भाष्य : भूजल वापराबाबत हवी सजगता

दृश्‍य पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने भूजलाचा उपसा वारेमाप केला जात आहे. विविध रासायनिक प्रक्रिया, शेतातील रसायनांचा वापर यामुळे स्रोत प्रदुषित होत आहेत.
Agriculture Water Pump
Agriculture Water PumpSakal
Summary

दृश्‍य पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने भूजलाचा उपसा वारेमाप केला जात आहे. विविध रासायनिक प्रक्रिया, शेतातील रसायनांचा वापर यामुळे स्रोत प्रदुषित होत आहेत.

- सुरेश पाटणकर

दृश्‍य पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने भूजलाचा उपसा वारेमाप केला जात आहे. विविध रासायनिक प्रक्रिया, शेतातील रसायनांचा वापर यामुळे स्रोत प्रदुषित होत आहेत. उपसा आणि पुनर्भरण यात मोठी तफावत आहे. त्यामुळेच पाण्याबाबत अधिक जागरूकता, सजगता, सज्जता आणि जाणीव महत्त्वाची आहे.

पाण्याचे महत्त्व जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या १९९३ मध्ये ब्राझीलमधील रिओ-द-जानिरो येथे झालेल्या पर्यावरण आणि विकास याबाबतच्या परिषदेत २२ मार्च रोजी जागतिक जलदिन पाळण्याचे ठरले.

त्यानंतर २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय जल सहभागीता स्थापन झाली. त्यांनी पुढे नेलेले कार्य म्हणजे विविध सहभागितेच्या माध्यमातून पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तयार केलेले कृती आराखडे. यात जागतिक, देश, प्रादेशिक आणि विशिष्ट नदी खोरे गृहीत धरून सहभागितेची स्थापना केली. त्यामागचे उद्दिष्ट म्हणजे पाणी आणि आरोग्य या राष्ट्रीय दशक अभियानात (२०१८-२०२८) प्रत्येक देशाने भरीव कार्य करावे. या विचारसरणीतूनच प्रत्येक देशाने प्रकल्पांच्या बांधणीद्वारे योगदान चालू ठेवले आहे, असे म्हणता येईल. उदा. भारत सरकारचे स्वच्छ जल अभियान, राज्या-राज्यांचे जल संवर्धनात्मक प्रकल्प वगैरे. २०२८मध्ये या सगळ्यांचा आढावा घेवून गरिबी निर्मूलन, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक सुबत्ता यात किती सकारात्मक बदल झाला याचा प्रकर्षाने विचार करावा लागले.

संयुक्त राष्ट्रांनी २०२२च्या जल दिनांचा विषय कळविला होता, तो म्हणजे भूजल- अदृश्‍यातून दृश्‍यता. पृथ्वीवरील पाण्याचे स्त्रोत म्हणजे पाऊस आणि बर्फ. पृथ्वीवरील शंभर भागातील साडेसत्तावन्न भाग खारे पाणी आणि उरलेल्या अडीच टक्क्यांतील दोन तृतीयांश बर्फाच्या स्वरूपात आणि एक तृतीयांश नद्या भूजल, तळी आणि दव या स्वरूपात उपलब्ध होते. यातील साधारण ५० ते ६० टक्के पाणी भूगर्भातील ॲक्वीफरच्या स्वरूपात, उरलेले जमिनीवर वाहत्या स्वरूपात असते. पाण्याच्या या लेखाजोखात मागील दोन हजार वर्षे तरी फारसा फरक पडलेला नाही. पण कळीचा मुद्दा म्हणजे उपलब्ध पाण्याचे समान वाटप निसर्गाने केलेले नाही.

