थेम्सचे लाल पाणी.... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

अत्यल्प मनुष्यबळ आणि सामग्री वापरून जास्तीत जास्त दुष्परिणाम घडवून आणायचा, ही दहशतवाद्यांची व्यूहनीती आहे. हल्ल्यानंतर लंडन शहर लगेचच पूर्वपदावर आले, ही दिलासा देणारी बाब असली, तरी अखंड सावधानता आणि दहशतवादाच्या विरोधात परस्पर सहकार्य यांना पर्याय नाही.

अत्यल्प मनुष्यबळ आणि सामग्री वापरून जास्तीत जास्त दुष्परिणाम घडवून आणायचा, ही दहशतवाद्यांची व्यूहनीती आहे. हल्ल्यानंतर लंडन शहर लगेचच पूर्वपदावर आले, ही दिलासा देणारी बाब असली, तरी अखंड सावधानता आणि दहशतवादाच्या विरोधात परस्पर सहकार्य यांना पर्याय नाही.

जवळपास बारा वर्षांनी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने लंडन हादरले. तेथील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले असले, तरी सुरळीत चाललेल्या जीवनचक्राला आम्ही केव्हाही खीळ घालू शकतो, हे दहशतवाद्यांनी यातून दाखवून दिले आहे. एखाद्या वाहनाच्या साह्याने घातपात करून जीवितहानी करायची आणि त्याचा जास्तीत जास्त परिणाम साधायचा, समाजात भयगंड पसरवायचा या त्यांच्या रणनीतीचा पुन्हा प्रत्यय आला. या हल्ल्याची जबाबदारी अपेक्षेप्रमाणे ‘इस्लामिक स्टेट’(इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असली, तरी ‘हा एकांड्या अतिरेक्‍याचा हल्ला होता, आणखी हल्ले होण्याची शक्‍यता नाहीत,’ असा निर्वाळा ब्रिटिश सरकारने दिला आहे. ‘इसिस’चा सहभाग कशा स्वरूपाचा होता आणि त्यांनी केलेला दावा कितपत खरा आहे, या बाबी तपासानंतर स्पष्ट होतील, हे खरे; परंतु सीरिया व इराकमध्ये थेट युद्धात ‘इसिस’ला जबर मार बसला असून, त्यांची पीछेहाट झाली आहे. अशावेळी दबदबा शाबूत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करण्याचा त्या संघटनेचा डाव असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांचे वारंवार लक्ष्य ठरणाऱ्या देशांनी कमालीची सावधानता बाळगण्याची गरज आहे. गेल्या दोनेक वर्षांत युरोपातील ब्रुसेल्स, बेल्जियम, पॅरिस, बर्लिन आणि नीस या शहरांमध्ये असे हल्ले सातत्याने झाले असून, त्यात शेकडो निरपराध नागरिक मारले गेले आहेत. यांतील बहुतेक हल्ल्यांची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारली होती. 

लंडनमधील हल्ला लोकसंख्येने बुजबुजलेल्या कुठल्या आशियाई शहर-गावातला नव्हता, तर थेम्सच्या किनारी फळलेल्या, फुललेल्या आणि दोन-दोन महायुद्धे पचवलेल्या लंडनवरचा होता, हेही विसरता येणार नाही. ‘ब्रेग्झिट’च्या नव्याने पाडलेल्या दारामधून ब्रिटन हा युरोपीय समुदायातून लवकरच ‘एक्‍झिट’ घेणार असला, तरी हा हल्ला युरोपच्या गंडस्थळावरच झाला आहे, हे मान्य करणे भाग आहे. वास्तविक ‘एमआय ५’ या ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेने नजीकच्या भविष्यकाळात असा एखादा हल्ला होण्याची दाट शक्‍यता वर्तविलीही होती. बुधवारी झालेला हल्ला, ज्या खालिद महमूद नावाच्या एकांड्या दहशतवाद्याने केलेला होता, त्याची एकदा चौकशीदेखील झाली होती, असे निष्पन्न झाले आहे. असे असूनही लंडन पोलिसांना हा हल्ला रोखण्यात अपयश आले. अर्थात, हे सर्वसाधारणपणे आपल्याकडे घडते, त्याचप्रकारचे चर्वितचर्वण आहे. मुंबईत ‘२६-११’ ला झालेल्या भयानक हल्ल्यानंतर अशाच प्रकारची चर्चा आपल्याकडेही झाली होती. धागेदोरे मिळूनही मुंबई पोलिसांना हल्ले रोखण्यात अपयश कसे आले, असा सवाल विचारला गेला. वेस्टमिन्स्टर ब्रिजवर आपले वाहन सोडून पार्लमेंटकडे आलेल्या दहशतवाद्याला किथ पामर नामक पोलिस कॉन्स्टेबलने रोखले; परंतु दहशतवाद्याने त्यास भोसकून ठार मारले. आपल्या तुकाराम ओंबळे यांच्याप्रमाणेच कर्तव्य बजावताना प्राणाला मुकलेल्या त्या पोलिसास वाचवण्याची धडपड करणारे ब्रिटिश परराष्ट्रमंत्री टोबियस एलवूड यांची छायाचित्रे लंडनच्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत व त्यांना त्यांचा देश ‘हिरो’ म्हणून सलाम करताना दिसतो आहे. इतकेच नव्हे, तर अत्यंत भयानक स्थितीत धीरोदात्तपणे घायाळ पोलिसास वाचवू पाहणाऱ्या टोबियस यांना ‘नाइट’ किताब देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. 

लंडनमधले हे अवघ्या सात मिनिटांचे मृत्यूचे थैमान संपल्यानंतर ऐतिहासिक वेस्टमिन्स्टर ब्रिज पुन्हा एकवार वाहता झाला. लोकशाहीचे पाळणाघर समजले जाणारे ब्रिटिश पार्लमेंट पुन्हा एकदा कामात बुडाले. हल्ल्यानंतर काही तासांतच पंतप्रधान थेरेसा मे यांनी असल्या हल्ल्यांपुढे ब्रिटन झुकणे केवळ अशक्‍य असल्याची ग्वाही दिली. लोकांमध्ये विश्‍वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने हे योग्यच झाले; परंतु तरीही सध्याच्या काळात अखंड सावधानतेला पर्याय नाही, हेच खरे. दहशतवादाचे जागतिकीकरण केव्हाच झाले आहे; परंतु त्याविरोधातील लढ्याचे मात्र तितक्‍या समाधानकारकरीतीने ‘जागतिकीकरण’ झालेले नाही. वारंवार होणारे हल्ले तेच तर दाखवून देत आहेत.

Web Title: Thames Water