी, त्यांतील सुपरहिरोंनी त्यांच्यावर संस्कारही केले. 

बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे बालपण ज्यांच्या मानसपुत्रांच्या सान्निध्यात गेले, ते "सुपरहिरोंचे बाप' स्टॅन ली आता या जगात नाहीत. "बचपन का खेल है, बच्चों का नही' असे एक पृच्छवाक्‍य "प्रो कबड्डी'च्या जाहिरातीत टीव्हीवर दिसते. हे वाक्‍य स्टॅन ली यांच्या कारकिर्दीचे सार म्हणावे लागेल. या भल्या माणसाने मुलांचे जग एका अफाट कल्पनाविश्‍वात एकहाती अलगद लोटून दिले. त्यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या अर्धा डझन सुपरहिरोंनी किमान चार-पाच पिढ्यांचे बालपण सुखद नि समृद्ध केले आहे. - नव्हे, अजुनी करताहेत! "स्पायडरमॅन', "आयर्नमॅन', "हल्क', "अँटमॅन', "डेअरडेव्हिल', "अव्हेंजर्स', "एक्‍समेन', "फॅंटास्टिक फोर' अशा कितीतरी महाशक्‍तिमान महानायकांनी स्टॅन ली यांच्या सुपीक मेंदूत जन्म घेतला आणि नंतर साऱ्या जगावर अधिराज्य गाजवले. आजमितीस जगात अशी फार थोडी बालके असतील, ज्यांना "स्पायडरमॅन' वगैरे ठाऊकच नसेल. अगदी कांगोच्या खोऱ्यात अर्धेमुर्धे कपडे घालणाऱ्या जमातींमधल्या काही जणांच्या कुडीवर या सुपरहिरोंपैकी कुणाची तरी छबी असलेला -फाटका का होईना- टीशर्ट दिसतोच.

वास्तविक ही सारी कॉमिक बुकातली पात्रे. रंगरेषांनी बनलेली. तसल्याच रंगरेषांनी बनलेल्या भयंकर खलनायकांना नामोहरम करून अखिल पृथ्वीवासीयांचे जीवित थरारक लढाई करत वाचवणारी... मनगटातून सप्पकन जळमटांचे भक्‍कम धागे सोडत, या इमारतीवरून त्या इमारतीवर लीलया उड्या मारणारा "स्पायडरमॅन' बच्चेलोकांचा जिवलग होताच, पण वाढीव वयाच्या आईबापांनाही तो "फ्रेंडली नेबरहुड' वाटायचा. वाटायचा, असे तरी का म्हणावे? संगणकीय चमत्कृतींनिशी साकारलेला धातूचा सूट घालून आभाळात भराऱ्या मारणारा "आयर्नमॅन' असो की "वाढता वाढता वाढे, भेदिले सूर्यमंडळा' या वर्णनाबरहुकूम तटतटा फुगत जाणारा अतिशक्‍ती "हल्क' असो, आंधळा असूनही ध्वनिकंपनांची दृष्टी वापरून समाजकंटकांना सरळ करणारा "डेअरडेव्हिल' असो, की सरसरा सुऱ्यांची पाती बोटांच्या बेचक्‍यातून बाहेर काढणारे, क्षणार्धात आगीचा लोळ उत्पन्न करणारे "एक्‍समेन' असोत... किती नावे घ्यायची? ही मंडळी तर चिरंजीव आहेत. स्टॅनली मॉर्टन लीबर यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी झाला, तेव्हा पहिल्या महायुद्धानंतरच्या महामंदीच्या खाईत जग ढकलले गेले होते.

