‘एसीं’चा सोस, बिघडवेल तोल

ac
ac

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची घोडदौड विलक्षण वेगाने सुरू आहे. त्यातील प्रगतीचे ठळक टप्पे नोंदवितानाच नव्या तंत्रज्ञानाचे स्वरूप, त्याचे जीवनमानावर होणारे परिणाम, अशाही गोष्टींची दखल घेणारे नवे साप्ताहिक सदर.

भा रतात अनेक भागांत टोकाचे वातावरण अनुभवायला मिळते. जेवढी कडाक्‍याची थंडी, तेवढाच तीव्र उन्हाळाही. काही भागांत विशेषतः ईशान्येकडील राज्यांत चार-चार दिवस विश्रांती न घेणारा मुसळधार पाऊस. थंडी अन्‌ पावसाळा परवडला; पण उन्हाची काहिली नको, अशी धारणा होते. उन्हाचा चटका कमी करण्यासाठी आता एसीसारख्या आधुनिक उपकरणांचा वापर सुरू झाला आहे. हा वापर पर्यावरणाचा समतोल बिघडविणारा ठरू शकतो.

एक काळ असा होता की, उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी ओल्या चादरीवर झोपले जायचे... दिवसांतून दोनदा अंघोळ केली जायची... आता काळ बदललाय. उन्हाच्या झळांची तीव्रता कमी व्हावी म्हणून छोट्याछोट्या घरांमध्येही आता एअर कंडिशनर (एसी) लावले जाऊ लागले आहेत. सध्या तीन कोटी एसी भारतभरात वापरले जातात. २०५० पर्यंत एसीची संख्या एक अब्जाला स्पर्श करेल. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत सर्वांधिक एसी वापरणारा देश ठरू शकेल. एसी वापरणे ही काही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी आहे का? आम्हालाही चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत... या भावनेतून अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांकडे पाहिले जात आहे. तसेच इलेक्‍ट्रॉनिक उत्पादने करणारे देश भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहतात. त्यामुळे कमी किमतीतील उपकरणेही बाजारात उपलब्ध करून दिली जात आहेत.

हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या मोठ्या देशांपैकी भारत एक देश आहे. भारतात दरवर्षी किमान ८० कोटी टन कोळसा जाळला जातो. अशावेळी एसीची निर्माण झालेली क्रेझ स्थिती आणखी बिघडवू शकते, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ देत आहेत. एसीचा वापर वाढला की त्यासाठी आवश्‍यक विजेचा पुरवठा करण्यासाठी सध्यापेक्षा तिप्पट निर्मिती करावी लागेल. राजस्थान, गुजरात या अत्यंत तीव्र उन्हाळा असलेल्या भागातील हातावर पोट असलेल्या कामगारांच्या घरातही आता एसी दिसू लागले आहेत. भारतात सध्या पाच टक्के घरांमध्ये एसीचा वापर केला जातो. अमेरिकेत हाच दर ९० टक्के, तर चीनमध्ये ६० टक्के आहे. जपानमधील आघाडीची कंपनी डायकिनने राजस्थानात एसी निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. वर्षाला १२ लाख एसींचे उत्पादन त्या प्रकल्पातून केले जात आहे. ‘‘एसी ही काही चैनीची गोष्ट राहिलेली नाही, गरज आहे. एसीमुळे लोकांची कार्यक्षमता वाढते,’’ असे मत डायकिनचे भारतातील प्रमुख कवलजित जावा यांचे मत आहे.

सर्वसामान्यपणे उन्हाळ्याची तलखी कमी करण्यासाठी फ्रिज आणि एसीचा वापर केला जातो. जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी हेही दोन घटक आहेत. फ्रिज, एसी यामधून हरितगृहवायूंचे उत्सर्जन केले जाते. एसीमधून बाहेर पडणारे वायू तापमानवाढीला कारणीभूत आहेत. भारतातील दोन-तृतीयांश विद्युतऊर्जा कोळसा आणि गॅसच्या साह्याने निर्माण केली जाते. या पार्श्वभूमीवर कमी वीज लागणारे व हरितगृहवायूंचे कमी उत्सर्जन करणारे एसीही बाजारात आले आहेत; परंतु त्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात नाहीत. एसीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एसी कंपन्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात एसीचे डिफॉल्ट सेटिंग २४ अंश सेल्सिअस ठेवावे असे सांगितले आहे.

जागतिक तापमानवाढीचा फटका आपल्याकडील आसाम, मिझोरम, सिक्कीम या राज्यांना सर्वाधिक बसत आहे. जंगले कमी होत आहेत, नद्यांना वारंवार पूर येण्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. थोडक्‍यात सांगायचे तर, पुढच्या पिढ्यांसाठी चांगले पर्यावरण ठेवायचे असेल, तर आपल्यालाही थोडे निसर्गाकडे वळावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com