जगातील काही देशांमध्ये आणि प्रांतामध्ये पाण्याची उपलब्धता असमान आहे. ही उपलब्धता प्रत्येक माणसी प्रत्येक वर्षी किती पाणी उपलब्ध होते, या निकषावर मोजली जाते. आकडेवारीच्या जंजाळात न जाता असे म्हणता येईल की, ४०% देशांमधील उपलब्धता आणि उरलेल्या देशांमधील उपलब्धता यात ५० ते ५०० पटींचा फरक दिसतो. अशीच असमानता देशांतर्गत प्रांताप्रांतातसुद्धा आहे.

प्रदूषणाची समस्या

संयुक्त राष्ट्रांनी अधोरेखित केलेला अदृश्य स्त्रोत म्हणजे भूजल. त्याची उत्पत्ती होताना पहिली प्रक्रिया म्हणजे पावसाचे आणि बर्फातील पाणी अडवणे. जमिनीच्या शोषण पद्धतीनुसार हे अडवलेले पाणी भूगर्भात जाते.निरनिराळ्या स्तरांमध्ये नैसर्गिकरित्या साठवले जाते किंवा वाहत जाते. ही प्रक्रिया अव्याहतपणे असते. वाहत्या पाण्याची साठवण मर्यादित असते. ते कमी पडू लागल्यावर मानव भूजलाचा अनिर्बंधपणे उपयोग करतो. अशा पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर केल्यानंतर पुनर्भरण योजनेंतर्गत भूजल उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जातो.इथे अशी गोम आहे की, पुनर्भरित पाण्याचे परिमाण कमी आणि वापरण्याचे परिमाण त्याच्यापेक्षा बरेच जास्त. तेव्हा अदृश्य स्वरूपाच्या पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठीचे कायदे कानून आणि अंमलबजावणी यात मोठी तफावत आहे. त्यामुळे दहा फुटांवरील भूजल स्त्रोतात चणचण भासली की १०० ते ५०० फुटांवरील भूजलाला हात घातला जातो.

भारतातील अठरा खोरे निहाय भूजल क्षमतेचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे. ही क्षमता प्रतिवर्षी घन किलोमीटरमध्ये मोजल्यास सर्वात जास्त गंगेच्या खोऱ्यात, त्यानंतर गोदावरी, कृष्णा, ब्रह्मपुत्रा इत्यादी खोऱ्यांमध्ये आहे. कमी भूजलाची खोरी म्हणजे पेनार, सुवर्णलेखा, कावेरी इत्यादी. असे अदृश्य स्वरूपातील भूजल दृश्य स्वरूपात रूपांतरित करताना खोरीनिहाय गरज आणि पाण्याचे नियोजन अशा सर्वंकष अभ्यासाची गरज आहे. खोरे निहाय सर्वोत्तमीकरण आणि त्यामध्ये सातत्याने घडणारे बदल हे त्या खोऱ्यासाठी प्रदेशनिहाय अभ्यास करून सातत्याने मागोवा घेणे महत्त्वाचे ठरते. थोडक्यात म्हणजे ही अदृश्य संपत्ती शास्त्रीय आधारावार मोजून वापरणे याची जाण अजूनही दिसत नाही.

पुढील सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे भूजलाचे प्रदूषण. विविध देशांमध्ये आणि प्रांतांमध्ये भूजलाने मुख्य जलस्त्रोत म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. भूजलसुद्धा पिणे, शेती, औद्योगिक आणि इतर गरजा भागवण्यासाठी वापरले जाते. असे म्हणतात की भूजलाचा वापर जागतिक स्तरावर साधारण ४० ते ५० टक्के आहे. भूजल निर्मितीमध्ये जमिनी, नैसर्गिक गाळणीच्या रूपाने प्रदुषके कमी होण्याच्या प्रक्रियेला मर्यादा आहेत. ही प्रदुषके अर्थातच शेती आणि इतर कारणांसाठी वापरलेली जंतुनाशके, रासायनिक खते, घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतील दुषित पाणी, सेप्टीक टँक आणि इतर स्त्रोतातून प्रदुषके, भूजलात जाऊन भूजल प्रदुषित करतात. त्यामुळे भूजल वापराला मर्यादा येतात. असे दुषित पाणी ॲक्वीझरमधून बाहेर काढल्यावर वापरण्यास अयोग्य ठरते. विरघळलेले पदार्थ जर का दुषित भूजलात आढळले तर मोठ्या प्रमाणात त्याचे निर्मूलन आवश्यक ठरते.