मॅनहटनमधल्या शिंपीकाम करणाऱ्या पित्याचा बहुतांश वेळ कामधंदा शोधण्यात जायचा, तेव्हा स्टॅनली आपल्या कल्पनाविश्‍वात रमलेले असत. पुढे ऑफिसबॉयची किरकोळ कामे करणाऱ्या स्टॅनली यांना कॉमिक बुकांच्या प्रकाशकाकडे नोकरी मिळाली. "फॅंटास्टिक फोर'च्या कॉमिक बुकाच्या यशानंतर त्यांनी भराभरा आपले इतर मानसपुत्र बाळगोपाळांच्या दुनियेत आणले. "स्पायडरमॅन'ने तर धमालच केली. पुढे याच व्यक्‍तिरेखा आणि कॉमिक बुकातल्या त्यांच्या गाजलेल्या कहाण्यांचा वापर करून चित्रपट येऊ लागले. चित्रांच्या स्थिर चौकटी सोडून स्टॅन यांच्या व्यक्‍तिरेखा हिंडू-फिरू, हलू-बोलू लागल्या, तेव्हा मोठ्यांच्या जगालाही सुपरहिरोची उणीव भासतेच, हेही ध्यानी येऊ लागले. स्टॅन ली ज्याचे अखेरपर्यंत चेअरमन होते, त्या मार्व्हल कंपनीने उभे केलेले हे सुपरहिरोंचे विश्‍व आताशा मनोरंजनाच्या अवकाशात अब्जावधी डॉलरचा धंदा करत आहे. स्टॅन ली यांनी जन्माला घातलेला जवळपास प्रत्येक सुपरहिरो आज ब्रॅंड बनून गेला आहे.

टीशर्टपासून कॉफी-दुधाच्या कपापर्यंत अनेक वस्तूंवर त्यांच्या छब्या दिसून येतात. लोकप्रियतेचे उच्चांक मोडणाऱ्या या सुपरहिरोंच्या चित्रपट, टीव्ही मालिकांनी स्टॅन लींना अफाट पैसा मिळवून दिला, असेही नाही. "मला यातून अफाट पैसा नाहीच मिळाला. पण मला जे करायला आवडतं, तेच आयुष्यभर करायला मिळालं, हा आनंद त्यापेक्षा खूपच मोठा आहे,' असे त्यांनी "प्लेबॉय'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. 
छोट्यांच्या जगातले हे सुपरहिरो भ्रामक कल्पना म्हणून सोडून देणे, अन्यायाचे ठरेल. "दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तेवढ्या कल्पना सुचतात,' हा सुविचार अंगी बाणवणाऱ्या आपल्या समाजात स्टॅन ली यांच्या कल्पनाशक्‍तीचे कदाचित तितके कवतिक वाटणार नाही, पण हे सुपरहिरो बाळगोपाळांसाठी एक संस्कारच होता, हे विसरता कामा नये. स्टॅन ली यांच्या कहाण्यांमध्ये सुष्ट-दुष्टांची कहाणी बेमालूम गुंफलेली असायची आणि त्यातून चांगले आणि वाईटाचा संस्कारही आपापत: व्हायचा. कालांतराने "स्पायडरमॅन', "आयर्नमॅन' ही मंडळी लहान मुलांची मालमत्ता राहिली नाहीत.

विशी-तिशी ओलांडलेल्या परिपक्‍व लोकांनाही हे सुपरहिरो आपलेसे वाटतात, हेच त्या व्यक्‍तिरेखांच्या यशाचे गमक आहे. "मार्व्हल'च्या प्रत्येक चित्रपटात मिनिटभरासाठी का होईना, खुद्द स्टॅन ली प्रेक्षकांना दर्शन देऊन जातात! त्यांचा हा "कॅमिओ' थिएटरात तितक्‍याच जोरदार टाळ्या काढतो. "मार्व्हल'च्या सुपरहिरोचे आणखीही चित्रपट भविष्यात येतील. बक्कळ गल्ला गोळा करून जातील. पण त्यात वृद्ध स्टॅन ली यांचे दर्शन कदाचित नसेल... पण तरीही एवढे मात्र खरे, की सुपरहिरो अमर असले, तरी त्यांचा जन्मदाता अजरामर आहे! 

Web Title: Superheros SuperFather Pune Edition Editorial Article