एक "लाट' तोडी दोघां...! (ढिंग टांग!)

एक "लाट' तोडी दोघां...! (ढिंग टांग!)

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1940 कार्तिक शु. दशमी. 
आजचा वार : संडेवार. 
आजचा सुविचार : दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट... एक लाट तोडी दोघां... पुन्हा नाही गांठ! ................... 
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस भलताच धकाधकीचा गेला. सकाळी प्रथेप्रमाणे उठलो. दंतमंजन करण्यापूर्वी मोबाइल फोन स्विच ऑन करून दिल्लीला दोघांना "गुडमॉर्निंग'चा मेसेज पाठवला. हे आधी केले की मग सगळा दिवस पदरात पडतो! दात घासत होतो, तेवढ्यात मोबाइल वाजला. दिल्लीहून मेसेज होता की "ताबडतोब शिवाजी पार्कावर जाऊन स्व. बाळासाहेबांच्या समाधिस्थळासमोर (जोडीने) नतमस्तक व्हा... आणि पुराव्यादाखल सेल्फी काढून पाठवा!' भराभरा आंघोळ करून तयार झालो. झराझरा गाडी बसलो आणि सरासरा पार्कावर गेलो. शेजारच्या महापौर बंगल्यात आमचे परममित्र श्रीमान उधोजीसाहेब ऑलरेडी येऊन बसले आहेत, अशी खबर लागली. म्हटले आधी तिथे जावे! गेलो आणि... 

बंगल्याच्या प्रशस्त आवारात शिरताना एका मावळ्याने हटकले.-""कोण पायजेल?'' 
""महापौर बंगला हाच ना?,'' मी नम्रतेने विचारले. सदर मावळ्यास काळीभोर उग्र दाढी होती, आणि दाढी असलेल्या कुणाशीही मी कायम नम्रतेने बोलतो. असो. ""महापौर हिते राहात नाहीत. तिकडं राणीच्या बागंत जावा!,'' मावळ्याने गुरगुरत सांगितले. तेवढ्यात समोरून आमचे सहकारी दिवाकरजी रावते एस्टीसारखे घरघरत आले. त्यांनी वशिला लावल्याने कसाबसा प्रवेश मिळवला. महापौर बंगल्यात जायचे, उधोजीसाहेबांशी मित्रत्वाच्या गप्पा मारायच्या, आणि मखलाशी करून त्यांच्याच मोटारीतून समाधिस्थळी जायचे, असा माझा हिशेब होता. आम्ही एकत्र तेथे गेलो असतो तर युतीच्या खबरा अचूक पसरल्या असत्या. राजकारणात असे करावे लागते, आणि आम्हां नागपूरकरांना ते चांगले जमते. 

"काहीही करून उधोजीसाहेब आणि तुम्ही एका गाडीतून जा, आणि टीव्ही क्‍यामेऱ्यांच्या झुंबडीपुढे उतरा, बाकीचे मी बघून घेईन!,'' असा सल्ला मला आमचे चंदूदादा कोल्हापूरकरांनी दिला होता. त्याला गिरीशभाऊ महाजनांनीही अंगठा उंचावून अनुमोदन दिले होते. मागल्या खेपेला जळगावात एकनाथभाऊ खडसेंना गाडीत घालून मी जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी नेले होते. एकनाथभाऊ खूश झाले होते. म्हणाले, ""आता मंत्रिमंडळात नाही घेतलेत तरी चालेल!'' 
...तसेच काहीसे इथे घडवावे, असा आमचा इरादा होता. ठरल्याप्रमाणे मा. उधोजीसाहेबांना गाठले. आम्हाला बघून ते चपापले. ""इकडे कुठे?'' असे त्यांनी हाताच्या खुणा करून, भिवया उंचावून विचारले. मी हात जोडले, आणि मुजरा केला!! त्यांनी "बरं बरं' अशी खूण केली. 

"चहा घेणार ना?, '' काही काळाने मित्रवर्यांनी तोंड उघडले आणि आतिथ्यदर्शक सुरात विचारले. जीवलग मित्राने चहा विचारला, आणि आम्ही नाही म्हणू? कसे शक्‍य आहे? आम्ही काही बोलायच्या आतच उधोजीसाहेबांनी ऑर्डर दिली. 

"अरे, कोण आहे तिकडे? एक चहा आणा स्पेशल!,'' मुदपाकखान्याकडे तोंड करून ते ओरडले. मग पुन्हा काही वेळ कुणी बोलले नाही. मी उगीच खाकरलो. "इथून समुद्र टॉप दिसतो' छापाचे काहीतरी बोललो. "हल्ली म्हणावी तशी थंडी पडत नाही' हे दरवर्षी उच्चारण्याचे वाक्‍यही बोलून झाले. 
""चहा येईलच इतक्‍यात, तुम्ही घ्या... मी होतो पुढे!,'' असे घाईघाईने बोलून मित्रवर्य उधोजीसाहेब तडकाफडकी उठले, आणि गायबच झाले!! मी चहा बशीत ओतून भराभरा संपवला आणि पाठोपाठ पळालो. पळत पळतच शिवाजीपार्कावर आलो. 

...आज सकाळी बातमी वाचली. -""मुख्यमंत्री आणि उधोजीसाहेबांची महापौर बंगल्यावर भेट होऊनही त्यांनी एकत्र येण्याचे टाळले. युतीतील तणाव स्पष्ट झाला आहे. वगैरे. 
...मी कपाळाला हात लावला! 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com