दहशतवादाचे संकट आणि माध्यमांची जबाबदारी

दहशतवादाचे संकट आणि माध्यमांची जबाबदारी

कडव्या, धर्मांध संघटनांचा अपप्रचार आणि दहशतवाद ही गोष्ट जगासाठी समस्या बनली आहे. भारतासाठी हे दुखणे जुनेच आहे. छुपे कसले; हे पाकिस्तानचे उघड युद्धच आहे. त्याला तोंड देताना समाजातील सर्व घटकांबरोबरच प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. 

दारिद्य्र, अज्ञान आणि रोजगाराचा अभाव ही दहशतवादी संघटनांकडे मुस्लिम युवक आकर्षित होण्याची तीन प्रमुख कारणे मानली जात होती; पण अलीकडे बांगलादेशातील क्रूर हत्याकांडाच्या घटनेनंतर तो समज बरोबर नाही, हे स्पष्ट झाले आहे. दहशतवादाला धार्मिक कर्तव्याचा मुलामा देत तत्त्ववेत्त्याचा आव आणणारे डॉ. झाकिर नाईक आणि त्यांचा कथित धर्मप्रचार हा मुद्दाही परत चर्चेत आला आहे. शिकले-सवरलेले तरुण या तथाकथित वैचारिक जाळ्यात फसताना दिसून येत आहेत. शिक्षित तरुणाईत लोकप्रिय असणाऱ्या समाजमाध्यमांचा या अपप्रचारात मोठा वाटा असल्याचे आढळून आले आहे. परिणामी या समाजविघातक प्रचारतंत्राचे उत्तर शोधणे ही आज काळाची गरज बनली आहे. 

जिहादनंतर मिळणाऱ्या स्वर्गीय सुखाची सोनेरी स्वप्ने दाखवणारा प्रचार अडाणी, गरीब तरुणाला आकर्षून घेतो, असे म्हटले जाते. अशी स्वप्ने उपाशी पोटांना भूल घालतात. सुखवस्तू शिक्षित तरुणाला भौतिक सुखे मिळवण्यासाठी परलोक गाठायची गरज भासत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळे वैचारिक सापळे लावले जात आहेत. 

‘स्वातंत्र्य‘ ही संकल्पना तरुणाईला नेहमीच आकर्षित करत आली आहे; पण स्वैराचाराच्या प्रांतात तो कधी शिरकाव करतो, हे कळतही नाही. दुर्दैवाने प्रसारमाध्यमेही त्या गोष्टीला खतपाणी घालत आहेत... 

गर्दीसमोर एकपात्री प्रवेश रंगवण्यात प्रवीण असलेल्या नाटक्‍यांच्या प्रतिमेत नेतृत्वाची हवा भरून फुगवण्यात आमच्या ‘स्वतंत्र‘ प्रसारमाध्यमांचे कर्तृत्व आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. आम्ही धाडस समजतो आणि अतार्किक नाट्यपूर्ण बडबडीला विद्वत्ता! दुर्दैव म्हणजे बुद्धी आणि कर्तृत्व यांपैकी कशातच दाखवण्याजोगे काहीही नसलेले बोलके पोपट हे नेते म्हणून ‘साजरे‘ केले जातात. यांच्या तर्कहीन विधानांच्या ‘बातम्या‘ झाल्या नाहीत आणि बेताल बडबडीला Coverage मिळालं नाही तर समाजात फूट पाडणाऱ्या विषारी विचारांचे अंकुर मुळातच छाटले जातील. 

प्रत्यक्षात मात्र आर्थिक गणिते जमवण्याच्या नादात मूलभूत मूल्ये जोपासण्याच्या कर्तव्याकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष होताना दिसते. मुंबईतील लोकलमधील बॉंबस्फोट, ताज, छाबडा हाउस, अफझलची फाशी ते अगदी परवाच्या काश्‍मिरमधील अतिरेक्‍यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या गर्दीपर्यंतचे विषादपूर्ण विषय केवळ बातमीमूल्याचा (आणि अर्थात बाजारमूल्याचा) विचार करून चविष्टपणे हाताळले जातात. अशा चित्रणांमध्ये - चर्चांमध्ये जो संयम पाळला जायलाच हवा, त्याचा कुठेही मागमूसही दिसत नाही. दहशतवाद्यांबरोबर पोलिस किंवा सुरक्षा दलांच्या चकमकी म्हणजे काही कब्बडीचा सामना नव्हे. हे विवेकभान प्रेक्षकाचेही सुटते आणि एखादा थ्रिलर चित्रपट पाहिल्याप्रमाणे आपण रक्तलांछित देह आणि विछिन्न वास्तू पाहातो. वर ‘अरेरे‘पासून ‘चाबकाचे फटके दिले पाहिजेत‘पर्यंतच्या चर्चाही करतो. त्यात भर म्हणजे आज जवळजवळ सर्व शिक्षित नागरिक व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकमुळे वृत्तप्रसाराची ‘सबसे पहले‘ची झिंग प्रत्यक्ष अनुभवू शकतात. सनसनाटी बातमी सर्वांत आधी इतरांपर्यंत पोचवण्याच्या नादात बऱ्या-वाईटाचे तारतम्य सुटते. बरेचदा तर अशा प्रचाराचा अंतिम परिणाम काय होईल, हे समजण्याची त्यांची पात्रताही नसते. 

कडव्या, धर्मांध संघटनांचा अपप्रचार आणि दहशतवाद ही गोष्ट जगासाठी समस्या बनली आहे. भारतासाठी हे दुखणे जुनेच आहे. जगासाठी दहशतवादाविरुद्ध लढाई ही मात्र एक संकल्पना आहे; पण भारतासाठी; स्पष्ट शब्दात सांगायचे तर ते पाकिस्तानी आक्रमण आहे. भारताविरुद्ध समोरासमोर लढून विजय मिळणे शक्‍य नाही, याचा त्यांनी वारंवार अनुभव घेतला आहे. सांस्कृतिक - भौतिक - वैचारिक - वैज्ञानिक; कुठल्याही तुलनेत आपण भारताच्या पासंगालाही पुरणार नाही या वैफल्यातून पाकिस्तानने या अप्रत्यक्ष युद्धनीतीचा अंगिकार केला आहे. सहस्र क्षतांनी विद्ध करून भळभळत्या जखमांनी कमजोर झालेल्या भारताची महान संस्कृती नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. छुपे कसले; आता हे उघडच युद्ध आहे. त्याला तोंड देण्यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्‍यक आहे. प्रसारमाध्यमांची भूमिकाही त्यात महत्त्वाची असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com