हवी अभ्यासू वृत्ती

अदृश्य स्वरूपाच्या भूजलाची दृश्यता आतापर्यंतच्या या लिखाणात जागतिक आणि देश पातळीवर मांडून उहापोह केला. तरीपण तळागाळापर्यंतच्या समुदायाने या बाबतीत विचार करणेही महत्त्वाचे ठरेल. कायदे कानून जे निर्माण केले, त्याची नीट अंमलबजावणी न झाल्यामुळे या अदृश्य स्वरूपाच्या पाण्यामध्ये गडबड झाली आहे, हे नक्की. त्यासाठी लोकसहभाग आणि अभ्यासू वृत्ती जोपासण्याची सवय संबंधित लोकांनी लावून घेतली पाहिजे. त्यातील ठळक मुद्दे म्हणजे - भूजल, विज्ञान आणि तांत्रिकता समजून घेणे. भूजल स्त्रोतांवरील परिणामांचा अभ्यास करणे.

मुख्य खोरे, उपनदी खोरे आणि पाणलोट क्षेत्र समजून घेणे. वाहते पाणी आणि जमिनीखालील अदृश्यता समजून घेणे. नदी, डोह आणि भूजल यांचा संबंध लक्षात घेणे.अशी अभ्यासू वृत्ती दाखवल्यानंतर भूजल संवर्धन आणि संरक्षणासाठी नैसर्गिक समतोल साधण्यासाठी, सहभाग पातळीवर पुढील गोष्टींचा विचार करणे जरूरीचे आहे. उदा. रासायनिक खते, किटकनाशके यांच्या उपयोगांचा पुनर्विचार. पाण्याच्या गरजेबाबत गाव हे कुटुंब मानून आराखडा तयार करणे. जनाधार पाणी समितीची योग्य निवड करणे. भूरूप-भूस्तर-पीक रचना आणि जलस्त्रोत या साखळीचा अभ्यास करणे.

पाण्याच्या ताळेबंदात गरज, उपलब्धता आणि खर्च यांचा मेळ साधणे. खडकांची सच्छिद्रता, खरीप आणि रब्बीमधील पिके यांचे नियोजन करणे. सामूहिक विचाराने निर्णय घेणे. अशा तऱ्हेच्या विचारसरणीनंतर वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अंमलबजावणी महत्त्वाची आहे. उदा. सगळ्यांनी पाणी मोजून वापरणे. तळे निर्मिती, वृक्ष संवर्धनाकडे लक्ष देणे. उपसा आणि पुनर्भरणात समतोल साधणे. ताळेबंदासाठी पाण्याचा वापर ठरवताना कुटुंबाच्या गरजांचा साकल्याने विचार करणे.

मोजमापामध्ये बाष्पीभवनाचा विचार करणे. पाण्याची गती कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि योग्य पुनर्भरण पद्धत अवलंबणे. सरकारी पातळीवर, सर्व समुदायाला लाभ मिळेल अशा तऱ्हेच्या योजना आखल्या जातात. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाचे पाणी, गाव तेथे शेततळ, जलसंधारणाचे बंधारे, नागरी पाणी योजना यांचा अंतर्भाव असतो. दृश्य स्वरूपातील अदृश्य भूजलाचा यात मोठा वाटा असतो. वरील सर्व मुद्दे आणि विचार चांगल्या प्रकारे अंमलात आणूया!

(लेखक निवृत्त मुख्य अभियंता आणि मुंबई विकास समितीचे सदस्य आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com