...तर कर्करोगाच्या पेशीही नष्ट

Cancer-cells
Cancer-cells

कर्करोगाच्या पेशी अवकाशात पाठवून त्यावर प्रयोगाची तयारी ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञ करत आहेत. गुरुत्वाकर्षण नसेल किंवा अत्यल्प असेल, अशा स्थितीत कर्करोगाच्या बहुतांश पेशी मरतात, असे पृथ्वीवरील प्रयोगशाळेतील संशोधनात आढळून आले आहे.

जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीत जेव्हा कर्करोगाच्या पेशींना एक दिवस ठेवण्यात आले, तेव्हा २४ तासांच्या आत ८० टक्के पेशी मरून गेल्या. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी सिडनी (यूटीएस) मधील शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला. यापूर्वी जर्मनीतील संशोधकांनी अशाच प्रकारचा प्रयोग केला होता. तेव्हा त्याचेही निष्कर्ष याप्रमाणेच मिळाले होते.

‘‘माझ्या जवळच्या अनेकांना कर्करोगाने विळखा घातल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच या विषयावर संशोधनाची प्रेरणा मिळाली. गुरुत्वाकर्षण नसताना कर्करोगाच्या पेशी कशा राहतात, त्यांच्यात काय बदल होतात हे पाहण्याचे मी ठरविले,’’ अशी माहिती यूटीएसमधील संशोधक जोशुआ चोऊ यांनी दिली. अंतरळात हाडांची झीज होऊ नये, यासाठीचे प्रयोग चोऊ यांनी यापूर्वी केले आहेत.

‘‘कर्करोगावर एकाच प्रकारचे औषध तयार करणे शक्‍य नाहीये. कारण, प्रत्येकाच्या शरीरातील कर्करोग वेगळ्या प्रकारचा असतो. प्रत्येकाच्या शरीराची औषधांना असलेली प्रतिक्रियाही वेगवेगळी असते; परंतु सर्व प्रकारच्या कर्करोगांमधील सामायिक गोष्ट शोधण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींना मी मायक्रोग्रॅव्हिटी डिव्हाइसमध्ये ठेवले व त्यांचे निरीक्षण केले,‘‘ अशी माहिती चोऊ यांनी दिली.  कर्करोग हा अत्यंत गंभीर आजार आहे. कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकण्याचा प्रमाण नगण्य आहे. कर्करोगाच्या काही प्रकारांवर तर अद्यापही इलाज सापडलेला नाही. कर्करोग कोणाला होऊ शकतो किंवा कशामुळे होते, हे ठामपणे सांगता येत नाही; परंतु काही गोष्टींमुळे तो होण्याचा धोका अधिक आहे, हे मात्र निश्‍चित. जंक फूड, बदलती जीवनशैली, प्रदूषण, तंबाखू वा सिगारेटचे सेवन अशी काही कारणे सांगता येऊ शकतात. कर्करोगाची काही लक्षणे वेळीच कळली तर त्यावर उपचार करता येणे शक्‍य होते; अन्यथा शरीरातील पेशी निकामी होण्यास सुरवात होते. निकाम्या पेशींची गाठ तयार होते. अंतिमतः माणसाचा मृत्यू होऊ शकतो. शरीराच्या काही भागांत गाठी तयार होणे, सतत घसा दुखणे, तोंडातील बरी न होणारी जखम, अन्न गिळताना त्रास होणे, आवाजात अचानक बदल होणे, लघवी अथवा मलातून रक्तस्राव होणे, वारंवार चक्कर येणे, भूक न लागणे, वजन अचानक घटणे अशी काही कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत. डॉक्‍टरांकडून याचे निदान करून घेणे गरजेचे आहे. यातील एखादे लक्षण आहे, म्हणजे लगेचच आपल्याला कर्करोग झाला, असे समजण्याचेही कारण नाही. डॉक्‍टरांकडून तपासण्या करून घेतल्यानंतरच कर्करोगाचे निदान होऊ शकते. चोऊ यांनी प्रयोगासाठी शरीराच्या वेगवेगळ्या भागातील (स्तन, अंडाशय, फुप्फुस आणि नाक) वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी निवडल्या. या पेशी मायक्रोग्रॅव्हिटी डिव्हाइसमध्ये २४ तासांसाठी ठेवण्यात आल्या. तेव्हा ८० ते ९० टक्के पेशी मृत झाल्याचे आढळून आले. आता कर्करोगाच्या पेशी अंतराळात पाठविण्याचा चोऊ यांचा विचार आहे. गुरुत्वाकर्षण नसताना खरोखरच पेशींवर काही परिणाम होतो का, अंतराळात असताना सौर विकिरणाचा पेशींवर आणखी काही परिणाम होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे चोऊ यांना वाटते. जर्मनीमध्ये २०१७ मध्ये माग्देबुर्ग विद्यापीठातील संशोधक डॅनिएला ग्रिम यांनीही अशाच प्रकारचे प्रयोग केले होते, तेव्हा त्यांचे निष्कर्षही अशाच प्रकारचे होते. त्यांनी थायरॉइडच्या कर्करोगाच्या पेशींवर अंतराळात काय परिणाम होतात, हे तपासले होते. त्यांनी एका पत्र्याच्या डब्यात कर्करोगाच्या पेशी ठेवून, त्या चिनी अंतराळयान स्पेसएक्‍स ड्रॅगनद्वारे अंतराळात पाठविल्या होत्या.

आपल्या शरीरामध्ये नव्या पेशी तयार होणे, विभाजन आणि त्यांचा मृत्यू, या क्रिया सतत सुरू असतात. जुन्या वा ‘जखमी’ पेशी मरतात, त्यांची जागा नव्या पेशी घेत असतात. वयोमानानुसार नव्या पेशी तयार होण्याचा दर बदलत असतो. कर्करोगाच्या बाबतीत मात्र पेशीविभाजनातून कर्करोगाच्या पेशींची संख्या वाढत राहते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्‍य होते. मधुमेह असलेल्या लोकांना कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. टाइप-१ आणि टाइप-२ या प्रकारातील मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना स्तन, मूत्रपिंड आणि गर्भाशयाच्या प्रकारचा कर्करोग होऊ शकतो, असे अमेरिकेच्या संशोधकांना आढळले आहे. जॉन टेरिमिनी यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.  इन्शुलिन ग्लुकोज पेशींपर्यंत नीट पोचत नसल्याने मधुमेहींना कर्करोग होण्याची शक्‍यता अधिक असल्याचे टेरिमिनी यांचे म्हणणे आहे. अंतराळात करण्यात येणाऱ्या नव्या संशोधनाचा उपयोग कर्करोगावरील नवी औषधे तयार करण्यासाठी होऊ शकेल, असे संशोधकांना वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com