
तेलंगणचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ तथा के. चंद्रशेखर राव यांना आता थेट महाराष्ट्रात
महत्त्वाकांक्षेची ‘मशागत’
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील काही खेड्यांवर दावा करणाऱ्या तेलंगणचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ तथा के. चंद्रशेखर राव यांना आता थेट महाराष्ट्रात राजकीय स्थानासाठी हातपाय पसरण्याचे डोहाळे लागले आहेत.
आपल्या ‘भारत राष्ट्र समिती’ या पक्षाला राष्ट्रीय स्तरावरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांना या पक्षाचा अन्य राज्यांत विस्तार करावा लागेल. नांदेडमधील कार्यक्रम हा त्यासाठीचाच आटापिटा होता. त्यांनी पक्षविस्तार मोहिमेचा प्रारंभ रविवारी नांदेड येथे आपली महाराष्ट्रातील पहिली-वाहिली जाहीर सभा घेऊन केला.
मात्र, प्रचंड जाहिरातबाजी आणि मोठा गाजावाजा करून आयोजित करण्यात आलेली ही सभा त्या प्रमाणात परिणाम साधू शकली नाही. त्याचे कारण म्हणजे सभेस झालेली गर्दी ही सीमावर्ती भागातील जनतेचीच प्रामुख्याने होती.
गर्दीही जमवलेली होती, असा आरोप भाजपने केलाच आहे. शिवाय, या सभेचे नाभाभिधान ‘पक्षप्रवेश सोहळा’ असे होते. प्रत्यक्षात राज्यातील कोणताही बडा नेता या सभेकडे फिरकलादेखील नाही. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही नेत्यांनी या सभेत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला असला, तरी त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल, असे एकही चर्चेतील नाव नव्हते.
त्यामुळे एका अर्थाने ही सभा म्हणजे त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या महाराष्ट्रातील प्रवेशापुरतीच मर्यादित ठरली! छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत राव यांनी या सभेत पुढच्या दहाच दिवसांत राज्यातील सर्व म्हणजे २८८ विधानसभा मतदारसंघांत पक्षाच्या किसान समित्या स्थापण्याची घोषणा केली.
त्याचा प्रारंभ ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून करणार आहेत! हे सारे महाराष्ट्राच्या अस्मितेला साद घालण्यासाठीच होते, हे उघड आहे. तो देखावाही त्यांनी उत्तम उभा केला. मात्र, या सभेत त्यांचे मुख्य लक्ष्य ‘बळीराजा’ हेच होते, हे त्यांनी ‘अब की बार, किसान सरकार!’
अशा घोषणाद्वारे दाखवून दिले. अर्थात, अशा घोषणांवर शेतकरी भुलून जाण्याचा काळ केव्हाच इतिहासजमा झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कमालीच्या अडचणीत आहे हे वास्तव असले तरी शेतकऱ्यांनी आता राव यांच्या नादाला लागावे, असे कोणतेही भव्यदिव्य काम त्यांनी केलेले नाही.
त्यापलीकडली बाब म्हणजे महाराष्ट्रातील केवळ शेतकरीच नव्हे तर या राज्यातील शेतकरी चळवळ देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक प्रगल्भ तसेच विचारी आहे, हेही लक्षात घ्यावे. ‘केसीआर’ यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकण्यासाठी नांदेडची केलेली निवड ही अर्थातच योग्य होती.
नांदेड तसेच मराठवाड्याचा सारा परिसर प्रदीर्घ काळ हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे या परिसरातील जनतेचे जुने ऋणानुबंध अद्यापही तेलंगणाशी आहेत. त्यामुळेच तेलंगणातील ‘एमआयएम’ने महाराष्ट्रात आपले बस्तान व्हाया नांदेडच बसवले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘एमआयएम’ने नांदेड महापालिकेची निवडणूक लढवूनच उडी घेतली होती; नंतर औरंगाबादेतही बस्तान बसवले. अर्थात, ‘एमआयएम’ला जे काही यश मिळाले याचे कारण त्याचा असलेला काही प्रमाणातील मुस्लिम जनाधार.
राव यांच्याकडे असा कोणताच आधार नाही. तरीही त्यांनी हे धाडस केले आहे, त्यास राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षाच कारणीभूत आहे. अलीकडेच त्यांनी ‘तेलंगण राष्ट्र समिती’ हे केवळ प्रादेशिक भावना जागृत करणारे आपल्या पक्षाचे नाव बदलून ‘भारत राष्ट्र समिती’ असे केले, त्यामागील उद्देश हा कधीच लपून राहिलेला नव्हता.
मात्र, राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांना किमान चार राज्यांत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवणे वा अन्य काही बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. केवळ त्याच उद्देशाने त्यांची ही नांदेडवरील स्वारी होती, यात शंकाच नाही.
त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली. राव यांच्या नजरेसमोरील आणखी एक राज्य हे अर्थातच कर्नाटक आहे. तेथे तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतही ते उतरणार असून त्यासाठी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. देवेगौडा यांच्याशी ते संधान बांधू पाहत आहेत.
नांदेडमधील या सभेच्या पूर्वतयारीसाठी त्यांचे दोन मंत्री, दोन खासदार तसेच ३० आमदार गेले तीन आठवडे तेथे तळ ठोकून होते, तरीही सभेला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाहीच! शिवाय, शेतकऱ्यांच्या नावाचा गजर करताना त्यांनी बळीराजाला मोफत पाणी आणि मोफत वीज तसेच पीक विमा योजना देण्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे आता ‘रेवडीबाजी’ करणारे अरविंद केजरीवाल यांच्यासारखे आणखी एक नेतृत्व यापलीकडे त्या भाषणात काहीच नव्हते. देशातील विद्यमान राजकीय नेतृत्व हे राव यांच्या टीकेचे लक्ष्य असणार, हेही उघडच होते.
ते साधताना त्यांनी आपल्या पक्षाकडे पाणी तसेच वीज या दोन क्षेत्रांसाठी क्रांतिकारी अजेंडा असल्याचे सांगितले. पण त्याबाबतचा तपशील उघड केला नाही. एकंदरीतच प्रचंड गाजावाजा करण्याचा प्रयत्न आणि मोठा आव आणला असला तरी केसीआर यांचा नांदेडमधील ‘राजकीय प्रवेश’ हा फुसका बार ठरला.
मानवी प्रवृत्तीचा अभ्यास हाच राजकीय शिक्षणाचा आरंभ आणि अंतही असतो.
— हेन्री ॲडम्स, इतिहासकार